खिडकी उघडली. बाहेर टपून बसलेला थंडगार वारा अधाशासारखा आत घुसला. रात्रभरच्या प्रवासानं आंबलेलं अंग ताजंतवानं झालं. चढउताराचा वळणदार रस्ता होता. ड्रायव्हरमामांनी टेप बंद केला. मंद दिवा तेवत राहावा तशी त्यांच्याच आवडीची हिंदी गाणी रात्रभर सुरू होती. मी आपला ड्रायव्हरशेजारच्या सीटवर टक्क जागा.. तर कधी पेंगत बसलेलो होतो. गाव जवळ येताना विशिष्ट खाणाखुणा दिसायला सुरुवात होते. तसं पहाट होताना वातावरणात ओळखीचे बदल जाणवायला लागतात. थंड हवेत पहाटेचा एक वास पसरतो. फार कमी वेळा ही पहाटेची थंड हवा आपण अंगावर घेतो. बहुतांश वेळी या रामप्रहरी आपण साखरझोपेत असतो. म्हणूनही या वेळेचं अप्रुपवाटतं. पाखरं मात्र या थंड हवेच्या अलार्मला दाद देऊन किलबिलायला लागतात. हा पक्ष्यांचा आवाज सुरू असताना अंधार वितळायला सुरुवात झालेली असते. एखाद्या खोडकर पोरानं लाल शाईची दौत सांडून द्यावी तसा लाल रंग आकाशात पसरू लागलाय.. म्हणजे तांबडं फुटलंय. रंगमंचावर हळूहळू प्रकाश उजळताना पात्रं, वस्तू स्पष्ट व्हाव्यात तसा भोवताल उजळू लागलेला होता. एका उतारातून वर चढाला लागल्यावर समोर पिवळसर प्रकाश चमकला. चढ चढून सपाट रस्त्यावर आल्यावर समोर नवथर लालबुंद गोळा चमकत होता. आईच्या उदरातून नुकतंच जन्माला आलेलं बाळ जणू बंद मुठींचे हात हलवतंय. उगवलेल्या सूर्याचं हे मोहक रूप मी मनात साठवत होतो. ड्रायव्हरमामांनी तर चक्क कृतीच केली. म्हणजे स्टेअिरगवरचे हात क्षणभर जोडून सूर्याला नमस्कार केला. त्यांनी मलाही रामराम घातला. मीही रामराम करून प्रतिसाद दिला. चांगलं उजाडलं होतं. रांगत घरभर हुंदडणाऱ्या लेकरासारखा प्रकाश आता धीट झालेला होता. अजून आमचा ठेपा यायला तीनेक तास बाकी होते. काहीच करता येत नसेल तेव्हा किमान आपण विचार करू शकतो. अंगावर पडलेलं कोवळं ऊन खात बसल्या जागी मी सूर्याचा मोहक लालबुंद गोळा आठवत होतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा