आपण वाचतो त्यामागची लेखनाचा कस आजमावणारी प्रक्रिया गुंतागुंतीची असते. ती कधी कधी भल्याभल्यांना गुंगवते, कधी अतक्र्य वाटते, तर कधी चकवा देते.
‘हंस’ या श्रेष्ठ कथा-कादंबरीकार प्रेमचंद यांनी सुरू केलेल्या हिंदीतील साहित्यविषयक मासिकाचे अलीकडच्या काळात जवळजवळ २५ वर्षे हिंदीतील प्रतिष्ठित साहित्यिक राजेंद्र यादव यांनी संपादन केले. महिन्यापूर्वी त्यांचे, संपादकपदी असताना निधन झाले. हिंदीतील नवकथेचे प्रणेते म्हणून मोहन राकेश आणि कमलेश्वर यांच्या बरोबरीने राजेंद्र यादव यांचे नाव घेतले जाते. कथेबरोबरच कादंबरीलेखन आणि साहित्यचिंतन, लेखकीय भूमिका यासंबंधीची यादव यांची निर्मिती महत्त्वाची मानली जाते. ‘सारा आकाश’ या पुस्तकाने, पुढे ज्यावर याच नावाने चित्रपटही तयार झाला, त्यांना हिंदी साहित्य जगतात सुस्थापित केले. मन्नू भंडारी या लेखिका त्यांच्या पत्नी होत्या. त्याही सुप्रसिद्ध लेखिका आहेत, तोलामोलाच्या.
राजेंद्र यादव यांनी व्यक्त केलेल्या एका टिप्पणीवर बरीच चर्चा साहित्य विश्वात झाली. जे लेखक मान मोडून नोकरी करतात, छोट-मोठे व्यवसाय करतात आणि मग लेखन करतात, त्यांची संभावना यादव यांनी ‘थकीहारी प्रतिभाएं’ अशी केली आहे. त्यांना असे सुचवायचे आहे की, लेखन ही पूर्ण वेळ देण्याची क्रिया आहे. जीवनात धडपड, पगारवाढ, सुखप्राप्ती यासाठी प्रयत्न करायचे आणि फावल्या वेळात लेखन करायचे. दगदगीनंतर लेखनासाठी हवा असणारा प्रतिभेचा ताजेपणा, मनाची उत्फुल्लता शिल्लक राहते का? संसार करता करता आणि जीवनाची घडी बसविण्यासाठी ऊर फुटेपर्यंत धावल्यानंतर-कमालीची मानसिक, बौद्धिक, वैचारिक, प्रातिभिक (आणि शारीरिकही) शक्तीची मागणी करणाऱ्या लेखनासाठी ‘ऊर्जा’ शिल्लक राहते का, असा सवाल यादव उपस्थित करू इच्छितात असे वाटते.
एक नक्की की, यादव यांच्याशी सहमत आपण होवो न होवो, पण यादवांना हे सांगायचे असावे की लेखन हे पूर्ण वेळेचे काम आहे. जाता जाता करावयाचे काम नाही. शिवाय लेखन हे निष्ठेने, एकाग्रतेने करावयाचे काम आहे; इतर कामांबरोबर करावयाचे दुय्यम किंवा आनुषंगिक काम नाही असे त्यांना सांगायचे असावे. त्याचबरोबर लेखक नावाच्या माणसाच्या मानसिक-शारीरिक क्षमतांचा आणि मर्यादांचा आणि यांच्याशी कधी समांतर तर कधी फटकून वागणाऱ्या प्रतिभा नामक शक्तीच्या कसाचा व कसोटीचाही त्यांनी विचार केला असावा.
प्रतिभा, सृजन, त्याशी संबंधित कष्ट, मेहनत, मशागत यांचे महत्त्व केशवसुतांनीही अधोरेखित केले आहे आणि मर्ढेकरांनीही. केशवसुतांनी उत्तम पिकासाठी (म्हणजे निर्मितीसाठी) भुई नांगरण्याच्या आणि कवी हा सनदी (जातिवंत? निष्ठावंत?) शेतकरी असण्याचा आग्रह धरला आहे. त्यांची क्षमा मागून पुढे विस्तार करून सांगता येईल की, नांगरणी, केरकचरा वेचणे, तो जाळणे, पाऊस पडल्यानंतर शेत वखरणे, पेरणी करणे, पीक तरारल्यावर तण निंदून काढणे, डवरणी करणे, पीक सोंगणे- कापणे, वाळवणे, संरक्षण करणे, खळे करणे, उपणणे-श्री ज्ञानेश्वरांचा दृष्टांत असा की टिव्हाळय़ावर उभे राहून उपणणी करावी- विवेकाचा वारा सुटू द्यावा म्हणजे तूस, कचरा, फोलपट दूर उडून जाते (म्हणजे अज्ञान? असत्य? भ्रम?) आणि मोत्यासारख्या दाण्यांची निखळ रास जमा होते (म्हणजे सत्य! ज्ञान!..)
लेखकाला या रूपकातून खूप काही मार्गदर्शन किंवा कर्तव्याची रूपरेखा मिळू शकते. (तो एवढे कष्ट घेतो की नाही हे त्याच्या निर्मितीवरून, जाणकारांना, रसिकांना कळून येते.)
मर्ढेकरांनी तर स्पष्टपणे सांगितले आहे-
भरून येईल हृदय जेधवा
शरीर पिळुनी निघेल घाम
अन् शब्दांच्या तोंडामध्ये
बसेल तुझा गच्च लगाम
(आता ज्यांना स्वप्नामध्ये कविता सुचतात आणि ज्यांना रोज दोन-चार कविता ‘होतात’, त्यांना हे-शरीर, घाम, लगाम वगैरे प्रकरण म्हणजे दु:स्वप्नच वाटण्याची शक्यता आहे.)
राजेंद्र यादव मुख्यत: कथाकार होते. कष्ट, मशागत, राखणी आणि मांडणी यांचा प्रत्यय मराठी कथाकारांच्या बाबतीत घ्यायचा झाला तर व्यंकटेश माडगूळकर, जी. ए. कुलकर्णी, श्री. दा. पानवलकर, श्याम मनोहर यांच्या कथा वाचाव्यात आणि स्तिमित व्हावे. जी. एं.च्या एका कथेत एक पुरुष एका स्त्रीच्या छातीकडे वासनासक्त नजरेने पाहतो. याप्रसंगी जी. ए. लिहितात-‘तो तिच्या उघडय़ा उराकडे बुभुक्षित श्वापदाच्या निखळ रानभुकेने पाहू लागला.’ हे एकच वाक्य. काय करावे वाचकाने वाचताना आणि अर्थातच समजून घेताना? अर्थाबरोबर दमछाक आणि कलाकृतीतून मिळणारा आनंद यांची एकत्र अनुभूती घेताना चकित व्हावे की स्तब्ध व्हावे? एकतर भूक, तीही रानभूक, तीसुद्धा निखळ रानभूक, त्यातही श्वापदाची निखळ रानभूक आणि त्यात पुन्हा बुभुक्षित श्वापदाची निखळ रानभूक! मी तर हे वाक्य वाचून कथासंग्रह मिटून ठेवूनच दिला आणि डोळे मिटून स्वत: सावरण्याचा प्रयत्न करू लागलो. (आता मनात विचार येतो की हे वाक्य जर सखाराम गटणेने वाचले ना तर तो श्रद्धातिरेकाने मरूनच जाईल!)
आता प्रश्न एवढाच की, हे वाक्य लिहायला लेखकाला कोणते आणि किती कष्ट पडले असतील? लेखनासंबंधी जेव्हा कुठे मी असे वाचतो की, ‘असे वाक्य लेखक सहज लिहून जातो’ तेव्हा लेखकाच्या मनातील जीवघेण्या उलाघालीची कल्पना नसलेल्या शेरेबहाद्दराची कीव येते.
मोहन राकेश यांची डायरी प्रसिद्ध झालेली आहे. त्यातील तीन दिवसांची रोजनिशी अशी आहे-
सोमवार, तारीख..कालचे लेखन समोर घेतले. काही सुचेना.
दिवसभरात पुढे फक्त एक ओळ लिहिली.
मंगळवार, तारीख.. आजही लेखन पुढे झाले नाही. मात्र काल लिहिलेल्या एका ओळीतील एक शब्द अप्रस्तुत वाटला. तो खोडला.
बुधवार, तारीख.. आजही पुढे लेखन झाले नाही. पण खूप विचार केल्यानंतर काल खोडलेला शब्द पुन्हा त्या ओळीत घातला.
