नरेंद्र भिडे – narendra@narendrabhide.com

लहानपणापासून आपण अनेकदा गणपतीची आरती ऐकली आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेली, अत्यंत प्रासादिक अशी चाल आणि लताजींचा अप्रतिम सूर.. याचबरोबर एक गोष्ट नेहमीच आकर्षित करत राहिली, ती म्हणजे आरती आणि ‘घालीन लोटांगण..’ संपल्यानंतर जी मंत्रपुष्पांजली ऐकू येते तो आवाज (जो लहानपणापासून खूप मोहित करत आला आहे.) म्हणजे अत्यंत स्पष्ट शब्दोच्चार, धीरगंभीर वाणी आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले पठण! कुणाचा आवाज आहे हा, हे बऱ्याच जणांना माहीत नसेल. ते आहेत ज्येष्ठ संगीतकार आणि कवी यशवंत देव!

Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “मी शब्दांत शूर, पण सुरात असूर”, मुख्यमंत्र्यांच्या विधानाने हशा; म्हणाले, “लोकांचा गैरसमज होतो की…”
yavatmal ashok uike loksatta news
यवतमाळ : शिस्तप्रिय भाजपमध्ये धुसफूस…मंत्र्याच्या सत्कार समारंभातच…
opposite nature partner
विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?
Pankaj bhoyar vidhan sabha
“आज जितक्या संघटना मंत्र्यांचा सत्कार करताहेत त्या माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या असत्या तर…”, भाजप नेत्याच्या मनातले अखेर…
29 559 sarees are still pending in saree distribution scheme of Mahayuti
आचारसंहिता संपूनही मोफत साडी वाटपास मुहूर्त लागेना, उत्तर महाराष्ट्रात २९ हजार साड्या पडून
Navri Mile Hitlarla
Video: “मेरी दिल की…”, एजे-लीलाचा रोमँटिक अंदाज; प्रोमो पाहताच नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाले, “आमच्या भावनांशी…”

देवकाकांबरोबर मी जे थोडंफार काम केलं त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की, मराठी शब्दोच्चारांबाबत एवढा आग्रही असलेला दुसरा संगीतकार मी बघितलेला नाही. देवकाका स्वत: उत्तम संस्कृत जाणत होते आणि संस्कृतमधील शब्दांच्या उच्चारांचे काटेकोर नियम मराठीतसुद्धा लागू करण्याबाबत ते अतिशय आग्रही असत. आम्ही प्रशांत दामले यांच्याकरता ‘कॉफी हाऊस’ नावाचा एक अल्बम केला होता- ज्याच्या संगीत संयोजनाची जबाबदारी माझ्यावर होती. त्यात एका गाण्यामध्ये ‘पाऊस आला घरांवर’ अशी ओळ होती. कुणीही ही ओळ म्हणताना ‘घरांवर’ या शब्दाचा उच्चार ‘घरान्वर’ असा केला असता; परंतु देवकाकांना हे मान्य नव्हते. ‘व’ या अक्षराच्या आधीच्या अक्षरावर अनुस्वार आल्यामुळे ‘घरांवर’चा उच्चार ‘घराव्वर’ असावा याबाबत ते ठाम होते. आम्ही त्यांना सुचवलं.. सध्याच्या बोलीभाषेमध्ये हे असं कुणी म्हणत नाहीत. परंतु त्यांनी ऐकलं नाही. शब्दांचे उच्चार शास्त्रशुद्ध पद्धतीनेच व्हायला हवेत, यात त्यांना तडजोड अजिबात मान्य नव्हती.

