सकाळीच एकेकजण घराबाहेर पडायला सुरुवात होते. सगळ्यात शेवटी नंबर माझा. दरम्यान पेपरवाला, कचरेवाला, दूधवाला, कामवाल्या मावशी येतात नि जातातही. म्हणजे आपण करायचं काही नसतं; फक्त लक्ष ठेवायचं असतं. अर्थातच तेच अवघड आहे. समजा- दूध तापवायला गॅसवर ठेवलं, तर आपण गॅसजवळ उभे असेतोपर्यंत ते तापणारच नाही. नेमकं काही कामासाठी म्हणून आपण गॅसजवळून क्षणभर हलतो. तीच वेळ दूध तापून उतू जाण्याची असते. उत्साह, आनंद ओसंडून वाहणं ठीकंय; पण दिवसाची सुरुवात दूध उतू जाऊन होणं म्हणजे नमनालाच दिव्यातलं तेल सांडल्यासारखं वाटतं. या पाश्र्वभूमीवर मधेच मोबाइल वाजतो, तेव्हा वाचायला घेतलेल्या पेपरची पानं फडफडत असतात. यातून वाट काढत- म्हणजे आवराआवरी करीत कसाबसा तयार होतो. विद्यापीठ गाठायचं असतं. आजही त्याच लगबगीने निघालो होतो. दरवाजा लॉक करताना खांद्याला बॅगेचं वजन जाणवलं. बॅगमधला फापटपसारा कमी करण्याचा मनोमन निश्चय केला. अर्थात याआधीही कैक वेळा हा निश्चय केलेला होताच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

घाईतच गाडी काढली. गाडीत नुसरत फतेहअली खान जीव तोडून गात होते. पहिला अडथळा उड्डाणपुलाचा. कित्येक वर्षांपासून टीव्हीवर सासू-सुनेची मालिका आणि शहरात उड्डाणपुलाचं काम सुरूच आहे. या उड्डाणपुलांच्या बांधकामामुळं सगळा गावच दुरुस्तीला काढलाय असं वाटतं.

हा अडथळा ओलांडून निघालो तर पुढं रस्त्यात एक मिरवणूक. डडांग.. डडांग.. डडांग.. या मधेच वाजतगाजत निघालेल्या मिरवणुकांचं बऱ्याचदा कारणही कळत नाही. असल्या मिरवणुकांची सवय झालेली असली तरी घाईच्या वेळी रस्ता अडवण्याचा त्रासच होतो. एवढय़ा मिरवणुका सहन करणारा आपल्यासारखा दुसरा देश नसेल. खड्डे, पाइपलाईनसाठी खोदलेला रस्ता यांचा अडथळा तर अंगवळणीच पडलाय. हे सगळं मागं टाकत एकदाचा विद्यापीठ गेटमधून आत घुसलो. हायसं वाटलं. गेटपासून डिपार्टमेंट लांब असलं तरी आता अंतर्गत रस्ता होता. विशेष म्हणजे एवढय़ातच सिमेंटीकरण झालेला प्रशस्त रस्ता. मिरवणुकीतल्या रथासारखी संथ चालणारी गाडी आता मोकळ्या रस्त्यावर अंग मोकळं करून चालू लागली. पण.. चेंडू टाकण्यासाठी पळत सुटलेल्या गोलंदाजाला अंपयारचा मज्जाव करणारा आडवा हात दिसावा तसं झालं. नेमकी ऐन रस्त्यात एक कार उभी. आणि त्या कारच्या पुढं अनेक गाडय़ा उभ्या असलेल्या दिसत होत्या. आता मात्र वाट लागलेली होती. समोर लांबवर दिसणारी गाडय़ांची रांग पाहत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. सकाळची वेळ. सगळ्यांना पोचायची गडबड. आणि हा मधेच अडथळा आलेला. महानगराएवढी वाहनांच्या रांगांची अजून तरी आम्हाला नित्याची सवय नाही. कदाचित पुढं एखादा अपघात झाला असावा. पण या अंतर्गत रस्त्यावर अपघाताची शक्यता फार कमी. तरीही अपघाताचं काही सांगता येत नाही. मागे या गावात चक्क विमान आणि मालट्रकचा अपघात झाला होता. अपघातातून बचावलेल्या ट्रकचालकाने रात्री उत्तर प्रदेशात आपल्या मालकाला फोन करून बातमी सांगितली, तर फोनवर मालक म्हणाला होता, ‘बेवडे, फोन रख. सुबह होश में आने के बाद फोन करना.’ म्हणजे ‘हवाई जहाज और अपनी गड्डी का अ‍ॅक्सिडेंट हुआ है-’ ही बातमी ट्रकमालकाला काय, कुणालाच खरी वाटणार नाही. पण तसं झालं मात्र होतं. विमानतळाच्या कंपाऊंडला खेटून रस्ता. विमानाने उड्डाणं केलं त्यावेळी या रस्त्यावरून कापूस उंच रचलेला ट्रक चाललेला होता. विमानाची चाकं नेमकी कापसाला निसटती लागली. विमान कोलमडलं. पुढच्या शेतात जाऊन कोसळलं. अनेक लोक जिवानिशी गेले. तेव्हा कुठं तो विमानतळाला खेटून जाणारा रस्ता बंद झाला. सांगायचा मुद्दा- अपघात तर्काच्या बाहेर असतात. तसं आजही कुणीतरी पुढं रस्त्यात धडकलं असावं. त्यामुळं वाहतूक जाम होऊन बसली असेल. आम्ही आपले गाडीत अडकून पडलेलो.