-भराभर आणि भाराभर लेखन करणाऱ्या लेखकांना मोहन राकेश यांचे हे कथन सुरस, चमत्कारिक किंवा काल्पनिक आणि अवास्तव वाटण्याची शक्यता आहे.
पण असे कष्ट लेखनासाठी घेतले म्हणून ते लेखन आपल्याला अस्वस्थ करते, दिशा दाखवते, आत्मशोधाला बळ देते. एक वचन आठवते, ‘some read to find themselves and some read to forget themselves.’
मराठीच्या संदर्भात विचार करायचा झाला तर ‘पूर्णवेळ लेखन’ ही संकल्पना व्यवहार्य नाही, असे म्हणता येते. हिंदी लेखकांना मिळणारे मानधन, हिंदी पुस्तकांना उपलब्ध असलेली भारत आणि विदेशातली बाजारपेठ, त्यांचा खप, राष्ट्रभाषेच्या नावावर मिळणाऱ्या सवलती, आर्थिक लाभ यामुळे त्यांना नोकरीची गरज भासत नसावी. (पण यादवांनाही, ‘हंस’च्या संपादनाचे मानधन मिळत होतेच.) पण या कारणांमुळे त्यांची लेखकीय गुणवत्ता उणावत नाही. मराठीत असे काही लेखक होते व आहेत ज्यांनी पूर्णवेळ लेखक होण्याचा पर्याय स्वीकारला, आर्थिक समृद्धीही मिळविली. पण किती जणांचे लेखन संख्येने आणि गुणवत्तेने- सातत्याने दर्जा राखून राहिले याचा ताळेबंद मांडला तर फारसे समाधान पदरी पडत नाही.
नोकरी, विवंचना, समस्या यांसह अनेकांनी चांगले लेखन केले आहे. एक अशीही शंका मनात येते की, पूर्णवेळ लेखन करण्याएवढी अनुभवांची समृद्धता, अनुभव घेण्याची तयारी आपल्या लेखकाजवळ आहे का?
आपल्याकडे ‘स्फूर्ती’ च्या संकल्पनेला बरेच महत्त्व आहे. प्रतिभा, कल्पनाशक्तीचे अस्तित्वही आणि बळही निर्मितीसाठी आवश्यक असल्याचे सांगितले जाते. यासाठी साधे उदाहरण सांगितले जाते की, लिहिणारे पुष्कळ असतात, पण लेखक एखादाच असतो. (आमचे गुरुजी नाटय़क्षेत्राचा संदर्भ देऊन असेही सांगायचे की, सदाशिव अनंत शुक्ल अनेक असतात, राम गणेश गडकरी एखादाच असतो.) केशवसुतांनी बराच विचार केला होता. निर्मितीच्या प्रेरणा आणि त्यात अडथळा आणणारा रूक्ष जीवनव्यवहार अशी मांडणी त्यांनी आत्माराम आणि आका (म्हणजे मालक.. हा तोच क्या हुक्म है मेरे आका..) या रूपकातून केली होती. ‘स्फूर्ती’ ही कविताही लिहिली, पण याच वेळी, दुसरे एक महान कलावंत (आणि लेखकही) आर. के. लक्ष्मण यांचे ठाम प्रतिपादन आणि ‘स्फूर्ती’ या संकल्पनेची खिल्ली उडवणारी वाक्ये मला आठवतात- ‘I don’t wait for inspiration. Inspiration has to come. I dont recognise any such thing as the writers block. It is a western concept made for lazy people.’ ‘जंटलमन’ इंग्रजी नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत लक्ष्मण यांनी अनेक प्रश्नांना या शैलीत उत्तरे दिली होती.
विजय तेंडुलकरसुद्धा एका कमी प्रसिद्ध अशा छोटय़ा हॉटेलमध्ये एक खोली घेऊन, टेबलवर कोरे ताव आणि हातात पेन घेऊन तासन्तास बसायचे. ‘ती’ (म्हणजे स्फूर्ती) येईल तर एकांतातच येईल, गदारोळात किंवा कोलाहलात भेटणार नाही. हीही एक (रास्त अशी) भूमिका त्यामागे असावी.
पण ती सर्वाना भेटत नाही. संतांनी निर्मितीचे श्रेय देवाला दिले. त्यांच्या मनोवृत्तीशी, भूमिकेशी, काळाशी ते सुसंगत होते. आतादेखील अनेक जण आपण लिहू शकतो ही दैवी कृपा आहे, असे मानतात. जे देव मानत नाहीत, ते निसर्गाला, विज्ञानवादी रक्तातून उतरलेल्या गुण सूत्रांना श्रेय देतात. काही जण महामानवांना तर काही जण अनुभवांना, काही जण राजकीय-सामाजिक-वैचारिक संस्कारांना श्रेय देतात. पण कोणत्या तरी स्वरूपात निर्मितीला कारणीभूत ठरणारा निर्मिक असतो असे अनेकांना वाटत राहते. नाही काही तर ‘प्रेम’, ‘मैत्र’ हे वैश्विक गुणसूत्र असतेच.
संत महिपती बाबांच्या काव्यपंक्ती अशा आहेत-
चौदा विद्या चौसष्ट कळा।
अवगत असल्या जरी सकळा।
परी चित्ती नसली एक प्रेमकळा।
तरी त्या विकळा अवघ्याचि॥
विविध विचार, विविध सिद्धांत आणि विविध उपपत्ती. पण ठाम अशी कोणतीही एक-सर्वाना लागू होईल अशी नाही. काही सिद्धांत लेखकाच्या प्रकृतीधर्मानुसार मांडले जातात. काही त्या त्या काळापुरते असतात. पण शेवटी आत्मानुभव आणि जगदानुभव खरा. तो ज्याच्या त्याच्यापुरता सत्य.
आता पाहा ना- दु:खातून, प्रेमभंगातून उत्कट प्रेमकविता निर्माण होतात असे सर्व साधारणपणे मानले जाते. प्रेमकविता निर्माण होतात असे सर्व साधारणपणे मानले जाते. फसवणूक केली प्रेयसीने तर विश्वासघात मानला जातो आणि मर्ढेकर ‘शिशिरागम’ शीर्षकाने असफल प्रेमाच्या सुंदर कवितांची एक मालिकाच लिहून काढतात.
आणि गोविंदग्रज तर त्रागा आणि वैताग यांनी तापलेल्या ओळी लिहून प्रेयसीवर दोषारोप करतात-
केल्या ज्याच्या पायघडय़ा मी
तुझ्या पावलांसाठी
तुडवून गेलिस त्या हृदयाला
नटव्या थाटापाठी
होईल होईल वाटत होते
तेच शेवटी झाले
नाव घेतल्यावाचून आता
मनात झुरणे आले.
पण एक ख्रिस्तोफर लेव्हनसन नावाचा कॅनडाचा कवी होता. (अजूनही असावा?) त्याला भारताविषयी खूपच प्रेम आणि जिव्हाळा वाटत असे. ‘India has entered my blood. I am a carrier’- असे तो म्हणायचा. त्याने when are the best love-poems written हे सांगताना असे म्हटले आहे की -‘I think best love-poems are written, not necessarily when one is betrayed, but perhaps when one is unsure of a relationship… I think my best love-poems are those, when I have been in the process of working towards a relationship and have been hoping to make it permanent, rather than when I actually was in one.’ तर असे
हे व्यूह निर्मितीमागचे, त्यावरचे एकेकाचे भाष्य. वेगवेगळे पण प्रामाणिक असे. आपण वाचतो त्यामागची ही लेखनाचा
कस आजमावणारी गुंतागुंतीची प्रक्रिया. कधी कधी
भल्या भल्यांना गुंगवणारी, कधी अतक्र्य वाटणारी, कधी चकवा देणारी.
सदानंद रेगे नावाचे एक अफलातून कथाकार आणि कवी होते. त्यांची एक सोपी आणि सहज ‘वाटणारी’ कविता आहे. पण सोपे लिहिणे खूप अवघड असते असे जाणकार सांगतात. काय ते ठरवा-
‘तृप्त’
श्रावणातले ऊन
आज कसे सुखावले आहे!
लोभस अल्लड हिरवळीवर
केव्हाचे ते लोळत आहे!
चांदणीचे फूल
आज कसे तृप्तावले आहे!
नितळ निथळ ओढणीआडून
खटय़ाळ कसे हसते आहे!
सगळेच अगदी
आज कसे ओथंबले आहे!
वर्गात नवी मुलगी यावी
तसे.. तसे वाटत आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा