प्रख्यात व भूमिकेचा गंभीरपणे विचार करणारे कलावंत अमिताभ बच्चन यांच्या एका सिनेमात त्यांची केशरचना- मागे वळवलेले केस आणि मानेवर केसांची जुडी बांधलेली (पोनीटेल?) अशी होती. ते विचित्रच दिसले. प्रेक्षकांनाही ही गोष्ट खटकली. काही दिवसांपूर्वी टीव्हीवर त्यांची मुलाखत घेताना प्रश्नकर्त्यांने तशा केशरचनेविषयी छेडले तेव्हा अमिताभ हताशपणे म्हणाले, ‘हमने उन लोगों को बहुत समझाया. मगर ये मार्केटिंगवाले लोग मानते नहीं.’ बच्चन यांची ही कथा; तर साध्या लेखकांचे काय? पण आपल्या स्वत्वाबद्दल लेखकाने जागरूक राहायला हवे, त्यासाठी सगळे बळ एकवटायला हवे.नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परी स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
ती माजघरातील मंद दिव्याची वात
– कुसुमाग्रजांच्या या ओळी नेहमीच समकालीन यासाठी वाटतात, की या कवितेतील ‘दिव्याची वात’ हे प्रतीक ‘जुन्या’ गोष्टींसाठी आलेले नाही- ते ‘घरा’साठी आलेले आहे. आपुलकी, मांगल्य असलेले, मूल्ये जपणारे, आसरा देणारे, जन्म दिला ते घर. आणखीही काही अर्थवलये मनात विस्तारत राहतात. वीज म्हणजे इलेक्ट्रिसिटी; नवलाख दिवे- हे शहरी लखलखाटासाठी; कृत्रिम आणि अनावश्यक, पण आकर्षक अशा झगझगाटासाठी आलेले आहेत. त्यावेळी- म्हणजे सत्तरेक वर्षांपूर्वी कवीला माजघरातील मंद दिव्याची ओढ लागली होती. आज असे दिसते की, मंद दिव्याच्या म्हणजे कंदिलाच्या, वीज असेल गोळ्याच्या प्रकाशात; माजघरात, कौलारू किंवा टिनाच्या किंवा माळवदाच्या घरात बसलेल्या कवीला, लेखकाला तळपत्या दिव्यांची, नगराची, झगमगाटाची ओढ लागली आहे. खरे तर ‘ओढ’ नाही; आकर्षण म्हणावे लागेल. (मागील वाक्यातील ‘गोळा’ या शब्दाविषयी खुलासा : माझ्या गावातील मथुराबाई शिकलेली नाही. पण ऐकणाऱ्याला बुचकळ्यात टाकेल अशी प्रचलित नसलेली नवीन नावे वस्तूंना ती देते. उदाहरणार्थ : ‘गोळा’ म्हणजे बल्ब आणि नळी म्हणजे टय़ूबलाइट. असो.)
नवीन कवी, लेखकाला कशासाठी जावे वाटते शहरात? कशाला तो खांद्यावरील झोळीत (आजकाल बॅगेत) आपल्या पुस्तकाच्या प्रती घेऊन एकेका प्रसिद्ध माणसाच्या घरी जाऊन वाटत सुटतो?
माझ्या ओळखीचा एक कवी तर पुण्याला किंवा मुंबईला गेला तर चार दिवस परत येतच नाही. उगीच वेळी-अवेळी लोकांच्या घरी जाणे; त्यांनी त्रासिक मुद्रेने याचे स्वागत करणे; याने पाया पडणे; दर्शन आणि आशीर्वाद अशा शब्दांचा आध्यात्मिक डूब देऊन उपयोग करणे; जवळचे पैसे संपल्यावर गावाकडे परत येणे. असे सगळे सोपस्कार आणि उपचार सुरू असणे. गावाकडे आल्यावर आभाराचे पत्र लिहिणे. पुस्तकावर चार शब्द लिहा अशी विनंती करणे. तेही मोठय़ा मनाने विनंती मान्य करतात. काही माणसे तर प्रस्तावना, ब्लर्बवरचा मजकूर आणि लेखकाची भलामण व पुस्तक परिचय लिहूनच थोर आणि प्रतिष्ठित व विद्वान म्हणून मान्यता पावलेली मराठी भाषेच्या मुलखात दिसतात. काही लेखक-कवींना पुण्या-मुंबईला