रिकाम्या डोक्यात अनेक विचार येत होते. कदाचित पुढं रस्त्यात एखादं जुनं झाड पडलं असावं. आत्ता मागच्या उन्हाळ्यात वादळी वाऱ्याबरोबर अवकाळी पाऊस पडला तेव्हा जुनं बाभळीचं झाड ऐन रस्त्यात कोसळलं होतं. रस्ता असाच बंद झाला होता. तेवढं मोठं झाड सहजासहजी हलवणं शक्य नव्हतं. काही वेळानं तिथल्या लोकांनी फांद्या तोडून तात्पुरता रस्ता करून दिला होता. तसं आता नेमकं काय घडलंय, हे कळायला काही मार्ग नव्हता. अशा अचानक उद्भवलेल्या अडथळ्यासाठी शहरातली यंत्रणा लवकर दाद देत नाही. महामार्गावर तर आनंदीआनंदी. एकदा नांदेड- परभणी मार्गावर रात्री दहा वाजता अशीच वाहतूक ठप्प झाली. रस्त्यावर गाडय़ांची भलीमोठी रांग लागली. प्रत्येकजण एकमेकाला विचारतोय, ‘पुढं काय झालंय?’ पण नेमकं कारण काही कळेना. काहीजण गाडीत गाणी लावून निवांत बसले होते. पुढं कुठपर्यंत रांग आहे हे माहीत नव्हतं. मागची रांग मात्र वाढतच होती. अंधाऱ्या रस्त्यावर गाडय़ा ठप्प; पण वेळ मात्र पुढं पळतच होता. शेवटी आम्ही पाच-सहाजण अंदाज घेण्यासाठी पुढं चालू लागलो. समोर रस्त्याच्या कडेला छोटीशी गाववस्ती होती. गाव गाढ झोपलेलं. मिणमिणते दिवे. रस्त्यालगतच्या चहाटपरीवर गप्पागोष्टी करीत बसलेली चार-पाच तरणी पोरं होती. पुढं रस्त्यात झाड पडल्याचं त्यांनीच आम्हाला सांगितलं. नेमका या भागात अवकाळी पाऊस पडला होता. या आडरानात सरकारी यंत्रणा हलेपर्यंत सूर्य उगवला असता. म्हणून या पोरांनाच आम्ही विनंती केली. काही इनाम देण्याचंही कबूल केलं. पोरं खुशीनं तयार झाली. तासाभर लोक अडकून पडले होते. पोरांनी कुऱ्हाडी, बॅटऱ्या सोबत घेतल्या. घटनास्थळी जाऊन पडलेल्या झाडाच्या फांद्या तोडल्या. अध्र्या तासात कामापुरता रस्ता मोकळा करून दिला. आम्ही त्यांना इनाम म्हणून काही पैसे दिले. मग थांबलेल्या गाडय़ांतून मागच्या दिशेला या पोरांनी फेरीच काढली. त्यांनीही खुशीनं पैसे दिले. तुंबलेलं पाणी मोकळं व्हावं तशा हॉर्न वाजवीत, लाइट चमकवीत गाडय़ा सुसाट निघाल्या. पोरांच्या भविष्यात त्या दिवशी ‘अचानक धनलाभ’ आणि आमच्या भविष्यात ‘संकटातून सुखरूप सुटका’ लिहिलेलं असणार.

