मुंबापुरी ही अनेकांची स्वप्ननगरी आहे. सगळे जण तिला स्वप्नात पाहतात आणि आपल्या स्वप्नाप्रमाणेच तिला बनवायचा प्रयत्न करतात. मला कधी कधी वाटतं, की या स्वप्ननगरीच्या स्वप्नात काय आहे, हेही कोणीतरी तिला एकदा विचारायला हवं. मी गेलेल्या दिवसांविषयी गळे काढणारा माणूस नाही. मला ते आवडतही नाही. बदल हा जीवनातला एकमेव सातत्यपूर्ण घटक आहे, हेही खरं. रेले, बलगाडय़ा, ट्रॅम गेल्या; त्यांची जागा मोटारी, बसेस, ट्रेनने घेतली. लोकलच्या बरोबरीनं मेट्रो आली. धकाधकीचा प्रवास हळूहळू आरामदायी, वातानुकूलित होतोय. वेगानं बदल घडताहेत. सध्या त्रासाचे दिवस आहेत. पण पूर्वीच्या अडत्यांच्या दुकानावर असायचं त्या वाक्याची मला आठवण येते- ‘हेही दिवस जातील.’ सारं ठीक होईल. मी निराशावादी नाही. जेव्हा आमच्या ‘एम. आर. पी.’मध्ये तरुण पिढी येते, दंगा करत वर्ल्डकप फुटबॉल मॅचेस बघते, ती वेगानं ग्लोबल होऊ पाहते, तेव्हा मी अचंबित होतो. त्यांना जर्मनी जिंकते की फ्रान्स की अर्जेटिना- यापेक्षा ही पिढी खेळाचा आनंद घेते, हा अनुभव मी घेतो. त्याच वेळी कधी कधी ही पिढी ओळखीच्या वा बिनओळखीच्या माणसांबरोबर पबमध्ये आनंद घेते याची वेदनाही मनात जागी होते. मला १९८३ चा वर्ल्डकप आठवतो. तो वर्ल्डकप मुंबईनं आपापल्या कुटुंबासह एकत्र पाहिला होता. आधी घरात, मग दारात सेलिब्रेट केला होता. आज जग घराच्या अंगणात येताना त्या प्रपातानं आपल्या घराच्या भिंती कोसळताना मुंबई पाहते आहे याचा विषाद वाटतो, हेही तितकंच खरं!
पूर्वी बाहेरून मुंबईत येणाऱ्याचा मुंबईकर विचार करायचा. मला आठवतंय, १९५५-५६ च्या सुमारास आम्ही मुंबईत स्थापित झालो होतो. देशाच्या दुर्दैवी फाळणीनंतर अनेक पंजाबी आणि सिंधी बंधू-भगिनी भारतात आले. त्यातले काही मुंबईत आले. ही कष्टाळू मंडळी जगण्यासाठी अफाट परिश्रम घेत होती. बऱ्याच पंजाबी बंधूंनी मुंबईत टॅक्सी चालवायला घेतली. हळूहळू त्यांनी टॅक्सी विकत घेतली. एकाच्या दोन टॅक्सी झाल्या. दोनाच्या चार झाल्या. ही मंडळी टॅक्सीच्या व्यवसायात रुळत गेली. मुंबईकरांच्या ओठावर ‘प्रीतम’चं नाव येण्यास काही अंशी या टॅक्सीचालक पंजाबी मंडळींचा हातभार आहे, हे मला इथे कृतज्ञपणे नमूद करावंसं वाटतं.
एका रात्री एक पंजाबी टॅक्सीचालक एका देखण्या महिलेला ‘प्रीतम’मध्ये घेऊन आला. त्या टॅक्सीचालकांना मी ‘मामू’ म्हणत असे. ते माझ्या बीजीच्या गावचे होते. त्यामुळे आईच्या माहेरच्या माणसाला ‘मामू’ म्हणण्याचा जो प्रघात आहे, त्यानुसार मी त्यांना ‘मामू’ म्हणत असे. मामू रोज रात्री जेवायला आमच्या ‘प्रीतम’मध्ये येत. त्या रात्री पंजाब मेलने ती सुंदर महिला दादर स्टेशनवर उतरली. मामूची टॅक्सी त्यांनी केली व म्हणाल्या, ‘‘एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन चला.’’ त्या महिलेजवळ असलेले भरपूर नैसर्गिक व पर्समधले दागिने बघून मामूंना तिची काळजी वाटली. एवढय़ा रात्री एका तरुण महिलेला दुसऱ्या कुठल्या हॉटेलात घेऊन जायचं, या विचारानं मामू त्यांना घेऊन ‘प्रीतम’मध्ये आले. वाटेत तिच्याशी बोलताना त्यांना कळलं की त्या महिलेला चित्रपटात करिअर करायचंय. मुंबईत त्या कोणालाही ओळखत नाहीत. त्यामुळे जिथून चित्रपटात काही करता येईल अशा ठिकाणी त्यांना जायचं होतं. मामू मला चांगले ओळखत असल्यानं या महिलेला घेऊन ते थेट माझ्याकडे आले. दुसरं म्हणजे या भाबडय़ा स्त्रीचा कोणी गैरफायदा घेऊ नये अशी त्यांची इच्छा होती.
त्या महिलेची सर्व माहिती मी रजिस्टरमध्ये भरून घेतली व तिला रूम दिली. तिने खरीखुरी माहिती दिली आहे ना, याबद्दल वारंवार विचारणा करून खातरजमा केली. त्या रात्री त्या प्रीतममध्ये राहिल्या. ‘‘सरदारजी चित्रपट क्षेत्राशी जवळून संबंधित आहेत, ते तुम्हाला मदत करतील,’’ असं सांगून मामू निघून गेले. मी त्या ताईंशी बोललो. त्यांच्या बोलण्यातून कळलं, की त्या एक विवाहिता आहेत. त्यांना दोन मुलं आहेत. त्यांचे पती एक नामांकित अडते आहेत. त्या सुंदर होत्या. लहानपणापासून त्यांना हिरॉइन बनण्याची तीव्र इच्छा होती. त्या ध्यासापायी त्यांचं त्यांच्या वडिलांशी व नंतर पतीशी सतत वाजायचं. सिनेमात हिरॉइन बनण्याच्या त्यांच्या आत्यंतिक ध्यासातून त्यांनी एके दिवशी घरात कोणालाही न सांगता पतीचं घर सोडलं व त्या थेट मुंबईत आल्या. मुंबईत त्यांना कोणीही ओळखत नव्हतं व त्याही कोणाला ओळखत नव्हत्या. मला म्हणाल्या, ‘‘सरदारजी, तुम्हीच माझं स्वप्न पूर्ण करायला मदत करा.’’ मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. त्यांना विश्रांती घेण्याची विनंती करून त्यांना त्यांच्या रूमकडे रवाना केलं व काऊंटरवर येऊन बसलो. विचार करायला लागलो : आता या बाईचं हे वेड कसं काढायचं? नेहमीप्रमाणे माझी बीजी हे उत्तर शोधून काढेल, या विश्वासानं घरी गेल्यावर मी बीजीला व पत्नीला दिवसभराच्या घडामोडी सांगताना या नव्या पाहुणीची कथा सांगितली. बीजीला म्हणालो, ‘‘तुला ही इंडस्ट्री माहितीच आहे. आणखी एका स्त्रीला त्या खाईत जाण्यापासून वाचवायला हवं.’’ तिनं ती जबाबदारी घेतली.
दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी त्या खाली रेस्टॉरंटमध्ये आल्या. त्यांनी जबरदस्त मेकअप केला होता. उत्तम दर्जेदार कपडे परिधान केले होते. तोंडाला जरा जास्तच लाली, लिपस्टिक लावली होती. त्या महिलेनं मला विनंती केली की, ‘‘सरदारजी, तुम्ही मला राज कपूरकडे घेऊन जा. मी ऐकलंय की तुमचे व कपूर मंडळींचे जवळचे संबंध आहेत. मी इथं जे फोटो लावलेत त्यातही पाहिलं की तुम्ही चोप्रांनाही ओळखता.’’ मग त्यांनी एकदम फिल्मी स्टाईलमध्ये कपाळावर हात वगरे नेला व आर्जवानं मला म्हणाल्या, ‘‘मेरी नय्या अब आप ही सिनेमा के किनारे लगाईये।’’ मी गप्प बसलो. त्यांनी खरोखर काकुळतीला येऊन मला सांगितलं, ‘‘सरदारजी, एका भगिनीचं स्वप्न साकार करायला तिला मदत करा.’’ मी त्यांना हळूच म्हणालो, ‘‘दीदी, तुमचं बरोबर आहे. मी राज कपूरजींना, बी. आर. चोप्रासाहेबांना जवळून ओळखतो. पण माझं ऐकाल तर फिल्म इंडस्ट्री ही वरवर पाहता जशी दिसते तशी प्रत्यक्षात सुंदर नाही. फिल्मी दुनियेचे नीतिनियम वेगळे असतात. त्यांची गणितं वेगळी असतात. आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांचं हे काम नाही. ती जितकी देखणी आहे, तितकीच खतरनाक आहे. इथं थोडंसं कमवायला खूप काही गमवायला लागतं; जे तुम्हाला परवडणार नाही.’’
ती महिला माझं काही ऐकेचना. मी त्यांची व बीजीची गाठ घालून दिली. माझी पत्नीही होतीच. बीजी त्यांना म्हणाली, ‘‘अगं मुली, माझे व कपूर खानदानाचे खूप चांगले संबंध आहेत. मी तुला त्यांना भेटवेनही. पण सगळीच माणसं काही चांगली असत नाहीत. कपूर चांगले आहेत, म्हणजे बाकीचे चांगले असतीलच असं नाही. तुझ्या चारित्र्याची धूळधाण होईल.’’ ती महिला म्हणाली, ‘‘माझी त्यासाठी तयारी आहे. काय वाटेल ते झालं तरी मला हिरॉइन बनायचंय. तुम्ही मदत केलीत तर बरं, नाहीतर मी दुसरीकडे जाईन मदत मागायला.’’ बीजीला अशा उत्तराची अपेक्षा नव्हती. त्या स्त्रीचं जीवनाबद्दलचं आकलन थोडंसं कमी होतं. खरं म्हणजे ते नव्हतंच! बीजीनं कपाळाला हात मारून घेतला. माझ्या पत्नीनं तिला समजावून सांगितलं, ‘‘हिरॉइनचं वय लहान असावं लागतं. तुम्ही सुंदर आहात, खूप सुंदर आहात. पण तुमचं वय पस्तिशीच्या पलीकडे आहे. मेकअपने तुम्ही चार-पाच वर्षांनी लहान दिसाल; पण तेवढय़ाच लहान दिसाल. तुम्हाला ज्यांच्याबरोबर हिरॉइन म्हणून काम करायचंय, त्यांची वयं तुमच्यापेक्षा निम्मी आहेत. आता या वयात तुम्हाला यश मिळवणं अवघड आहे. तेव्हा आता हा नाद सोडा व घरी परत जा.’’ पण त्या ऐकेनात. शेवटी बीजीनं एक युक्ती योजली. त्या महिलेला घेऊन बीजी व माझी पत्नी एका शूटिंगला गेले. तिला त्यांनी शूटिंग दाखवलं. राजजींशी ओळख करून दिली. राजजींना आधीच सांगून ठेवल्यामुळे त्यांनी त्या महिलेची समजूत काढली व त्यांना इंडस्ट्रीत येण्यापासून परावृत्त केलं. त्यांना ते म्हणाले, ‘‘तुम्ही शूटिंग बघायला कधीही या. पण हिरॉइन बनण्याचं स्वप्न बाजूला ठेवा. कारण आता खूप उशीर झाला आहे.’’ एकदाची तिची समजूत पटली. त्यांच्याकडून मी त्यांच्या पतीचा फोन नंबर घेतला व त्यांना कळवलं, की ‘‘तुमची पत्नी आमच्याकडे उतरली आहे. स्वत: येऊन त्यांना घेऊन जा.’’ दुसऱ्या दिवशी ते विमानानं मुंबईला आले. त्यांच्याबरोबर त्यांची दोन सोन्यासारखी मुलं होती. त्या मुलांना घेऊन ते दोन दिवस आमच्याकडे राहिले. जाताना मला म्हणाले, ‘‘तुमच्यामुळे माझा संसार वाचला. आमचा प्रेमविवाह आहे. तिचं सिनेमाचं वेड मला माहिती होतं. मात्र, ती घर सोडून जाईल असं वाटलं नव्हतं. पण तुमच्यामुळे तिला या सिनेसृष्टीविषयी जवळून कळलं. आता ती ते वेड डोक्यातून काढून टाकील असं वाटतं. मी तुम्हाला तुमचे नैसर्गिक किती झाले, असं विचारून तुमचा अपमान करणार नाही. ‘ती घर सोडून गेली आहे,’ असं सांगण्याऐवजी ‘माझी पत्नी काही दिवसांसाठी माहेरी गेली आहे,’ असं मी आमच्याकडे सर्वाना सांगितलं होतं. बीजींमुळे आम्हाला मुंबईत एक आई मिळाली. तुमच्यासारखा भाऊ मिळाला. भाभींसारखी बहीण मिळाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा संसार परत उभा राहिला.’’ ते कुटुंब त्यानंतर जेव्हा जेव्हा मुंबईत आलं तेव्हा आमच्याकडेच उतरलं. मला एक छानशी बहीण मिळाली आणि एक मेव्हणाही मिळाला.
आमच्या व्यवसायानं आम्हाला अशी खूप नाती दिली. मला आठवतंय, एक पंजाबी उद्योगपती होता. तो ‘चंद्रा इंडस्ट्रीज्’ या नावाने डीप फ्रिजर बनवत असे. रमेश त्याचं नाव. त्याच्या डीप फ्रिजर्सनी सर्वत्र खूप नाव मिळवलं होतं. तो मुंबईत आला की ‘पार्क वे’मध्ये उतरत असे. माझ्याच वयाचा होता. आमची खास दोस्ती झाली. त्याची पत्नीही त्याच्यासोबत यायची. त्यांच्या जेवणाच्या आवडीनिवडी आम्हाला सर्वाना माहिती होत्या. दिवसभर मुंबईतली कामं उरकली की रात्री जेवताना रमेश मला बोलवीत असे व गप्पा मारत जेवत असे. आमचा असा काही दोस्ताना झाला होता, की तो मुंबईत आला की मी रात्री घरच्या जेवणाला दांडी मारायचो. पत्नी मग विचारत असे, ‘‘आज रमेशजी आलेत की काय?’’ इतकी आमची दोस्ती झालेली.
एकदा रमेशचा मला फोन आला. फोनवर तो खूप खोकत होता. मला म्हणाला, ‘‘मी मुंबईत आलोय. पण ‘पार्क वे’ला न येता मी ‘शालिमार’मध्ये राहिलो आहे. मला खूप खोकला येतोय. जरा मला येऊन भेटतोस का?’’ मी त्याच्यावर थोडा वैतागलो. आपलं हॉटेल सोडून तू दुसरीकडे कसा गेलास, वगरे. पण शेवटी त्याला भेटायला गेलो. त्याला खूप खोकला येत होता. तो म्हणाला, ‘‘मला डॉक्टरनं सांगितलंय की, तू टाटा हॉस्पिटलला तपासणी करून घे.’’ मी हादरलो. टाटा रुग्णालय हे कॅन्सर उपचारांसाठी परिचित आहे. ‘‘अरे, टाटात कशाला? साधा खोकला तर झालाय! त्यात एवढं काय?’’ तो म्हणाला, ‘‘अरे वीरजी, माझ्या फुप्फुसांना काहीतरी इन्फेक्शन झालंय. त्याचा हा त्रास आहे. म्हणून तपासणी करून घ्यायला सांगितलंय. मी मुंबईत तुझ्याशिवाय कोणालाही ओळखत नाही. त्यामुळे तूच माझं काय ते बघ!’’
रमेश हसता-खेळता तरुण मित्र होता माझा. त्याची पत्नी सोबत आली होती. आमचे कौटुंबिक संबंध प्रस्थापित झालेले होते. मी त्याच्याकडे पत्नीसह गेलो. सगळी परिस्थिती समजावून घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर रमेशला व त्याच्या पत्नीला घेऊन टाटा हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. सोबत त्याचा एक मित्र आला होता. टाटाचे प्रमुख डॉक्टर माझे स्नेही होते. त्यांना भेटलो. रमेशच्या सर्व तपासण्या त्यांनी लगेच करून घेतल्या. आधीचे रिपोर्टस् पाहिले व त्यांनी रमेशला शेवटच्या टप्प्यावर पोचलेला फुप्फुसांचा कॅन्सर झाल्याचं निदान केलं. मी चक्रावून गेलो. रमेशला फक्त खोकला झाला होता. बाकी तो मस्त गप्पा मारत होता. मला, माझ्या पत्नीला व आपल्या बायकोला एकदम गप्प झालेलं बघून रमेशनं ताडलं, की काहीतरी गडबड आहे. मला स्वत:ला काहीही लपवून ठेवायला आवडत नाही. दु:खाची गोष्ट असली, तरीही! मी काळजावर दगड ठेवून रमेशला वास्तव सांगितलं. रमेश जोरात हसला. ‘‘अरे वीर, सहा महिने मिळालेत ना? मग ते सहा महिने आनंदानं जगेन. बस पेन-किलर घेईन. बाकी काही करायचं नाही.’’ (तेव्हा ‘आनंद’ चित्रपट आलेला नव्हता!) रमेशचा एक भाऊ होता. दोघं मिळून व्यवसाय चालवत होते. रमेशनं निरवानिरव करून ठेवली. मला त्याबाबत कल्पना दिली. त्याच्या मृत्युपत्राची एक प्रत माझ्याजवळ दिली. तो गावी परत गेला. अधूनमधून तो मुंबईत येत होता. मजेत राहत होता. वरवर तो खुशहाल दिसायचा, पण कर्करोगानं त्याला पोखरलं होतं. आणि एक दिवस भाभीचा फोन आला, ‘‘रमेश शेवटचे क्षण मोजतोय. तुमची आठवण काढतोय.’’ मी त्याला भेटायला दिल्लीला गेलो. त्याचा कृश हात हातात धरून खूप वेळ बसून राहिलो. खोकल्याची उबळ आली की त्याच्या पाठीवरून हात फिरवत होतो. एकेकाळी बांधेसूद असलेलं त्याचं शरीर आता फक्त सापळा राहिलं होतं. पाठीच्या कण्याचा खडबडीत स्पर्श मनावर ओरखडा काढत होता. मला म्हणाला, ‘‘वीर, सिर्फ हड्डीया बची है। जलने को जादा लकडी की जरुरत नहीं पडेगी। झटसे जल जाऊंगा। तेव्हाही मी कोणाला त्रास देणार नाही. जसा आलो तसा चाललोय.’’ मला भडभडून आलं. कधी नाही ते डोळ्यांतून पाणी आलं. ‘‘अरे यार, तू आणि रडतोस? देखो, बेगम (प्रेमानं तो बायकोला ‘बेगम’ म्हणे.), कुलवंत रो रहा है।’’
मी मुंबईत परतलो. दोन दिवसांनी रमेश हे जग सोडून गेला. त्याच्या मृत्युपत्राप्रमाणं सर्व काही नीट झालं. त्याची पत्नी नंतरही नेहमी संपर्कात असे. काही महिन्यांनी तिचे फोन येणं बंद झालं. आणखी काही दिवसांनी बातमी कळली : तिनं रमेशच्या त्या मित्रासमवेत लग्न केलं.
अवरुद्ध झालेलं एक जीवन वाहतं झालं. नाही तरी वाहतं राहणं हा जीवनाचा नियमच आहे!
ksk@pritamhotels.com
शब्दांकन : नीतिन आरेकर