जाणे शक्य आणि गरजेचे नसेल तर ते नागपूर किंवा औरंगाबादला जातात. पण एकूण प्रकार असाच. फरक एवढाच, की पुण्या-मुंबईचे लेखक, प्रकाशक, समीक्षक आपल्यावर अन्याय करतात, असे म्हणून सांत्वनाचा एक जास्तीचा हात नवोदिताच्या पाठीवर फिरवला जातो. मराठीतील एका नामवंत समीक्षक महोदयांनी ३०-३५ वर्षांपूर्वी एका नवोदित कवीच्या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहून दिली आणि मर्ढेकरांच्या एका कवितेपेक्षा या कवीची एक कविता किती चांगली आहे, हे पटवून दिले. परिणाम काय झाला; त्या कवीला आपण ‘महाकवी’ आहोत असा साक्षात्कार झाला. ते पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर तो कवी जो ढगात गेला तो अजून पृथ्वीतलावर आलाच नाही. आज त्या संग्रहाचे नावही मराठी काव्यक्षेत्रातील रसिकांना आठवत नाही आणि त्या कवीच्या नंतरच्या पुस्तकाचेही! असे काही पाहिले की मला कवी ‘धूमिल’ यांच्या या ओळी आठवतात; ज्या मी इतरत्रही उद्धृत केल्या आहेत-
वे
जिसकी पीठ ठोंकते हैं
उसके रीढ की हड्डी
गायब हो जाती है
एक मत असे की, प्रसिद्धीच्या हवेने प्रतिभेचा निखारा फुलतो. हो बाबा, पण हवा जास्त आणि पुन्हा पुन्हा लागत राहिली तर निखारा भडकून भडकून लवकर राखेत परिवर्तित होईल ना! असे दिसते की, लेखकाचे लेखनाने समाधान होत नाही. ‘मोठय़ा शहरात असतो तर आपला जास्त फायदा झाला असता-’ असे जेव्हा लेखक म्हणतो तेव्हा तो खरेच बोलत असतो. त्याच्या बोलण्यातील ‘फायदा’ हा शब्द महत्त्वाचा. अधिक पुस्तके, अधिक पारितोषिके, अधिक ओळखी, अधिक कमिटय़ा, अधिक भत्ते, जमले तर विदेश दौरे, अधिक शिष्यवृत्त्या, अधिक अभ्यासक्रमांमध्ये समावेश, सरकारी कोटय़ातून फ्लॅट, अधिक.. अधिक फायदा. जे लेखन रक्त आटवून वगैरे लिहिलेले असते त्या लेखनाची, कवितेची शिडीसारखी गत करायची आणि एकेका पायरीवर पाय रोवत ऐहिकाच्या पायऱ्या चढायच्या. एवढे सगळे केल्यावर ‘ज्ञानेश्वरीतील विरक्ती’ आणि ‘तुकोबांचे वैराग्य’ या विषयांवर व्याख्यान देण्याचा आपोआपच अधिकार प्राप्त होतो असे म्हणतात!
कधी कधी माझ्या मनात विचार येतो की (म्हणजे कभी कभी मेरे दिल में खयाल आता है.. या चालीवर) राजकारणी लोक त्यांच्याजवळ येणाऱ्या कवी-लेखकांना पाहून मनातल्या मनात (आणि गालातल्या गालात) हसत असतील का? ‘मडके कच्चे आहे!’ असे वाक्य ते मनात साहित्यिक नसूनही उच्चारत असतील का? या लेखकप्राण्यांची भूक किती अल्प आणि क्षूद्र आहे हे जाणवून ते खिन्न होत असतील का? गंमत म्हणजे चांगल्या चांगल्या लेखकांना समीक्षक, जाणकार, वाङ्मय क्षेत्रातले रसिक, मित्र कवी-लेखक यांच्यापेक्षा- म्हणजे यांच्या अभिप्रायापेक्षा एखाद्या नेत्याने एखादा जरी भला उद्गार यांच्याविषयी किंवा यांच्या पुस्तकाविषयी काढला तर अधिक आनंद होतो. प्रत्यक्ष श्रींनी किंवा श्रीश्रींनी सभागृहातील एखाद्याच अनुयायाकडे डोळे उघडून पाहिल्यास त्याला होईल तसा!