आज असं एखादं झाड रस्त्यावर पडलंय का, ते कळायला मार्ग नव्हता. सकाळची वेळ असल्यामुळं सगळेजण बाहेरून आत जाणारेच होते. समोरून कुणी येणं शक्यही नव्हतं. त्यामुळं पुढची नेमकी बातमी कळेना. शेवटी मी खाली उतरलो. समोरच्या गाडीजवळ जाऊन रेंगाळलो. खिडकी उघडी होती. अनोळखी गृहस्थ होते. मी सहज विचारलं, ‘पुढं नेमकं काय झालंय?’ ते गृहस्थ मोठय़ा आत्मविश्वासानं उत्तरले, ‘पुढं काहीतरी प्रॉब्लेम झालाय.’ हे ढोबळ उत्तर ऐकून मी गप्प बसलो. पुढं काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून तर आम्ही अडकून पडलो होतो. असं ढोबळ व निर्थक आपणही बऱ्याचदा बोलत असतो. पण अशा अडचणीच्या वेळी त्या शब्दांचा ढोबळपणा अधिक प्रकर्षांनं जाणवतो. आता माझ्या मागेही गाडय़ांची रांग वाढली होती. मागं परतायचा मार्गही बंद झाला होता.

गाडीतून वसतिगृह दिसत होतं. खरं तर गर्द झाडी असलेला हा रस्ता. दुतर्फा उंच वाढलेली झाडं वरती जाऊन एकमेकांत मिसळलेली. त्यामुळं एक हिरवा मांडव तयार झालेला. तेवढय़ा पट्टय़ात नेहमी सावली अंथरलेली. एरवी इथून जातानाही आल्हाददायक वाटतं. आज तर इथं किती वेळचा मुक्काम पडलेला. पण वेळेत पोचायच्या चिंतेमुळं सावलीही पोळू लागली. फोन लावून डिपार्टमेंटला चौकशी करावी तर जवळपास सगळेच पोहचण्यात होते. नेमके या अचानक उद्भवलेल्या ट्रॅफिक जाममध्ये अडकलेले होते. कार्यालयात पोहचलेल्यांना रस्त्यात काय घडलंय याची कल्पना नव्हती. पुढचा मार्ग बंद, मागे परतायला जागा नाही. एकूण गाडीत बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. चित्रपटात/ नाटकात एखाद्या दृश्यात नायक पेटून उठण्याचा निर्धार करतो आणि पाश्र्वभूमीवर ‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ असं एखादं गाणं तरंगत येतं. इथं तसं काही एकदम गाडीत गाणं वगैरे लागलं नाही, पण कवी ग्रेसांचे शब्द आठवू लागले..

‘पंख नाही तुला
पाय नाही मला
पाऊस हा आला वळिवाचा..’

इथं रस्त्यात झोडपणारा पाऊस नव्हता, तर रहदारी तुंबली होती. अशावेळी सलमान खान नावाचा नट ओळखीचा असायला हवा होता. तो थम्सअप्ची एक तुफानी जाहिरात करतो. त्यात दुकानातला थम्सअप्चा स्टॉक संपलाय. माल आणणारा ट्रक ट्रॅफिक जाममध्ये फसलाय. सल्लूभाई हेलिकॉप्टर घेऊन जातात. मजबूत लोखंडी दोरखंडाने फसलेल्या रांगेतला नेमका थम्सअप्चा ट्रक उचलून आणतात. एरवी अशा सुरस कल्पनांना आपण हसतो. पण ओढवलेल्या कठीण समयी अशा जाहिरातीही मनाला आश्वासक वाटतात.

