पुढय़ात कोरा कागद. पांढराशुभ्र. साधी कुठं मुडपल्याचीही खूण नाही. हातात अधीर झालेला पेन. डोक्यात सैरभैर संदर्भ. तुडुंब भरलेल्या विहिरीच्या काठावर आपण उभे आहोत असं वाटतंय. कुठल्याही क्षणी देहाचा बाण या पाण्यात खुपसला जाईल. पाण्याचा पृष्ठभाग विस्कटेल. उडी मारणारा ऐपतीप्रमाणे तळाच्या दिशेनं जाईल. पाण्यावर बुडबुडे उठतील. फुप्फुसात रोखून धरलेल्या श्वासावर नियंत्रण आहे तोपर्यंतच निथळत्या देहानं पाण्याला दुभंगून तो वर येईल. तेव्हा त्याच्या मुठीत विहिरीच्या तळाचा गाळ असेल की नाही माहीत नाही. पण तळाच्या दिशेनं जाण्याच्या प्रयत्नाचं समाधान चेहऱ्यावर असेल.
आता या पांढऱ्याशुभ्र ध्यानस्थ कागदावर एक साधी रेष मारून मी दुभंगू शकतो त्याची घनघोर शांतता. पांढऱ्या पटलावर फक्त एक काळ्या रंगाचा शब्द ठेवला तर विस्कटून जाईल पांढरं अवकाश. नंतर तर काळ्या मुंग्यांसारखे तरातरा पळतील शब्द कागदावर. शब्दांच्या थारोळ्यात कागद नीट दिसणारही नाही. पांढराशुभ्र प्रदेश ताब्यात घेतील वळवळणारे शब्द. या लौकिक जगात प्रत्येकाला नाव असतं. नसलं तर द्यावं लागतं. म्हणून या काठोकाठ भरलेल्या शब्दांच्या माथ्यावर एक शीर्षकाचं झुंबर टांगलं जाईल. पायथ्याशी पांढऱ्या पटलात बुडी मारणाऱ्याचं.. म्हणजे लेखकाचं नाव चिकटवलं जाईल. असा सज्ज होईल शब्दांचा खेळ. आता तो शब्दांची मांडामांड करणारा आहे ना, त्याला तिथून उठवलं जाणार, किंवा तो स्वत:च बाजूला होईल. कारण हे मांडलेले शब्द वेचणारे आता येतील. मन:पूर्वक शब्द वेचणारे हे लोक मनाशी मांडतील प्राप्तीचा हिशेब. म्हणजे हे सारं वाचून आपल्याला काय मिळालं? बऱ्या-वाईट प्रतिक्रिया उमटतील. हाच खेळ सुरू आहे पुन्हा पुन्हा.
स्वत:ची आदळआपट आणि शब्दांची मांडामांड करणारा लेखक लिहितो म्हणजे काय करतो? स्वत:ला खोदतो खोल खोल. पाठलाग करतो अव्यक्ताचा. एकेका अनुभवाला गाठतो खिंडीत. पकडू पाहतो शब्दात. नदीत खेळताना चिंगळे मासे लक्ष वेधून घ्यायचे. नदीच्या प्रवाहापासून हे मासे गती शिकलेत, की या माशांपासून प्रवाह गतिमान झालाय, असा प्रश्न पडावा एवढं चैतन्य होतं ते. स्वाभाविकच या चिंगळ्या माशांच्या आकर्षणातून अनेक खटाटोपी सुरू व्हायच्या. सुरुवातीला पाण्यात बगळ्यासारखं शांत उभं राहून एकदमच चिंगळ्यांच्या घोळक्यावर झडप घालायची. प्रत्येक वेळी ओंजळ रिकामीच. या धिंगाण्यात कपडे ओले व्हायचे. मग चक्क अंगातला शर्ट काढून मासे पकडण्याचे अथक प्रयत्न सुरू व्हायचे. दोघांनी जाळ्यासारखा शर्ट धरून एकदम बंद करायचा. एखादा चिंगळा मासा सापडायचाही. पण त्याची वाळूवर ठेवल्यानंतरची जीवघेणी तडफड पुन्हा एकदा त्रासदायकच होती. पाठलाग थकवणारा असला तरी हवाहवासा होता. प्राप्तीचा विचार करतोयच कोण? आपण जाळ्यात सापडलेल्या गमकाचं जुळवत बसतो यमक. पण तरीही प्रश्न उरतोच. पुन्हा पुन्हा पांढऱ्याशुभ्र कागदावर का पसरवतो शब्द? का टाकून बसतो जाळं एखाद्या अनुभवाच्या प्रतीक्षेत? का लिहितो लेखक-कवी? इथं मात्र पु. शि. रेग्यांच्या शब्दांना मी पुढं करीन-
‘पक्षी गात नाही
आपल्या सीमांची कक्षा घोषित करतो,
सिंह डरकाळ्या फोडीत नाही
आपली हुकुमत कुठं कुठं आहे ते
बजावून सांगतो,
हत्ती झाडांना अंग घाशीत नाही
आपल्या प्रदेशाच्या खुणा ठरवून देतो..’