आपल्या प्रतिष्ठेच्या कल्पनाही किती पोरकट असतात. सध्या साठी उलटलेले एक प्रसिद्ध कवीमित्र व्यासपीठावरून बोलताना म्हणाले की, ‘कवीला सन्मान मिळाला पाहिजे. तोही कलावंत आहे,’ वगैरे.. इथपर्यंत ठीक होते. पण पुढे ते म्हणाले की, ‘कवीला पोलीस स्टेशनमध्येदेखील मानाने या, बसा म्हटले पाहिजे..’ मला खरे तर जोराने ठो करून हसावेसे वाटले. पण सभेत असल्यामुळे तसे करता आले नाही. मला हसू त्यांच्या मागणीचे आले नाही; त्यांच्या अज्ञानाचे आले, की पोलीस स्टेशनमध्ये कोणाला या, बसा म्हणतात आणि कोणाला सन्मान मिळतो, याचे ज्ञान या कवीमित्राला नाही. पूर्वजांचे हे वाक्य की, मान मागून मिळत नसतो, हेही याला माहीत नाही आणि हे कविवचनदेखील, की-
बिन मांगे मिल जाते मोती
माँगे से मिलती भीक नहीं
ज्यांची ऊर्जा संपत आलेली आहे अशा साहित्यिकांना त्या- त्या गावाचे सांस्कृतिक नेतृत्व करण्याची खुमखुमी येते. मग गावातील सांस्कृतिक, सामाजिक संस्थांमध्ये घुसखोरी करण्यापासून त्या बळकावण्याकडे त्यांची वाटचाल सुरू होते. मग हेवेदावे, रागलोभ, द्वेष, तिरस्कार अशी जळमटे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला चिकटू लागतात. खरे तर ‘आता उरलो उपकारापुरता’ या तुकोबांच्या वचनाचा अर्थ नीट समजून घेतला तर या समस्या निर्माण होणार नाहीत. निवृत्त होणे म्हणजे निष्क्रिय होणे नव्हे. पण लेखकांच्या निवृत्तीनंतर प्रवृत्ती बळावतात आणि यानेच ते चांगले लेखन केले आहे काय, असा प्रश्न लोक विचारू लागतात. किती संस्थांमध्ये किती काम? मग तुझे मूळ काम- लेखनधर्म वगैरे त्याचे काय? शेवटी अशी अवस्था येते-
इतने हिस्सों मे बँट गया हूँ मैं
कि मेरे हिस्से में कुछ बचा ही नहीं
अनेक चांगले लेखक आपला अलिप्तपणा शाबूत राखूनही साहित्यव्यवहार आणि जीवनव्यापार यांत संतुलन राखून असतात. लेखनासाठी झोताची गरज नाही आणि लेखनानंतरही प्रवाहात वाहून जाणे टाळता येते. त्या कृष्णात खोत नावाच्या कसदार लिहिणाऱ्या माणसाचे गाव कोठे आहे? आणि राजन गवसने लेखन सुरू केले ते अत्याळ- नदीकाठी आहे की डोंगराआड आहे? ड्रोनहल्ला करण्यासाठी उपग्रहांच्या द्वारे अमेरिकेने शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी या जागा सापडणार नाहीत. पण या जागा, हा परिसर, इथले पर्यावरण, माणसे यांनी केवढी ऊर्जा या लेखकांना पुरविली! ती ऊर्जा अनेक प्रकारे प्रकट होते. मला आठवते, एका प्रकाशकांनी कादंबरीचे शीर्षक बदलण्याचा प्रयत्न केला असता राजन गवसने त्या प्रकाशकांच्याच गावात, त्याच्याच कार्यालयात खास भुदरगड-गारगोटीच्या भाषेत त्यांचा उद्धार केला होता.(‘गोमच्याळ’ असे त्या पुस्तकाचे नाव असावे.) पण हे सर्वाना शक्य होत नाही. मराठवाडय़ातील एका लेखिकेने एक चांगली कादंबरी लिहिली. चांगले शीर्षकही दिले. पण प्रकाशकांनी ‘मार्केटिंग’च्या दृष्टिकोनातून कादंबरीला आकर्षक, पण उथळ शीर्षक दिले. लेखिकेने विरोध केला, पण शेवटी हिरमुसली. आता काही रसिक उथळ शीर्षकामुळे ती कादंबरी हाती घेत नाहीत. नुकसान कोणाचे? लेखिकेचे! दडपण झुगारण्यासाठी बळ, ऊर्जा कमी पडली. पण तिला काय दोष द्यावा? एवढय़ातलीच गोष्ट आहे. प्रख्यात आणि भूमिकेचा गंभीरपणे विचार करणारे कलावंत अमिताभ बच्चन यांच्या एका सिनेमात त्यांची केशरचना- मागे वळवलेले केस आणि मानेवर केसांची जुडी बांधलेली (पोनीटेल?) अशी होती. ते विचित्रच दिसले. प्रेक्षकांनाही ही गोष्ट खटकली. काही दिवसांपूर्वी टीव्हीवर त्यांची मुलाखत घेताना प्रश्नकर्त्यांने तशा केशरचनेविषयी छेडले तेव्हा अमिताभ हताशपणे म्हणाले, ‘हमने उन लोगों को बहुत समझाया. मगर ये मार्केटिंगवाले लोग मानते नहीं.’ बच्चन यांची ही कथा; तर इतरांचे काय? व्यावसायिक नाटकांची शीर्षके लेखकाला न जुमानता मार्केटिंगवाले निश्चित करतात हे माहीत होते; पण आता हे लोण साहित्य क्षेत्रातही पसरू लागले आहे. काय करावे? लेखकाने जागरूक राहावे, बळ एकवटून असावे आणि हे ध्यानात ठेवावे की-
ये इश्क नहीं आसाँ, बस इतना समझ लीजिये
इक आग का दरिया है और डूब के जाना है

Story img Loader