त्यामानाने संगीत देताना सुरांच्या आणि संगीतातील इतर गोष्टींबाबत मात्र ते बरेचसे लवचीक असायचे. सुरापेक्षाही अभिव्यक्तीला किंवा भावनेला त्यांनी कायमच जास्त महत्त्व दिले. त्यातूनच त्यांनी शब्दप्रधान गायकीचा अतिशय हिरीरीने पुरस्कार केला. गाणे रचताना त्यातील शब्दांना अर्थाच्या दृष्टीने न्याय मिळालाच पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. त्यातूनच त्यांनी ‘शब्दप्रधान गायकी’ नावाचं एक अत्यंत सुंदर आणि कुठल्याही संगीतकाराने वाचायलाच हवं असं पुस्तक लिहिलं. मला स्वत:ला त्यांचा ‘शब्दप्रधान गायकी’चा सिद्धान्त फारसा मान्य नव्हता.. म्हणजे मला तो वेगळ्या पद्धतीने अभिप्रेत होता. त्यामुळे बऱ्याचदा संगीत हरवतं आणि रसहानी होते असं मला वाटायचं. मी त्यांना म्हणालो, ‘कवी जेव्हा चालीत काव्यवाचन करतो तेव्हा आपण त्याच्या काव्याकडे जास्त लक्ष देतो. सुरांनी तिथे बॅकसीट घेतलेली असते. तसंच गाणं ऐकताना स्वरांना जास्त महत्त्व द्यावं. आणि कवितेने सांगीतिक मूल्यांवर कुरघोडी करावी, हे मला बरोबर वाटत नाही.’ माझं हे मत मी त्यांना सांगितलं तेव्हा ते गोड आणि दिलखुलास हसले. पण तरीही ते पुस्तक अत्यंत वाचनीय आणि आणि अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने देवकाकांनी लिहिलं होतं याबद्दल दुमत असूच शकत नाही. मराठीतील विविध संगीतकारांच्या कार्याचा घेतलेला आढावा आणि स्वत:च्या मतांची अत्यंत चपखल उदाहरणं देऊन केलेलं मतप्रदर्शन याकरता हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असणे अत्यंत आवश्यक आहे, हे मात्र शंभर टक्के !

देवांनी मराठी नाटकांसाठी पाश्र्वसंगीत विपुल प्रमाणात केलं. ‘सं. बावनखणी’, ‘सख्खे शेजारी’, ‘पुन्हा शेजारी’ व ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या नाटकांचं त्यांचं संगीत अतिशय गाजलं. समकालीन मराठी संगीतकारांनी चित्रपट आणि नाटकांसाठी गाणी स्वरबद्ध करण्यापुरतं स्वत:ला मर्यादित ठेवलं होतं; परंतु त्याच काळात विपुल गीतरचना आणि त्याचबरोबर त्या गाण्यांचं संगीत करण्याबरोबरच मराठी व्यावसायिक नाटकांना पाश्र्वसंगीत देणं हा एक अत्यंत वेगळा प्रकार देवकाकांनी हाताळला. पाश्र्वसंगीत करण्यासाठी एक वेगळी मानसिकता लागते. गाणी तयार करताना जो विचार केला जातो तो इथे उपयोगी पडत नाही. त्यात देवकाका हे काही संगीत संयोजक नव्हते. आणि ‘म्युझिक प्रोग्रॅमिंग’ नावाचा प्रकार त्याकाळी फार अस्तित्वात नव्हता. अशा परिस्थितीत शब्दप्रधान गायकीला अत्यंत महत्त्व देणारे देवकाका यांनी हे शब्दविरहित पाश्र्वसंगीत कसं केलं असेल याचा विचार करून अत्यंत आश्चर्य वाटतं.

परंतु अशी आव्हानं हसत-खेळत स्वीकारणं हे देवकाकांच्या स्वभावातच होतं. त्यांच्यामध्ये कुठलीही भीती नसलेला एक लहान मुलगा दडलेला होता. ही निरागसता त्यांनी शेवटपर्यंत जपली आणि त्यांच्या सर्व रचनांमध्ये ती दिसून येते. अरुण दाते यांच्याबरोबर देवकाकांनी अतिशय लोकप्रिय गाणी तयार केली.. जी पन्नास वर्षे स्वत:चं स्थान टिकवून आहेत. अरुण दाते हे खरं म्हणजे खूप कसलेले शास्त्रीय गायक नव्हेत. गायक म्हणून त्यांना बऱ्याच मर्यादा होत्या. परंतु अतिशय तरल आवाज, लोभसवाणा कंप आणि ज्यांचे गाणे ऐकून आपल्यालाही ते गाता येईल असं समाजातील सर्वाना वाटणं, ही त्यांची बलस्थानं. हिंदी चित्रपटांत मुकेश या गायकाबाबत असंच काहीसं होतं. हा त्यांचा गुण लक्षात घेऊन देवकाकांनी अरुण दाते यांच्याकरता चाली रचल्या आणि अवघ्या महाराष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतलं. ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘अखेरचे येतील माझ्या’, ‘जेव्हा तिची नि माझी’, ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘या जन्मावर.. या जगण्यावर’ आणि ‘डोळ्यात सांजवेळी’सारखी बहारदार गाणी या जोडीने मराठी रसिकांसमोर सादर केली. मंगेश पाडगांवकर, यशवंत देव आणि अरुण दाते या तिघांनी मराठी भावसंगीताच्या लोकप्रियतेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं, हे निर्विवाद.

प्रत्येक संगीतकाराचा एक आवडता राग असतो.. ज्यामध्ये तो आपली बरीच गाणी तयार करतो. देवकाकांचा पण एक निराळाच आवडीचा राग होता. म्हणजे कुठला ठराविक राग नव्हे, पण ठराविक दोन-तीन रागांचं मिश्रण त्यांच्या गाण्यांमध्ये खूप वेळा दिसतं. आसावरी अथवा जौनपुरी आणि किरवाणी यांच्या सीमारेषेवर रमणारी चाल आणि त्यात हळुवारपणे येणारा शुद्ध धैवत आणि शुद्ध गंधार हा यशस्वी फॉम्र्युला देवकाकांनी अनेक गाण्यांमध्ये वापरला. देवकाकांच्या संगीत दिग्दर्शनात बाबूजींनी गायलेली तीन अप्रतिम गाणी आहेत : ‘अशी पाखरे येती’, ‘कधी बहर, कधी शिशिर’ आणि ‘तुझे गीत गाण्यासाठी’! पण गंमत पाहा! ही तिन्ही गाणी वर उल्लेख केलेल्या खास यशवंत देव थाटाची आहेत. इतकी, की एका गाण्यात मुखडय़ानंतर दुसऱ्या गाण्याचा अंतरा गायला तर प्रथम ऐकणाऱ्याला कळणार पण नाही, की ही दोन भिन्न गाणी आहेत. पण या थाटात देवकाका खूप रमलेले दिसतात. थोडय़ाफार प्रमाणात अरुण दाते यांनी गायलेलं ‘दिवस तुझे हे फुलायचे’ आणि ‘अखेरचे येतील माझ्या’ ही दोन्ही गाणीही त्याच वळणाची आहेत. परंतु या पाश्र्वभूमीवर देवकाकांनी काही शास्त्रीय रचना अशा पद्धतीने मांडल्या आहेत, की त्यांची आधीची प्रतिमा पूर्णपणे पुसली जाते. कवी अनिल यांची एक दशपदी आहे.. ‘कुणी जाल का, सांगाल का’ किंवा ‘वाटेवर काटे वेचीत चाललो..’ ही दोन्ही गाणी वसंतराव देशपांडे यांनी अप्रतिमच गायलेली आहेत. परंतु आपला नेहमीचा कम्फर्ट झोन सोडून देवकाका जेव्हा या पद्धतीची गाणी रचतात तेव्हा ते खूप सुखावणारे असते. रामदास कामत यांच्याबरोबर देवकाकांनी फार अप्रतिम गाणी केली. ‘देवा तुझा मी सोनार’, ‘निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे’, ‘जन विजन झाले आम्हा’ किंवा मला सगळ्यात आवडणारं ‘हे आदिमा.. हे अंतिमा’ ही काही उल्लेखनीय गाणी म्हणता येतील. नेहमीच्या रोमँटिक गाण्यापेक्षा अरुण दाते यांच्या आवाजात त्यांनी ‘पाऊस कधीचा पडतो’ किंवा ‘वाळवंटातून भीषण वैराण’सारखी गूढरम्य गाणीही दिली. परंतु स्वत: देवकाका आणि अरुण दाते हे दोघे या प्रकारच्या गाण्यांना नीटसे सूट झाले नाहीत असं निदान मला तरी वाटतं.

