प्राणजी लहानपणी अतिशय खोडकर होते. त्यांच्या घरी कार होती. छोटा प्राण बारकाईनं बाबूजी कार कशी सुरू करतात ते बघत असे. एकदा आसपास कोणीही नाही असं बघून या छोटय़ानं आपल्या निरीक्षणाच्या बळावर कार सुरू केली आणि भुर्रकन् निघून गेला. थोडय़ा वेळानं तो घाबरतच घरात आला आणि बाबूजींना चाचरत म्हणाला, ‘आपली गाडी.. आपली गाडी..पुढे तो काहीच बोलेना. बाबूजी वैतागले. तेव्हा छोटा प्राण म्हणाला, ‘मी कार तर सुरू केली, पण ती कशी वळवायची हे मला माहीत नाही. तेवढय़ात समोर तळं दिसलं. पण कार काही वळेना. मग मी बाहेर उडी मारली..

ते माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे होते. त्यांच्या चित्रपटातल्या भूमिका पाहत पाहतच मी लहानाचा मोठा झालो.

ते उंचेपुरे होते. त्यांचं नाक बाकदार आणि धारदार होतं. त्यांची नजर तीक्ष्ण होती. त्यांचा चेहरा बोलका होता. ते गोरेपान होते. अत्यंत देखणे होते. ते समोरच्यावर प्रचंड प्रभाव टाकणारे होते.

आणि ते प्राण होते!

जवळपास सहा दशकं या अभिनेत्यानं चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. त्यांचा दबदबा मोठाच होता. मुंबईतलं अनेक स्टुडिओंच्या जवळचं पंजाबी हॉटेल म्हणजे ‘प्रीतम’! इथं सगळी फिल्मी माणसं भेटणार, ही आमची ओळख पक्की झाली आणि तेव्हाच केव्हातरी प्राण आमच्या ‘प्रीतम’मध्ये आले. त्यांना पाहिल्यावर मीसुद्धा आधी चपापलोच. माझे पापाजी काऊंटरवर बसले होते आणि मी ग्राहकांची काळजी घेत होतो. माझ्या मनात विचार आला, की ‘बाप रे! हा माणूसही आपल्या हॉटेलात आला? आता कसं होणार?’ तिथं असलेल्या काही परिवारांच्याही मनात थोडीशी चलबिचल झाली. आणि हातात सिगरेट घेतलेले प्राणजी पटकन् पापाजींना म्हणाले, ‘‘सरदारजी, काळजी करू नका. मी चित्रपटातल्या माझ्या भूमिकांसारखा नाही. बस्स! तंदूर चिकन खिलाइये.’’

प्राणसाहेबांबरोबर त्यांचे काही मित्रही आले होते. ते मनमुराद हसले. प्राणसाहेबांच्या हसण्याने हॉटेल दणाणून गेलं. आमच्या प्रीतमच्या स्नेहमालेत एक आणखी मोती ओवला गेला.

प्राणजी नखशिखांत सौजन्यमूर्ती होते. त्यांच्या चित्रपटातल्या खलनायकी ढंगापेक्षा वेगळे. कायम वेल-ड्रेस्ड! सदैव हसतमुख. आनंदी. दुसऱ्यांना मदत करण्यास कायम तत्पर. खलनायक म्हणून दिगंत कीर्ती मिळवणारे प्राणजी वास्तव जीवनात मात्र अत्यंत सज्जन गृहस्थ होते.

प्राणजी आणि आमचं आपसूक कौटुंबिक नातं निर्माण झालं होतं. त्यांचं आमचं एकमेकांच्या घरी सतत येणं-जाणं असायचं. काही चांगलं घडलं की पार्टी करायची प्राणजींची सवय होती. त्यांचा कलेतील लौकिक जसजसा वाढत गेला तसतसा त्यांचा विविध पुरस्कारांनी, मेडल्सनी गौरव होऊ लागला होता. त्यांची बेडरूम, त्यांच्या घरचा हॉल पुरस्कारांनी, मेडल्सनी भरून गेला होता. त्यामुळे झोकदार पाटर्य़ा करायला सतत निमित्त असायचं. राज कपूर यांच्याइतकीच प्राणजींच्या घरची होळी लोकप्रिय होती. स्वत: प्राण, राज कपूर, प्रेमनाथ असे सारे धम्माल करायचे. त्यांना मद्यपान अतिशय आवडत असे. ते मद्य पीत असत. पण मद्य त्यांना पीत नसे. (त्यांच्या घरी जी कुत्री त्यांनी पाळली होती, त्यांची नावंही ‘व्हिस्की’ आणि ‘सोडा’ अशी होती.) त्यांची शुद्ध हरपली आहे, ते बेभान झाले आहेत असं कधीच घडलं नाही. ते चवीनं खात असत. कोणताही खाण्याजोगा पदार्थ त्यांना खावासा वाटत असे. तंदूर चिकन त्यांच्या आवडीची होती. ‘स्नेहाचा मार्ग पोटातून जातो’ या उक्तीवर आमची श्रद्धा असल्याने आम्ही अतिशय पटकन् त्यांचे स्नेही झालो.

