आमचं ‘प्रीतम’ हॉटेल मुंबईत रुळलं होतं. केवळ फिल्मी लोकांच्या मनावरच ते अधिराज्य गाजवत होतं असं नाही तर सर्वसामान्य मुंबईकरही आमच्या परिवाराचा हिस्सा बनले होते. त्यांची कौटुंबिक सेलिब्रेशन्स ‘प्रीतम’मध्ये होऊ लागली होती. त्यांचा आनंद पाहताना आम्हीही आनंदी होत होतो.

मला आठवतं त्यानुसार १९५४ साली फिल्मफेअर अ‍ॅवार्डस्ना प्रारंभ झाला. तेव्हाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनाही सुरुवात झाली होती. पहिला फिल्मफेअर अ‍ॅवार्ड सोहळा झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी पांढराशुभ्र शर्ट, पांढरीशुभ्र विजार आणि त्यावर सलसर जाकीट घातलेले संगीतकार नौशादसाहेब आपल्या गोतावळ्यासह प्रीतममध्ये आले. त्यांच्या हातात फिल्मफेअरची बाहुली होती. प्रसन्न चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. इतर वेळी अतिशय नजाकतदार वागणारे, हळुवार बोलणारे नौशादसाहेब त्या दिवशी थोडे उत्तेजित झाले होते.

आत शिरता शिरताच त्यांनी मला विचारलं, ‘‘आपके और हमारे पापाजी किधर है?’’

पापाजी जवळच गेले होते. त्यांना मी निरोप पाठवला. पण नौशादजींना धीर निघत नव्हता. हे तसं अघटितच होतं. पहिल्यांदाच घडत होतं. पापाजी आले. ते आत शिरता शिरता नौशादसाहेब लगबगीनं पुढं आले, पापाजींना सलाम दुवा केला आणि अत्यंत विनम्रतेनं म्हणाले, ‘‘पापाजी, देखिये.. आप के प्रीतम की चौखटपर सोनेवाले इस छोटेसे बंदेने क्या हासील किया है?’’ नौशादजींनी त्यांची फिल्मफेअर ट्रॉफी पापाजींच्या हातात ठेवली. इतर वेळी पंजाबी शैलीने जोरदार कौतुक करणारे पापाजी त्या क्षणी मूक झाले होते. कधी नव्हे ते त्यांच्या डोळ्यांतून पाणी झरत होतं. पापाजींनी नौशादसाहेबांना जवळ घेऊन आिलगन दिलं आणि ते नौशादजींची पाठ थोपटत राहिले. मी ते दृश्य स्तंभित होऊन बघत होतो. नौशादजींच्या लक्षात माझी अवस्था आली. ते भानावर येऊन मला म्हणाले, ‘‘कुलवंतजी, आप को मालूम नहीं होगा। लेकीन मं इसी चौखटपर रहा हूँ। बडा हुआ हूँ। मी या फिल्मी दुनियेसाठी मुंबईत आलो. दर दर ठोकरे खा रहा था। दररोज या स्टुडिओतून त्या स्टुडिओत चक्कर मारत होतो. कधी कुठे काम मिळेल, कधी कुठला तारा आपल्यासाठी चमकेल, कधी कुठलं दार आपल्यासाठी उघडेल याची वाट पाहत होतो. दिवसभर वणवण भटकून रात्री या परिसरात येऊन कुठेतरी झोपत होतो. जरा कुठं झोप लागली की बरगडीत एखाद्या पोलिसाची काठी टोचायची आणि तो मला उठवायचा. मग जवळच्या बेिडगवजा दोन पिशव्या घेऊन एखाद्या पुलाखाली किंवा दादर रेल्वे स्टेशनवर जाऊन मी झोपायचो. एक दिवस मनाचा हिय्या केला आणि तुमच्या पापाजींकडे आलो. घाबरत घाबरत त्यांना सांगितलं, की ‘मी चित्रपट जगतात नशीब आजमवायला आलोय. मी संगीतकार आहे. शास्त्रीय संगीत शिकलोय. थोडं थोडं काम मिळू लागलंय. पण हवं तसं नशीब उघडत नाहीए. रहने को घर नहीं और सोने को बिस्तर भी नहीं है। मी रात्री तुमच्या हॉटेलच्या पायऱ्यांवर झोपू का?’ शायद आपके पापाजी ने पहले मुझे देखा होगा। त्यांनी मला लगेच इजाजत तर दिलीच; पण माझ्या धोकटय़ाही ठेवायला स्वत:हून परवानगी दिली. मी रात्री प्रीतमच्या पायऱ्यांवर झोपायचो. सकाळी लवकर उठून सर्व आवरून तुमच्या सेवकवर्गाच्या सामानाबरोबर माझंही सामान ठेवायचो आणि कामाच्या शोधात जायचो. साधारणपणे ती प्रीतमची सुरुवात असेल. बस.. पापाजींनी सहारा दिला आणि नंतर नशिबानं पण प्रकाश दाखवला. कुलवंतजी, एक गोष्ट सांगतो तुम्हाला. दिवस कसेही असोत- तुम्ही सच्चे असाल, आपल्या कामाविषयी प्रामाणिक असाल तर अल्ला तुम्हाला साथ देतोच. तुमच्याकडे फक्त लगन हवी आणि जिगर हवी. त्याबरोबरच योग्य वेळी साथ द्यायला चांगली माणसंही हवीत. पापाजी मला तसे लाभले.’’