दरम्यान, समोरच्या बाजूला घोषणांसारखे आवाज येत होते. तरीही नेमका अर्थबोध होत नव्हता. एव्हाना उशीर झालेलाच होता. मी मनाशी शांत राहायचं ठरवत होतो. सगळ्यांबरोबर आपण. जेव्हा केव्हा रस्ता मोकळा होईल तेव्हा जाऊ या. इथं कुठं उकळत्या तेलात पडलोय? आपण अडकून पडलो आहोत असा विचार करायचाच नाही. म्हणून जाणीवपूर्वक मी खिडकीबाहेर पाहू लागलो. वसतिगृहाची इमारत दिसू लागली. काही वर्षांपूर्वी या वसतिगृहात मी राहत होतो. रूम नं. ७! का कोण जाणे, या वसतिगृहातली संध्याकाळ मनावर कायमची कोरली गेलीय. तोटी सोडलेल्या हौदासारखं संध्याकाळी विद्यापीठ रिकामं व्हायचं. घराच्या ओढीनं विद्यापीठ गेटच्या दिशेनं गाडय़ा सुसाट निघायच्या. अंधार पडायच्या आत उरल्यासुरल्यांना घेऊन शेवटची सिटी बस निघून जायची. एखाद्या दुकानदाराने दुकान बंद करताना सर्व वस्तू झाकून ठेवाव्यात तसा अंधार विद्यापीठ कॅम्पसला झाकून टाकायचा. बुद्धलेणीपर्यंत जाणारे दिव्यांचे खांब मोहक दिसायचे. दिवसभराच्या वर्दळीने थकलेल्या इमारती शांत बसल्यासारख्या वाटायच्या. कॅम्पसमधली झाडं काळवंडून जायची. कुणीतरी गळा दाबल्यासारखा कॅम्पस शांत व्हायचा. आखडलेले रस्ते हात-पाय मोकळे करून निवांत व्हायचे. वसतिगृह पार रिकामं व्हायचं. पोरं शहर कुरतडायला बाहेर पडायची. तिन्हीसांजेला घरातल्या म्हाताऱ्या माणसाच्या सोबतीला बसून राहावं तसा मी वसतिगृहात थांबायचो. खोलीतली टय़ूब लावून आधी अंधाराला खोलीबाहेर लोटून द्यायचो. आपल्या डोळ्यासमोर संपूर्ण कॅम्पसला गिळणारा अंधार खोलीत नको वाटायचा. खिडकीत आलेली गुलमोहराची फांदी ओळखीचं हलायची. अशा वेळी मकबऱ्याच्या दिशेला एक डफ वाजू लागायचा. दुरातून ऐकू येणारा हा डफ वाजवणारा कधीच दिसला नाही. पार टेकडीच्या पायथ्याशी जाऊन शोध घेतला होता. बहुधा कोणी फकीर असावा. या डफाच्या आवाजाशी खिडकीतल्या फांदीचं हलणं जोडून द्यायचो. डफाच्या तालावर फांदीच्या हलण्याचा खेळ कितीतरी वेळ चालायचा. फांदीला आणि मलाही हटकणारं कोणी नव्हतं. ‘चल ऊठ, अंधार पडलाय. हात-पाय धुऊन घे..’ अशा आदेशानं तंद्री मोडण्याची शक्यता नव्हती. तिन्हीसांजेला कुणात तरी आभाळ भरून यायचं आणि डफ वाजायचा. कधी कधी सोबत असायच्या गाण्याच्या अस्पष्ट लकेरी. आज भर उजेडी अंधारानं माखलेला तो डफ आणि गाण्याच्या लकेरी आठवायची गरज नव्हती. पण या वसतिगृहाशी त्या डफाचं जोडलं जाणं मला विलग करताच आलं नाही.

अचानक मागं-पुढं गाडय़ा स्टार्ट झाल्याचे आवाज आणि हॉर्न वाजू लागले. याचा अर्थ पुढचा अडथळा दूर झाला होता. बांधून ठेवलेलं वासरू साखळी सोडल्याबरोबर चारी पायांवर उधळावं तशा गाडय़ा सुसाट सुटल्या. तासभर दम धरला, पण आता क्षणभरही वेळ नव्हता. रस्ता नेमका का बंद झाला होता, याचं उत्तर निघायच्या गडबडीत मिळालंच नाही. रास्ता रोकोचं खरं कारण नंतर शिपायाकडून कळलं. वसतिगृहातील खानावळवाल्यांनी पोरांना शिळं वरण दिलं होतं. त्यामुळं विद्यार्थी भडकले होते. शिळ्या वरणाच्या भांडय़ासह येऊन रस्त्यावर बसले होते. रस्ता अडवला होता. प्रशासनाकडून दखल घेतल्याशिवाय विद्यार्थी रस्त्यातून उठलेच नाहीत. विद्यार्थ्यांनी तासभर वाहता रस्ता अडवला यापेक्षाही त्यांना शिळ्या गोष्टींचा वास येऊ लागलाय, हे जास्त खतरनाक आहे. कारण उद्या या विद्यार्थ्यांना शिळ्या संशोधनाचा, शिळ्या अभ्यासक्रमाचा, शिळ्या नोटस्चा, शिळ्या गुणवत्तेचा, शिळ्या निवड समितीचा आणि शिक्षण क्षेत्रातील शिळ्या राजकारणाचाही वास येऊ शकतो. त्यावेळी हे विद्यार्थी कोणकोणता मार्ग अडवतील ते सांगता येणार नाही.
दासू वैद्य – dasoovaidya@gmail.com