प्राणजी हे तसे दिल्लीचे. बल्लीमारानचे. त्यांचं खरं नाव प्राणकिशन केवलकिशन सिकंद असं होतं. ते फारसे स्वत:बद्दल बोलत नसत. पण एकदा गप्पांच्या ओघात ते बोलून गेले, ‘‘माझ्या जन्मतारखेचा मोठाच घोळ झाला होता. माझी जन्मतारीख ड्रायिव्हग लायसन्सच्या वेळी मी २२ फेब्रुवारी १९२० अशी सांगितली. कारण माझ्या आत्यानं कधीतरी ‘तुझा जन्म फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवडय़ात झाला,’ असं मला सांगितलं होतं. मी फारसा शिकलो नाही. त्यामुळे शाळेतल्या नोंदी मिळवण्यासाठीही मी शाळेत गेलो नाही. काही दिवसांनी माझ्यावर एक लेख छापून आला. त्यात माझी जन्मतारीख २२ फेब्रुवारी वाचून बल्लीमारानच्या एका रहिवाशाचं मला पत्र आलं. त्यात त्यांनी माझी जन्मतारीख ‘१२ फेब्रुवारी १९२० आहे’ असं म्हटलं होतं. कारण ते नगरपालिकेत काम करत होते. मग मी त्यांना ‘मला माझी अधिकृत जन्मतारीख कळवावी,’ अशी विनंती करणारं पत्र लिहिलं आणि मला माझा वाढदिवस साजरा करायला अधिकृत तारीख मिळाली!’’

प्राणजी हे तीन भाऊ आणि तीन बहिणींतले एक. त्यांचा नंबर पाचवा. त्यांचे वडील सिव्हिल इंजिनीअर होते. त्यामुळे त्यांची सतत बदली होत असे. त्यामुळे त्यांच्या मॅट्रिकपर्यंतच्या शिक्षणाचीही परवड झाली होती. प्राणजी मला सांगत, ‘‘तशीही मला शिक्षणाची मुळीच आवड नव्हती. मग मी सरळ दिल्लीच्या कॅनॉट प्लेस भागातील ए. दास कंपनीत छायाचित्रकार म्हणून शिकायला गेलो आणि त्याच्या सर्व क्लृप्त्या शिकून घेतल्या. हळूहळू मी त्यात निष्णात झालो. त्यांनी मला सिमल्याला पाठवलं. मग लाहोरला ए. दास अँड कंपनीची एक शाखा निघाली. माझी लाहोरला नेमणूक झाली.’’

प्राणजींना लाहोर म्हटलं की स्वर्गाचीच आठवण येत असे. ते ‘मेरा लाहोर, मेरा लाहोर’ असं सारखं पालुपद लावत असत. लाहोरवर त्यांचं मनापासून प्रेम होतं. याचं कारण हेच शहर त्यांना चित्रपटाकडे घेऊन गेलं. (पण नंतर कधी संधी मिळाली तरी ते लाहोरला गेले नाहीत. त्यांचा मुलगा अरिवद याच्या पहिल्या वाढदिवसासाठी ते ११ ऑगस्ट १९४७ रोजी इंदूरला आले, ते परत लाहोरला जाऊ शकले नाहीत. कारण दंगे उसळले होते. एका रात्रीत त्यांचं लाहोरचं घर पाकिस्तानात गेलं आणि ते बेघर झाले. ‘मेरा लाहोर’ म्हणताना त्यांचा चेहरा विदीर्ण होई. ती त्यांच्या राजस हृदयातील भळभळती जखम होती. प्राणजी राजिबडे तर होतेच, पण त्या काळात त्यांच्याकडे स्वत:ची घोडागाडीही होती. ‘‘मी स्वत:च्या घोडागाडीतून डौलात फिरायचो. त्या काळात भरपूर पगार होता. छायाचित्रकार म्हणून नावलौकिक होता आणि जबाबदाऱ्याही नव्हत्या. मग काय, धमाल करो. बस्स! एकदा मी मित्रांसोबत लाहोरच्या हिरामंडी भागात गेलो होतो. तिथं पानाच्या ठेल्यावर उभं राहून पान खात होतो, तोच समोरून एक प्रौढ व्यक्ती आली. तिनं भरपूर मद्यपान केलेलं होतं. मला त्या व्यक्तीनं विचारलं, ‘‘तुझं नाव काय?’’ ती व्यक्ती मला वरपासून खालपर्यंत न्याहाळत होती. मी वैतागलो. त्यांना विचारलं, ‘‘तुम्हाला कशाला हव्या आहेत या चौकशा? उगाच पिडू नका.’’ तर ती व्यक्ती म्हणाली, ‘‘माझं नाव मोहम्मद वली. मी चित्रपट लेखक आहे. सध्या मी दलसुखराम पंचोली यांच्यासाठी एक कथा लिहिली आहे. त्यातल्या एका पात्रासाठी तुम्ही योग्य आहात. उद्या सकाळी दहा वाजता मला भेटा. हे माझं कार्ड!’’ मी सकाळी उठल्यावर या गोष्टीचा विचार केला, आणि तो विचार मनातून हद्दपारही केला. दारू प्यायलेला हा माणूस मला काय लक्षात ठेवणार? त्यानंतर काही दिवस उलटले. मी मित्रांसोबत एक चित्रपट पाहायला प्लाझा थिएटरमध्ये गेलो होतो. तर तिथं वलीसाहेब उभे! मला बघताच त्यांनी शिव्यांची लाखोली वाहिली. अक्षरश: माझ्या सगळ्या पिढय़ांचा उद्धार केला त्यांनी. मी गयावया करून त्यांना ‘उद्या भेटतो,’ असं म्हणालो. दुसऱ्या दिवशी मी दलसुखराम पांचोली यांच्या स्टुडिओत वलीसाहेबांबरोबर गेलो. याचं कारण- ते स्वत:च मला घ्यायला घरी आले आणि म्हणाले, ‘‘आज तू मला टांग देऊ नयेस म्हणून मी स्वत:च तुला न्यायला आलोय.’’ त्या दिवशी माझी स्क्रीन टेस्ट झाली आणि मी रूपेरी पडद्यावर आलो ते ‘यमला जाट’ या चित्रपटात.

तसा प्राणजींच्या चेहऱ्यावर पहिला रंग लागला होता तो सिमल्याच्या रामलीलेत. त्या रामलीलेत प्राणजींनी सीतामाईची भूमिका केली होती आणि राम झाले होते मदन पुरी! काय गंमत आहे बघा, हे दोघेही आधी मोठे खलनायक झाले आणि नंतर चांगल्या चरित्र भूमिका करू लागले. हे दोघेही आमच्या प्रीतमचे खास चाहते होते.

प्राणजींनी एकदा घरगुती गप्पांत लहानपणची एक आठवण सांगितली. ते लहानपणी अतिशय खोडकर होते. त्यांच्या घरी कार होती. छोटा प्राण बारकाईनं बाबूजी कार कशी सुरू करतात ते बघत असे. एकदा या छोटय़ानं आसपास कोणीही नाही असं बघून आपल्या निरीक्षणाच्या बळावर कार सुरू केली आणि भुर्रकन् निघून गेला. थोडय़ा वेळानं तो घाबरत घरात आला आणि बाबूजींना चाचरत म्हणाला, ‘‘आपली गाडी.. आपली गाडी.. ’’ पुढे तो काहीच बोलेना. बाबूजी वैतागले. छोटा प्राण म्हणाला, ‘‘मी कार सुरू केली. चालवलीही. पण ती कशी वळवायची हे मला माहीत नाही. तेवढय़ात समोर तळं दिसलं. पण कार काही वळेना. मग मी बाहेर उडी मारली..’’ आधी बाबूजी चिडले. पण नंतर हसायला लागले.

प्राणजी लोकांचे चाहते होते. त्यांना सतत चलनवलन लागायचं. आम्ही बसाखी सुरू केली ती त्यांच्याच प्रेरणेनं. बसाखीचे चार दिवस ते सगळं शूटिंग रद्द करत. घरादारासह ते बसाखीत सामील होत. आमच्या एका बसाखीला ते म्हणाले, ‘लंडनहून काही जणांना बसाखीत कला सादर करायला यायचंय.’ आम्ही एकदम गडबडून गेलो. आठ-दहा जण येणार होते. त्यासाठी पसे कुठून आणायचे? प्राणजींनी तो प्रश्न सोडवला. ते  म्हणाले, ‘ही मंडळी स्वत:च्या खर्चाने येतील आणि माझ्याकडेच राहतील.’ मी आणि आमच्या पंजाब असोसिएशनचे एक पदाधिकारी एअरपोर्टवर पाहुण्यांना आणायला गेलो. त्यांच्याजवळ भरपूर इलेक्ट्रॉनिक वाद्य्ो होती. त्या काळात अशी वाद्य्ो भारतात मिळत नसत. त्यामुळे कस्टम्सचे त्याबद्दलचे नियम जाचक होते. ही सर्व वाद्य्ो परत जातील अशी हमी कोणीतरी घ्यायला हवी होती. आम्ही ‘हे सगळे प्राणजींचे पाहुणे आहेत,’ असं सांगून पाहिलं. पण तरी कस्टम्सवाले म्हणाले, ‘प्राणसाहेबांनी स्वत: तसं लिहून दिलं पाहिजे.’ आम्ही प्राणसाहेबांना शोधू लागलो. तो साध्या फोनचाही जमाना नव्हता. बाहेर येऊन त्यांच्या सचिवाला फोनवर गाठलं. तर तो म्हणाला, ‘प्राणजी झोपले आहेत. मी नाही त्यांना उठवणार. मला ओरडतील ते.’ शेवटी आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्यांना उठवलं. अडचण सांगितली. तर काही न बोलता त्यांनी स्वत: कार काढली. आम्हाला घेऊन ती चालवत ते विमानतळावर आले. त्यांनी हमीपत्र लिहून दिलं आणि आमची वरात घेऊन ते स्वत:च्या घरी परतले. एवढा मोठा कलाकार.. पण त्यांच्या मनात काही आलं नाही. जेवढा महान कलाकार, तेवढाच महान माणूस!

राज कपूर ‘मेरा नाम जोकर’ पडल्यामुळे पार खंक झाले होते. त्यांनी ‘बॉबी’ करायला घेतला तेव्हाची गोष्ट. मी त्याला साक्षीदार आहे. राजजींनी प्राणजींना कथा ऐकवली आणि साईन करण्यापूर्वी त्यांना म्हणाले, ‘‘प्राणसाब, मेरे पास अब पसा नहीं है। क्या आप को मं पिक्चर रिलीज होने के बाद पसा दू तो चलेगा?’’ प्राणजींनी राजसाहेबांना विचारलं, ‘‘क्या आप के पास एक रुपये का डॉलर है?’’ राजसाहेब गडबडले. पण म्हणाले, ‘‘हां हां, है ना।’’ त्यांनी बंदा कलदार रुपया काढला. तो हातात घेऊन प्राणजी म्हणाले, ‘‘मिल गयी मुझे सायिनग अमाऊंट.’’ प्राणजी हा माणूसच वेगळा होता!

त्यांच्यामुळे मी प्रोडय़ुसर झालो. त्याचं असं झालं.. की एकदा ते माझ्याकडे आमच्या संगीता फिल्म्सच्या प्रसाद चेंबरमधील ऑफिसमध्ये आले. मला म्हणाले, ‘‘कुलवंतजी, आप मेरे लिये एक काम करो. मी एक माणूस तुमच्याकडे पाठवतोय. त्याने उत्तम चित्रपट बनवलाय. पण तो पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे आता पसे नाहीत. तुम्ही त्याला पसे द्या आणि निर्माते व्हा. हुशार तरुण आहे. के. असिफ यांचा असिस्टंट होता. त्याच्या या सिनेमात मी, संजीवकुमार, रीना रॉय आणि अमजद खान काम करत आहोत. आम्ही त्याच्याकडून एकही पसा घेणार नाही. तो सिनेमा पूर्ण करेल याची मी खात्री देतो.’’ प्राणजींनी मग संजीवकुमार आणि अमजदला माझ्यासमोर आणलं आणि त्यांच्याकडून ते मोफत काम करणार आहेत हे वदवून घेतलं. रीनाही तेच म्हणाली. आम्ही ‘लेडीज टेलर’ हा चित्रपट प्रोडय़ुसर म्हणून प्राणजींसाठी केला.

ज्याला आपलं म्हटलं त्याला प्राणजींनी कधीच अंतर दिलं नाही. खलनायक म्हणून नायक-नायिकेत अंतर निर्माण करणाऱ्या या अभिनेत्यानं माणसा-माणसांतलं अंतर मात्र नेहमीच कमी केलं.

कोणीही आपल्या मुलाचं नाव कधीही ‘प्राण’ असं ठेवत नाही. पण मला पुढच्या जन्मात संधी मिळाली तर मी माझ्या मुलाचं नाव ‘प्राण’ ठेवीन!

शब्दांकन : नीतिन आरेकर

ksk@pritamhotels.com

Story img Loader