लेखकाला- कवीलाही आपल्या आवाक्यातला प्रदेश उजागर करायचा असतो. शब्दांचे पूल बांधून पोहोचायचं असतं अज्ञाताच्या प्रदेशात. घ्यायची असते मनाच्या खोलपर्यंत धाव. ही धाव थकवणारी असते. लुकलुकणारे दिवे दिसतात, पण गाव येतच नाही. शोध कशाचाही असो; धावणं सुरूच असतं. बऱ्याचदा धावपट्टय़ा त्रासदायक ठरतात. अगदी परवाची ताजी घटना. मुलीच्या शाळेत ‘स्पोर्ट्स डे’ होता. मुद्दाम वेळ काढून जाणार होतोच. पण ताकीदही दिली गेलेली- ‘‘बाबा, आला नाहीस तर बघ हं. आणि नुस्ता येऊन बसू नकोस. आमच्या ‘अ‍ॅक्वा’ ग्रुपसाठी चिअरिंग करायची.’’ भल्या सकाळी साडेसातला निघून लगबगीने पालकांसाठीच्या कक्षात जाऊन बसलो. एकूण कार्यक्रम भव्यदिव्य होता. उत्तम नियोजन होतं. स्पर्धक मुलं-मुली जिद्दीनं खेळत होते. बँड वाजत होता. झेंडे फडकत होते. आधीच्या फेऱ्यांतून निवडले गेलेले स्पर्धक असल्यामुळे खेळ रंगत गेले. काही हरत होते म्हणून काही जिंकत होते. जल्लोष वाढत होता. पालकांसाठी टाकलेल्या टेन्टला झुगारून ऊन आत येऊ लागलं. चुळबुळ सुरू झाली. काहींनी जागा बदलल्या. काही हातातल्या मोबाइलमध्ये गर्क होते. समोरच्या गेमपेक्षा मोबाइल गेमला त्यांनी प्राधान्य दिलेलं होतं. काहींचा व्यवहारही सुरू होता, ‘‘नहीं भाई, कल दस हजार भेज देना. बाकी मैं देख लुंगा.’’