स्त्री-गायकांसाठीसुद्धा देवकाकांनी अप्रतिम गाणी केली. त्यांची सर्वाधिक जोडी जमली ती उषा मंगेशकर यांच्यासोबत. ‘माझी रेणुका माऊली’, ‘वेळ झाली भर माध्यान्ह’ किंवा ‘केळीचे सुकले बाग’सारखी अप्रतिम गाणी उषाताईंनी देवकाकांकडे गायली. सुमन कल्याणपूर यांनी गायलेले ‘पक्षिणी प्रभाती चारीयासी जाये’, मंगला नाथ यांनी गायलेले ‘त्याची धून झंकारली’, कृष्णा कल्ले यांनी गायलेले ‘मन पिसाट माझे’ आणि उषा अत्रे यांनी गायलेले ‘जरी या पुसून गेल्या’ ही गाणीही अप्रतिमच! परंतु ज्या दोन गाण्यांकरता देवकाकांना कायमस्वरूपी अढळपद प्राप्त झाले आहे, ती म्हणजे लताजी यांनी गायलेले ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ किंवा आशाजी यांच्या स्वरातील ‘विसरशील खास मला’ ही दोन गाणी. मराठी चित्रपटांसाठी त्यांनी संगीतकार म्हणून फार काम केलं नाही. परंतु त्यातही ‘जीवनात ही घडी’ या गाण्याचा उल्लेख केल्याशिवाय मराठी चित्रपट संगीताचा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. लताजी आणि हृदयनाथ यांनी गायलेले ‘अशी धरा, असे गगन’ हे गाणेसुद्धा न विसरता येण्याजोगे आहे. चित्रपटांतील बहुतेक गाणी त्यांनी स्वत:च लिहिली. कवी म्हणूनसुद्धा त्यांचं स्थान खूप वरच्या दर्जाचं आहे. प्रसिद्ध हिंदी चित्रपटगीतांच्या चालींवर स्वत:चं वेगळं काव्य लिहून त्यावर आधारित ‘समस्वरी’ गीतांचा कार्यक्रम ते मोठय़ा उत्साहात करत असत.

स्वत: खूप उत्तम दर्जाचे गायक नसूनही देवकाकांच्या सुगम संगीताच्या मैफिली मात्र प्रचंड मनोरंजक आणि रंगतदार होत असत. अडीच-तीन तास ते समोरच्या प्रेक्षकांना खिळवून ठेवायचे. त्यांचा गाणं म्हणण्याचा ढंग व त्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळे या सादरीकरणाला आलेला एक निराळा रंग आणि एकूणच मिश्कील विनोदांची मधे मधे केलेली पखरण यामुळे त्यांच्या मैफिलीत एक प्रकारचं चैतन्य भरलेलं असे. आणि नुसतं मैफलीतच नव्हे, तर त्यांचं सारं आयुष्यच चैतन्यानं आणि आनंदानं भरलेलं होतं. ते कधी दु:खी, चिडलेले किंवा त्रस्त असे दिसलेच नाहीत. सतत आनंदी आणि हसतमुख. कायम नवीन संगीतकारांना फोन करून ते शाबासकी द्यायचे आणि जाहीर कार्यक्रमांतसुद्धा त्यांचं तोंडभरून कौतुक करत असत. जशी टवटवीत त्यांची गाणी होती, तसंच टवटवीत आयुष्य ते शेवटपर्यंत जगले. मी मागे म्हटल्याप्रमाणे कलाकाराचा स्वभाव त्याच्या कलाकृतीमध्ये दिसणं ही फार विलक्षण गोष्ट असते. कधीही त्यांच्या घरी गेलं तरी ते मांडीवर एक छोटासा की-बोर्ड घेऊन काहीतरी वाजवत तरी बसलेले असायचे किंवा कुठली तरी नवीन रचना तरी बांधत असायचे.

यशवंत देव हा माणूस त्यांच्या संपर्कात आलेल्या साऱ्यांसाठी एक आनंदाचा ठेवा होता. वयाच्या ९१ व्या वर्षांपर्यंत हा आनंदाचा झरा सतत वाहत राहिला आणि दुसऱ्यांना आनंद वाटत राहिला. ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या ओळी त्यांनी संगीतबद्ध केलेल्या एका गाण्याच्या केवळ ओळीच नाहीत, तर त्यांच्या साऱ्या आयुष्याचंच ते सूत्र होतं. ते आज आपल्यात नसले तरीही त्यांची गाणी आजही आपल्याला तेवढाच आनंद देतात, उत्साह देतात आणि दुर्दम्य आशावाद आपल्याला बहाल करतात.

Story img Loader