नौशादसाहेब! खुदा का पाक बंदा! विनम्रतेचं दुसरं नाव म्हणजे नौशादजी. ते नेहमी प्रीतममध्ये येत असत. आपल्या जुन्या दिवसांची आठवण काढत असत. लोकांना सांगत असत, ‘इथं या फुटपाथच्या पायरीनं मला जगवलं. त्याचा विसर पडू नये म्हणून मी इथं येतो.’

३५ रौप्यमहोत्सवी चित्रपट, डझनभर सुवर्ण- महोत्सवी चित्रपट, तीन-चार अमृतमहोत्सवी चित्रपटांचं यश, दादासाहेब फाळके पुरस्काराचा सन्मान आणि पद्मभूषण पुरस्काराचा आनंद नौशादजींनी त्यांच्या मित्रांसह साजरा केला तो प्रीतममध्येच!

नौशादसाहेब आले की माझ्याशी गप्पा मारत असत. तो त्यांचा खरं तर स्वभाव नव्हता. परंतु कोण जाणे कसे- ते माझ्याशी मात्र बोलत असत. त्यातूनच मला त्यांचा जीवनप्रवास कळला. ते लखनौचे. लखनौ म्हणजे एक नाचतं-गातं शहर! ते सांगत, ‘‘लखनौच्या भिंतीही गातात आणि पायवाटा नाचतात.’’ त्यांचे वालिद वाहिद अली हे मुन्शी होते. घरी संगीत निषिद्ध होतं. पण छोटे नौशादमियां लखनौच्या जवळ असणाऱ्या बाराबंकी भागात देवा शरीफच्या उरुसाला जाऊन तिथं प्रसिद्ध कव्वालांच्या कव्वाल्या ऐकत. उरुसाच्या आठवणी निघाल्या की काही क्षण ते बाराबंकीत जाऊन पोचायचे अन् तिथंच अडकून पडायचे. त्यांच्या ओलसर डोळ्यांत विलक्षण चमक यायची. नौशादसाहेबांनी गुरबत अली, युसुफ अली, बब्बनसाहेब अशा उस्तादांकडे शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं होतं. (त्यांच्याबद्दल बोलताना कानाच्या पाळ्यांना हात लावून, डोळे मिटून त्यांचं स्मरण केल्याशिवाय त्यांची गाडी पुढं सरकत नसे.) संगीताच्या या वेडापायी कट्टर मुस्लीम असलेल्या त्यांच्या वडिलांनी एकदा निर्वाणीची भाषा केली.. ‘‘घरात राहायचं असेल तर तुला संगीत सोडावं लागेल. आणि संगीत हवं असेल तर घर सोडावं लागेल.’’ नौशादजींनी दुसरा पर्याय निवडला. ते १९३७ मध्ये मुंबईत पळून आले.

एक मजेदार आठवण सांगतो. (अर्थात नौशादसाहेबांनीच सांगितलेली!) नौशादसाहेब लहान होते तेव्हापासूनच ते चित्रपट संगीताकडे वळले होते. तो मूकपटांचा जमाना होता. त्यावेळी मूकपटांना साऊंड ट्रॅक नसे, तर जसजसं सिनेमाचं रीळ पुढं जात असे तसतसं समोर येणाऱ्या चित्रानुसार ताजं ताजं संगीत वाजवलं जाई. आजच्या भाषेत ‘लाइव्ह म्युझिक’ दिलं जाई. छोटे नौशादमियां या ‘लाइव्ह’ संगीत देणाऱ्या ट्रपमध्ये होते. त्यामुळे त्यांना आधी फिल्म पाहावी लागे. सकाळी फिल्म पाहायची आणि त्यातील प्रसंगांवर आधारित संगीताची आखणी करायची. संध्याकाळच्या शोमध्ये मग ते संगीत वाजवलं जाई. नौशादजी सांगत.. ‘‘बालपणीच्या या उद्योगात माझ्या पुढच्या आयुष्याची बीजं रुजली होती. मुक्या चित्रफितींनी आवाजाचं महत्त्व मला समजावलं.’’ नौशादसाहेबांचं वय तेव्हा जेमतेम १३-१४ वर्षांचं असावं. त्याच काळात या मुलानं ‘विंडसर एंटरटेनर्स’ नावाचा एक बँड तयार केला. तो बँड घेऊन ते पंजाब, राजस्थान, सौराष्ट्र, गुजरातेत फिरले. या फिरतीत मला लोकसंगीताचा खजिना मिळाला असं ते सांगत.

नौशादजींची लोकांना फारशी माहिती नसलेली आणखी एक गंमत सांगतो. त्यांना उत्कृष्टरीत्या हार्मोनिअम दुरूस्त करता येत असे. सतार, पियानो, बासरी, क्लॅरिओनेट, अ‍ॅकॉर्डिअन, मेंडोलीन, तबला अशा विविध वाद्यांवर त्यांचं प्रभुत्व होतं. तालवाद्ये, तंतूवाद्ये, सुशीरवाद्ये (फुंक घालायची वाद्ये), इलेक्ट्रॉनिक वाद्ये अशा सर्व प्रकारच्या वाद्यांचं त्यांना प्रगल्भ ज्ञान होतं. ते म्हणत, ‘‘संगीतकाराला सारं काही आलं पाहिजे. मुख्य म्हणजे वाद्यं वाजवण्याऐवजी त्यांना काय सांगायचं आहे, ते संगीतकाराला कळलं पाहिजे. वाद्य हे निर्जीव अस्तित्व नसतं. ताणलेल्या तारांवर किंवा खेचलेल्या चामडय़ावर नादकण व्यक्त होण्यासाठी अधीर झालेले असतात. त्यांची अधीरता संगीतकाराला कळायला हवी.’’

मला संगीतातलं फारसं कळत नाही. पण जेव्हा जेव्हा शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट बनत गेले तेव्हा तेव्हा लोकांना पहिली आठवण आली ती नौशादसाहेबांचीच! याचं कारण त्यांची ही विचारधारा असावी.

चित्रपटाची दुनिया ही बेगडी प्रेमाची असते असं म्हणतात. पण नौशादसाहेब त्याला अपवाद होते. ते दुसऱ्याचं भरभरून कौतुक करत असत. मला आठवतंय, एका संध्याकाळी उशिरा ते प्रीतममध्ये आले. खूप खुशीत होते. मी त्यांना विचारलं, ‘‘आप की इस खुशी का राज क्या है?’’ ते उद्गारले, ‘‘आज मी एक अप्रतिम रचना रेकॉर्ड करून आलोय. पण माझी संगीतरचना नाहीये, ती रोशनची रचना आहे आणि लताजींनी ती गायली आहे. मी सहज मेहबूब स्टुडिओत गेलो होतो. तिथं ‘अजी बस शुक्रिया’ चित्रपटाचं रेकॉर्डिग सुरू होतं. रोशनजींचं संगीत होतं. मला पाहून त्यांना खूप आनंद वाटला. रोशनजी मला म्हणाले, ‘माझ्याकरता हे गाणं तुम्ही रेकॉर्ड कराल का? मला बरं वाटेल.’ रोशनजींची एकही मात्रा न बदलता मी ते गाणं रेकॉर्ड केलं. काय गायल्यात लताजी! आणि रोशनजींचं ते अद्भुत संगीत!’’ ‘सारी सारी रात तेरी याद सताये..’ हे ते गाणं. एकमेकांना शह-काटशह देण्याच्या आजच्या या काळात रोशन आणि नौशादजींचं हे वागणं मला विलक्षण वेगळं आणि आदर्श वाटतं.

नौशादसाहेबांना स्वत:च्या चित्रपटाबद्दल नेहमी उत्सुकता वाटायची. चित्रपट चालतो की नाही, त्याचं संगीत लोक उचलून धरतात की नाही, या सगळ्याबद्दल ते एक्सायटेड असायचे. त्या काळात सिंगल स्क्रीन चित्रपटगृहं असायची. शुक्रवारी चित्रपट रिलीज होत असे. आणि  चित्रपटांचे प्लॅन्स सोमवारी खुले होत असत. चित्रपटांची गाणी आधीच रिलीज होत असत आणि त्याआधारे अ‍ॅडव्हान्स बुकिंग होत असे. सोमवारी दुपारी अकरा वाजता बुकिंग सुरू होत असे. किती वेळात चित्रपटगृह हाऊसफुल्ल होतं त्यावर त्या चित्रपटाचं यश अवलंबून असतं असा समज तेव्हा प्रचलित होता. त्या काळात बुकिंग ऑफिसच्या बाहेर एक बोर्ड असे. त्यावर आठवडय़ाचे सात दिवस लिहिलेले असत आणि प्रत्येक दिवसासमोर एक बॉक्स असे. त्यात एक खाच असे व खाचेत एक पट्टी असे. ती पट्टी दोन बाजूंना सरकत असे. खाचेला दोन बाजू असत व त्यांना निळ्या व लाल रंग दिलेला असे. तिकीट बुकिंग सुरू होई तेव्हा पूर्णपणे निळा रंग दिसे व तिकिटाचा प्लॅन जसजसा भरत जाई तसतशी ती पट्टी सरकवली जाई आणि नियत दिवसाचा प्लॅन पूर्ण भरला की ती पट्टी निळ्या रंगाला पूर्णपणे झाकून लाल रंगाची बाजू लोकांना दिसे. असा लाल रंग दिसला की समजायचं : चित्रपट हाऊसफुल्ल झाला! (हुशार चित्रपट निर्माते वा चित्रपटगृहांचे मालक, व्यवस्थापक किंवा अगदी अभिनेतेसुद्धा स्वत:च तिकिटं खरेदी करून आपल्या चित्रपटाची हवा तयार करून चित्रपट हिट् करत असत किंवा पाडत असत. याच क्लृप्तीचा फटका राज कपूर किंवा गुरुदत्त यांना बसला होता.) बॉक्स ऑफिसची कल्पना कदाचित यातूनच आली असावी. नौशादजी त्यांचे चित्रपट रिलीज व्हायच्या आदल्या सोमवारी वेगवेगळ्या चित्रपटगृहांत फेरफटका मारून त्याचं यशापयश सेलिब्रेट करायला प्रीतममध्ये दुपारी जेवायला येत असत. त्यांच्या मूडवरून आम्हाला चित्रपटाचा अंदाज येई. अर्थात आम्ही त्यावर फारसं बोलत नसू.. किंबहुना नाहीच.

‘अ परफेक्ट जंटलमन’ असं त्यांचं वर्णन करायला हरकत नाही. आमची एक चित्रपट वितरण संस्था होती. आम्ही चित्रपटांना फायनान्सही करत असू. त्याविषयी मी नंतर सविस्तर लिहीनच. पण आमचा एक मोठा चित्रपट म्हणजे कमाल अमरोही यांचं स्वप्न असलेला ‘पाकिजा’! तो खूप रखडला. इतका रखडला, की त्याचे संगीतकार गुलाम महम्मद यांचं दरम्यानच्या काळात निधन झालं. गाणी तयार झाली होती, पण पाश्र्वसंगीत व्हायचं होतं. कमालसाहेबांनी आम्हाला विचारलं, ‘‘आपण नौशादसाहेबांना ते पूर्ण करायची विनंती करू या का?’’ आम्ही यावर काय सल्ला देणार? कमालसाहेब मोठे आणि नौशादसाहेबही! आम्ही म्हणालो, ‘‘जसं जमेल तसं करू या.’’ संगीतकार गुलाम महम्मद हे नौशादजींचे एकेकाळचे सहाय्यक. आपल्या हाताखालच्या माणसाच्या चित्रपटाचं पाश्र्वसंगीत करायला मोठा संगीतकार कसा राजी होणार? कमालजींनी बिचकतच नौशादसाहेबांना त्यासंबंधी विचारलं. नौशादजींनी क्षणही न दवडता त्वरित त्यास होकार दिला. नंतर कमालजींनी त्यांना त्यांच्या मानधनाविषयी विचारलं. नौशादसाहेबांना माहिती होतं, की या चित्रपटाचं जागतिक वितरण आमच्याकडे आहे, आम्ही त्यात काही पैसे गुंतवले आहेत. ते कमालजींना म्हणाले, ‘‘कमालजी, या चित्रपटात कुलवंतजींचे पैसे लागले आहेत. माझं व त्यांचं नातं वेगळं आहे. तुम्ही एक रुपया जरी दिलात तरी मला चालेल.’’

कमालजींनी हा वृत्तान्त आम्हाला सांगितला तेव्हा मी नि:शब्दच झालो. तोंडातून शब्द फुटेना. मनात विचार आला, ‘‘बडी फुरसत से वाहे गुरु ऐसे लोक बना देते है।’’

अविश्वासाने पोळणाऱ्या या जगात जगण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी विश्वासाच्या अशा वटवृक्षांच्या आठवणींची सावलीही उपयोगी पडते!

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर

Story img Loader