त्या गर्दीत एक जुना मित्र भेटला. त्याचीही मुलगी पळण्याच्या स्पर्धेत होती. सगळीच मुलं आपापल्या टेन्टमधून आई-वडिलांना हात दाखवत होती. गणवेशात सारख्याच दिसणाऱ्या मुलांत आपापल्या पाल्याला दुरून शोधण्याचा प्रयत्न पालक करीत होते. हिंदीतल्या विनोदी कविसंमेलनात बोलल्यासारखं बोलणारे निवेदक-शिक्षक हक्काने टाळ्या वसूल करीत होते. कॉर्डलेस हाती घेऊन मैदानात फिरणारे निवेदक लीलया राष्ट्रभाषा शिंपडत होते. या धुंवाधार हिंदी निवेदनापुढं इंग्रजी निवेदनाची गोगलगाय झालेली. आता प्रतीक्षा होती मुलींची स्पर्धा सुरू होण्याची. तेवढय़ात मित्राच्या मुलीचं नाव घोषित झालं. लांबवरून आम्ही पाहत होतो. मित्राची मुलगी इतर स्पर्धकांबरोबर ट्रॅकवर उभी. बँडच्या तालात झेंडे फडकतायत. निवेदकाचा जोश वाढलेला. मित्राच्या मुलीचा जिंकायचा निश्चय होता. मित्राबरोबरच माझीही धडधड वाढली. ‘लेट सेट गो’चा खटका वाजला. मुली बेफाम पळत सुटल्या. मित्राची मुलगी सुरुवातीपासूनच समोर होती. निर्विवादपणे ती प्रथम होती. स्पर्धेच्या जोशात आम्ही खुर्चीतून उठून उभे राहिलो होतो. तिच्या गटाची मुलं आत आली. जल्लोष केला. मित्राच्या आत असलेल्या बापाचे डोळे भरून आले. त्याची मुलगी जिंकली होती. तिला एक चिंगळा मासा सापडला होता. तिच्या परीनं तिनं पांढऱ्याशुभ्र कागदावर रेष मारली होती. पण हा आनंद फार वेळ टिकला नाही. टप्प्याटप्प्यानं पारितोषिक वितरण होतं. मैदानातच एक, दोन आणि तीन लिहिलेला ठोकळा ठेवला गेला. मित्र मोबाइलमधला कॅमेरा सरसावून उभा राहिला. मुलीच्या गळ्यात गोल्ड मेडल घालतानाचा क्षण त्याला टिपायचा होता. घोषणा झाली. तिसरं पारितोषिक.. दुसरं पारितोषिक आणि प्रथम पारितोषिक. कॅमेरा सरसावलेला. धडपड. चिंगळा मासा सापडल्याचा विजयी क्षण. पण दुसरंच नाव उच्चारलं गेलं. पेनसारखी अधीर मुलगी जागीच रडायला लागली. आठ वर्षांचं वय. खरं तर बेफाम पळण्याचा आनंद घेऊ पाहणाऱ्या या पोरीला आम्ही स्पर्धेत उतरवलंय. तिला हरण्याचा आनंद घेऊच दिला नाही. फक्त जिंकायला सांगितलं. खरं तर ती जिंकलीही होतीच. त्यामुळे प्राप्त निकाल स्वीकारणं आम्हालाही अवघड होतं. मुलीला समजावलं, पण तिचं रडणं थांबेना. शेवटी आम्ही तिच्या सरांना भेटलो. संबंधित पंचांना भेटलो. त्यांनी मार्कशीटच दाखवली. मित्राची मुलगी पहिलीच होती, पण तिचा पाय ट्रॅकबाहेर गेल्यामुळे ती बाद झाली होती. मनात विचार आला. असंच होतं की पांढऱ्याशुभ्र कागदावर शब्दांची मांडामांड करणाऱ्यांचं. हात उंचावून विजयी मुद्रेनं ‘यमक्या’ जेव्हा फिरत असतो तेव्हा ‘गमक्या’चा पाय ट्रॅकबाहेर गेलेला असतो. यमक जिंकतं, गमक हरतं. अशावेळी शब्द वेचणारे मायाळू लोक म्हणतात, ‘‘पांढऱ्याशुभ्र कागदावर शब्दांची मांडामांड करणाऱ्यांनो, काढा दंडबैठका. लावा पुन्हा एकदा जोर. लावा कौल शब्दांना. अर्थाच्या घसरडय़ा अंगणात घट्ट असू द्या पाय तुमच्या शब्दांचे. उठा, पुन्हा पाठलाग करा.’’ शब्दांची मांडामांड करणारा उठतो आणि नव्या उमेदीनं पुन्हा मारतो उडी- पांढऱ्याशुभ्र कागदाच्या तळाशी. बुडबुड बुडबुड.
किती तरी वेशांत, रूपांत भेटतात शब्द. सोन्याच्या रत्नजडित पेनमधून उमटली म्हणून ती सुवर्णाक्षरं नसतात. उलट, दगडी खांबाला टेकून उच्चारलेले शब्द, नाका-तोंडात पाणी जाईपर्यंत पाण्यात बुडवलेले शब्द अक्षय असतात. ओवीमध्येही शब्द असतात. शिवीमध्येही शब्द असतात. बिचारे वापरले जातात हवे तसे. मुख्य बसस्थानकातून बस सुटली आणि सिडकोच्या स्थानकात येऊन थांबली. एक तरुण मुलगा बसमध्ये चढला. ड्रायव्हरच्या सीटला पाठमोरं उभं राहून त्यानं बसच्या टपाला वाजवलं.. ‘भाईयो और बहनो.. बंधू आणि भगिनींनो, इकडे लक्ष द्या. हिंदूला राम राम. मुस्लीम को सलाम. नमस्कार. जय भीम. सत् श्री अकाल.. मोबाइल थोडा वेळ बाजूला ठेवाल? झोपले असाल तर जागे व्हा. जागे असाल तर स्वप्न पाहा. स्वप्न उतरणार आहे सत्यात. चार बाण एका भात्यात. केस असणाऱ्यांनी स्वत:साठी घ्या. केस नसणाऱ्यांनी सप्रेम भेट द्या. वीस रुपयांत चार कंगवे. कंपनीच्या प्रचारासाठी. भांगाबरोबर खरारा.. बाजीरावचा दरारा..’’ असं काय काय अफलातून बोलत होता. अप्रतिम शब्दफेक. चेहऱ्यावर प्रसन्न भाव. तिघा-चौघांनी कंगवे घेतलेही. कंडक्टर आला. त्याला खाली उतरवलं. हाच मुलगा पुन्हा दोनदा भेटला. एकदा कानटोप्या विकत होता. त्याच्याशी थोडं बोलणं झालं. राज्यशास्त्रात एम. ए. झालेला. शिवाय नाटय़शास्त्राचा डिप्लोमा केलेला. नोकरी नाही. दुष्काळी गावातून आलेला होता. नाही मिळाला त्याच्या स्वगताला प्रकाशमान होणारा रंगमंच; म्हणून काही त्याचे शब्द थांबले नाहीत. त्यानं पाठलाग थांबवला नाही. ‘जगावं की मरावं?’ असा संदेह नाही. जगायचंय. पुन्हा पुन्हा उधळायचेत शब्द. पाठलाग करायचाय चिंगळ्या माशांचा.
‘ऐल राहू
पैल जाऊ
पात्र सारे कोरडे
झाड लावू
झाड राखू
सावलीला का तडे
शब्द देऊ
शब्द घेऊ
अर्थ कोठे सापडे’
भाईयो और बहनो.. बंधू आणि भगिनींनो, आता इथंही बस सुटायची वेळ झालीय. कंडक्टर घंटी वाजवेल. मला उतरवून देण्याआधीच मी निमूट उतरून जाईन. पण सांगायला विसरू नका कंगव्याचा रिझल्ट. भांगाबरोबर खरारा.. बाजीरावचा दरारा. कुठलीही वस्तू निरुपयोगी नसते. या कंगव्याने चांगला भांग नाहीच निघाला, तर पाठ खाजवा. नाराज होऊ नका. माल कंपनीचा आहे. फक्त शब्द आपले आहेत. चिंगळा मासा जाळ्यात सापडण्यापेक्षाही त्याचा पाठलाग करण्यात अधिक मौज आहे. जमली तर मैफल, नाही तर रियाज. रियाजच मनस्वी असतो. मैफिलीवर अंकुश असतो ऐकणाऱ्या लोकांचा. नाकात वारं शिरल्यासारखं पळणं खरं असतं. पिसाळलेला कुत्रा होऊन स्पर्धा मागे लागते तेव्हा पळण्याचा आनंद मिळत नाही. नुस्ती दमछाक होते. म्हणून मला ट्रॅकमध्ये पळून मेडलसाठी जिंकायचं नाही. ट्रॅक सोडून पुन्हा पाठलाग कराचाय चिंगळ्या माशांचा. प्राप्तीचं बघू पुढच्या योजनेत. पुढचा खेळ पुढच्या गावात. नवा माल जुन्या भावात. भेटू या. ल्ल
दासू वैंऋ- dasoovaidya@gmail.com (समाप्त)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा