शब्दांकन : नीतिन आरेकर

दिग्दर्शक लेखराज भाखरीसाहेब मनोजला म्हणाले, ‘‘मनोज, हा चित्रपट आहे, कॉलेजचं नाटक नाही. त्यामुळे तुझा अभिनय थोडा संयतशीर कर.’’ मनोजला खूप वाईट वाटलं. माझ्याजवळ तर तो रडलाच. म्हणाला, ‘‘कसं जमेल मला? तशा माझ्या फारशा अपेक्षा नाहीत या इंडस्ट्रीकडून. मला फक्त तीन लाख रुपये हवेत. एक लाख रुपये माझ्यासाठी, एक लाख रुपये माझ्या परिवारासाठी आणि एक लाख रुपये आई-बाबांसाठी. बस्स! तेवढे मिळाले की मी चित्रपटसृष्टी सोडून जाईन.’’ परंतु तसं घडणार नव्हतं..

काही काही नावांच्या बाबतीत आपण पूर्वग्रहदूषित असतो. आपल्या चित्रपटाचा नायक हा कपूर, खन्ना, खान, कुमार असाच असायला हवा अशी आपली पक्की समजूत असते. आता मला सांगा, ‘हरीकिशनगिरी गोस्वामी’ हे काय नायकाचं नाव असू शकतं का? खरं तर हे नाव असायला पाहिजे एखाद्या धार्मिक दूरचित्रवाहिनीवरील महाराजांचं. पण हे मूळ नाव आहे आपल्या ‘भारतकुमार’चं- म्हणजे मनोजकुमारचं!

मत्रीची व्याख्या ‘दररोज भेटणं, सुखदु:खाच्या गप्पा मारणं’ अशी काही असेल तर मनोज माझा मित्र नाही. परंतु अनेक दिवसांनंतर, महिन्यांनंतर किंवा वर्षांनंतर तुम्ही दोघं भेटलात व भेटल्यावर एकमेकांना आलिंगन दिलं आणि अस्सल पंजाबी माणसासारख्या शिव्या दिल्यात आणि मधे काहीच अंतर पडलं नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याला मत्री म्हणतात, अशी जर का मत्रीची व्याख्या असेल तर- हो, मी व मनोज आम्ही दोघं मित्र आहोत!

मनोजचे मामू म्हणजे निर्माते कुलदीप सेहगल. ते उत्तम चित्रपट निर्माण करत असत. लेखक-दिग्दर्शक लेखराज भाखरी हे त्यांचे पार्टनर होते. या दोघांनी मिळून भारतीय चित्रपटसृष्टीला काही सुंदर चित्रपट दिले. उषाकिरण-सुरेशचा ‘दोस्त’ (१९५५), मीनाकुमारीचा ‘सहारा’ (१९५८), राजकुमार-श्यामा यांचा ‘पंचायत’ (१९५८), सुरैयाचा ‘शमा’ (१९६१) असे काही चित्रपट या दोघांनी बनवले. हे फारसे यशस्वी चित्रपट नव्हते. पण त्यांनी व्यवसाय व्यवस्थित केला होता, हे नक्की. हेमंतकुमार, गुलाम महंमद यांच्यासारख्या महान संगीतकारांनी त्यांचं संगीत दिलं होतं. या दोघांनीही विलक्षण संघर्ष करून आपलं कर्तृत्व सिद्ध केलं होतं. कुलदीप सेहगल यांचा भाचा म्हणजे- हरीकिशन गोस्वामी! तो दिल्लीतून नाव मिळवायला व चित्रपटाचा लेखक, ‘हिरो’ बनायला मुंबईत आला आणि इथंच राहिला. त्यानं चित्रपटासाठी नाव स्वीकारलं- ‘मनोजकुमार’! त्यामागचीही एक गमतीशीर कथा त्यानं मला सांगितली, ‘‘मी दिल्लीत आलो, त्या वेळी केव्हातरी दहा-अकरा वर्षांचा असताना मी दिलीपकुमार, कामिनी कौशल, अशोककुमार यांचा ‘शबनम’ हा सिनेमा पाहिला. दिलीपसाहेबांच्या अभिनयानं मला असं काही भारावून टाकलं की बस्स! त्या वेळी मी मनात निश्चय केला, की आपल्याला सिनेमात जायचंय, हिरो व्हायचंय आणि हिरो होताना ‘मनोजकुमार’ हे नाव घ्यायचंय!’’

मनोज  सुरुवातीला अर्थातच त्याच्या मामाकडे राही. कुलदीपजी हे पंजाबी आणि त्यांचं कार्यालय रणजित स्टुडिओत. त्यामुळे अर्थातच त्यांचं जेवण आमच्याकडे असायचं. ते काही कार्डावर जेवत नसत, तर नगद पसे देऊन जेवायला येणारं आमचं ते मोठं गिऱ्हाईक होतं. त्यांच्या चित्रपटांसाठीचं जेवण आमच्याकडून जाई. मनोज मामूकडे जात असे, पण कुलदीपजींचं कार्यालय छोटं असल्याने त्यांच्याकडे कोणी आलं की ते मनोजला बाहेर जायला सांगत. आता मनोज जाणार कुठं? मग तो ‘प्रीतम’मध्ये माझ्याजवळ येऊन बसत असे. असं आठवडय़ातून निदान चार-पाच वेळा तरी होत असे. मनोज ही गोष्ट सहजपणे स्वीकारत असे. दुपारी बारा-साडेबाराच्या सुमारास आलेला मनोज मग ‘प्रीतम’ बंद होईपर्यंत तिथंच थांबे. मी काउंटरवर असे आणि तो समोरच्या एखाद्या खुर्चीत किंवा बाकावर बसे. आम्ही दोघं गप्पा मारत असू. तो काउंटर सांभाळायला मला मदत करी. काही वेळा दुपारी साडेतीनच्या सुमारास ‘प्रीतम’ बंद केल्यावर मी दादरच्या भाजी मार्केटमध्ये भाज्या खरेदी करायला जाई, तेव्हा मनोज माझ्याबरोबर येत असे. आपला मामा मोठा चित्रपट निर्माता आहे, वगरे गोष्टी त्याच्या मनात अजिबात येत नसत. त्याचाही चेहरा फारसा माहिती झाला नसल्याने तो मोकळेपणाने फिरू शकत होता.

मनोजला अनेक महिने कामच मिळालं नाही. तो माझ्याजवळ आपलं मन मोकळं करत असे. मनोजचा जन्म अबोताबादचा होता. अबोताबाद आता पाकिस्तानात आहे. भारताची दुर्दैवी फाळणी झाली त्यावेळी तो जेमतेम दहा वर्षांचा होता. त्यामुळे फाळणीचे खाल्लेले चटके त्याच्या मनात सदैव जागे राहिले होते. कोवळ्या वयात मनाला ज्या गोष्टींमुळे जखमा होतात किंवा ज्या गोष्टींमुळे आनंद मिळतो, त्या गोष्टी आयुष्यभर ध्यानात राहतात; तसं फाळणीबाबत त्याचं झालं होतं. फाळणीच्या ज्या वेदना आमच्या पंजाबनं भोगल्या व आजवर मनात वागवल्या आहेत, त्यांचं निर्माल्य कधी झालं नाही. ती रक्तफुलं आजही पंजाबच्या मनात ताजी आहेत व त्यांची झाडापासून खुडलं जातानाची वेदना तितकीच तीव्र आहे. मनोजच्याही मनात अबोताबाद आजही तसंच जिवंत आहे. त्याचं कुटुंब दिल्लीत आलं, सुरुवातीला ते निर्वासित म्हणून विजयनगर, किंग्जवेला राहिले आणि नंतर ते ओल्ड राजस्थान नगरमध्ये स्थायिक झाले.

मनोज देखणा होता. त्याला लिखाणाची आवड होती. तो उत्तम कथा, कविता लिहीत असे आणि मला ऐकवत असे. त्यातली एकही कथा किंवा कविता आज मला आठवत नाही, याची मला आता खंत वाटते. त्या वेळी जर टेप रेकॉर्डर माझ्याकडे असता तर मी ते रेकॉर्ड करून ठेवलं असतं. मनोजने निर्माण केलेल्या काही चित्रपटांची बीजं त्यात दडलेली होती असं आता जाणवतंय. मनोज दिल्लीतल्या िहदू कॉलेजचा विद्यार्थी होता. तिथं ‘‘लेखनात नाव मिळवलं होतं, थोडासा अभिनयही मी केला,’’ असं तो मला सांगे. मनोजला चित्रपटासाठी काम करायचं होतं.. पण लेखक म्हणून; अभिनेता म्हणून नाही. तो त्याच्या मामूच्या आश्रयाला मुंबईत आला.

त्याचा मामू हा काही सर्वसामान्य मामूसारखा नव्हता. त्याने मनोजला चित्रपटसृष्टीत धक्के खायला लावलं, जगाचे टक्केटोणपे खायला लावले. मनोजची त्याविषयी काहीही तक्रार नव्हती. तो मला म्हणत असे, ‘‘बसून खायला मिळायला एक तर नशीब लागतं किंवा भिकारी व्हावं लागतं. म्हणजे हात पसरला की कोणीतरी भीक घालतं. यश हे हात पसरणाऱ्यांकडे कधी जात नाही, ते जातं मेहनत करणाऱ्यांकडे. मला मेहनत करायला आवडेल.’’ या काळात मनोज अनेक निर्मात्यांकडे काम मागायला जाई. पण अनेक जण त्याला भेटत नसत किंवा त्याला वाटाण्याच्या अक्षता लावत असत. तो निराश व्हायचा नाही. मला म्हणायचा, ‘‘कुलवंत, एक दिवस माझा येईल. त्यावेळी मी अशा पद्धतीनं कुणाला वागवणार नाही. मी त्या व्यक्तीला योग्य सन्मान देईन.’’ इथं मला त्याच्यातला हळवा लेखक दिसायचा. कित्येकदा दुपारच्या वेळी मनोजला ‘प्रीतम’च्या एखाद्या टेबलवर बसून काहीतरी लिहिताना मी पाहत असे. त्याने अनेक चित्रपटांचा ‘घोस्ट रायटर’ म्हणून लेखन केलंय. त्याचं त्या चित्रपटांत कधी नाव आलं नाही. त्या चित्रपटांनी खूप यशही मिळवलं, पण मी त्यांची नावं सांगणार नाही; ते योग्य ठरणार नाही. मनोजच कधीतरी त्याबद्दल सांगेल. या लेखनातून मिळणाऱ्या पशांवर तो व त्याचे मित्र थोडीशी मजा करत. या मित्रांत तेव्हा स्ट्रगलर असलेला धर्मेद्रही होता. धरमची आणि मनोजची मत्री ही तेव्हापासूनची आहे. मी त्याचा साक्षीदार आहे.

दुपारी तीन-साडेतीच्या सुमारास मी हॉटेल बंद करताना आम्ही दोघं एक-एक कोकाकोला पित असू. चार आण्याच्या त्या कोकाकोलाने आम्हाला चार जन्मांचं मत्र बहाल केलं. नंतर कुलदीपजींनी मनोजला त्यांच्या ‘सहारा’ या चित्रपटात मीना कुमारीसमवेत काम दिलं. मनोज हा मीनाचा हिरो नव्हता, पण त्याचं अस्तित्व त्यात जाणवलं. त्या दिवशी मनोजनं मला कोकाकोलाचे पसे दिले आणि नंतर म्हणाला, ‘‘कुलवंत, हे पसे मी एकदाच देणार. यानंतरचा कोकाकोलाही तूच मला पाजणार आहेस.’’ आम्ही दोघांनी आजवर ते पाळलं आहे. ‘सहारा’ चित्रपटामुळे त्याचा चेहरा लोकांच्या ओळखीचा झाला. कुलदीपमामूनं त्याला अनेक चित्रपटांतून काम दिलं. पण मनोजनं यशाची पहिली चव घेतली ती ‘हरियाली और रास्ता’ या चित्रपटातून. त्यानंतर त्याचा वारू चौखूर उधळला.

मनोजच्या सुरुवातीच्या एका चित्रपटाच्या शूटिंगला त्याने मला बोलावलं. मी म्हणालो, ‘‘यार, मी तिथं येऊन काय करणार? मी तर बोअर होऊन जाईन.’’ पण त्याने मला यायलाच लावलं. बहुधा ‘सहारा’चं शूटिंग असावं. मनोजच्या हातात स्क्रिप्ट होतं. त्याच्यावर त्याने ठिकठिकाणी खुणा केल्या होत्या. दुसरा साहाय्यक दिग्दर्शक मनोजजवळ येऊन त्याचे संवाद पाठ झाले की नाही ते पाहून गेला. त्यांनतर पहिला साहाय्यक दिग्दर्शक आला. त्याने मनोजची तालीम घेतली. कॅमेरा कसा फिरेल याचा अंदाज दिला आणि शॉट तयार झाला की सांगतो, असं म्हणून तो गेला. मनोज मला म्हणाला, ‘‘कुलवंत, यार रात्रभर हे स्क्रिप्ट वाचत बसलोय, त्यातले माझे संवाद पाठ करतोय. ते एकदा शूट झाले की सुटलो. तुला मी यासाठी बोलावलं की, मी काही चुका करतोय का ते तू सांग.’’ कपाळ माझं! मी काय सांगणार त्याला. त्या शॉटचे सहा रिटेक झाले. सातवा टेक ओके झाला. लेखराज भाखरी हे दिग्दर्शक होते. भाखरीसाहेब त्याला म्हणाले, ‘‘मनोज, हा चित्रपट आहे, कॉलेजचं नाटक नाही. त्यामुळे तुझा अभिनय थोडा संयतशीर कर.’’ मनोजला खूप वाईट वाटलं. माझ्याजवळ तर तो रडलाच. म्हणाला, ‘‘कसं जमेल मला? तशा माझ्या फारशा अपेक्षा नाहीत या इंडस्ट्रीकडून. मला फक्त तीन लाख रुपये हवेत. एक लाख रुपये माझ्यासाठी, एक लाख रुपये माझ्या परिवारासाठी आणि एक लाख रुपये आई-बाबांसाठी. बस्स! तेवढे मिळाले की मी चित्रपटसृष्टी सोडून जाईन.’’ परंतु तसं घडणार नव्हतं. तो तब्बल चाळीस वष्रे सिनेमाक्षेत्रात कार्यरत राहिला. मनोजला जेव्हा नायकाची भूमिका करायची ऑफर पहिल्यांदा मिळाली तेव्हा तो ती स्वीकारण्यापूर्वी मला म्हणाला, ‘‘यार, हिरो मी होणार, पण आधी शशीला विचारतो मग त्यांना हो म्हणतो.’’ शशी भाभीशी त्याचं तेव्हा लग्न ठरलं होतं. तिनं लगेच होकार दिला व मनोजकुमार ‘हिरो’ झाला!

हळूहळू मनोजला आत्मविश्वास मिळाला. आणि तो यशाच्या पायऱ्या चढू लागला. तो निर्माता बनला. मनोजच्या मनात देशाविषयी अतिशय प्रेम होतं. आमच्या गप्पांतही तो देशहिताच्या गोष्टी बोलायचा. त्या थोडय़ाशा फिल्मी पद्धतीच्या कल्पना होत्या. पण त्याला देशासमोरच्या प्रश्नांची व्यवस्थित जाण होती. कोणत्याही भारतीयाप्रमाणे सरदार भगतसिंगांबद्दल त्याला प्रचंड आदर होता व तो आदर त्याने ‘शहीद’ या चित्रपटात भगतसिंग यांची भूमिका करून व्यक्त केला. ‘शहीद’च्या यशामुळे मग तो देशप्रेमावर आधारित कथानकंच निवडू लागला. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांनी त्याला ‘जय जवान, जय किसान’ या त्यांच्या घोषणेवर आधारित चित्रपट करायला सांगितलं. मनोज खूश झाला आणि त्याने ‘उपकार’ हा चित्रपट करायला घेतला. त्या वेळी तो एकदा मला म्हणाला, ‘‘कुलवंत, बघ मी या चित्रपटातून प्राणसाहेबांची प्रतिमा बदलून टाकीन.’’ प्राणसाहेबांचे व माझे संबंध त्याला ठाऊक होते. प्राणसाहेबांनी मनोजची त्यांना चरित्रभूमिका देण्याची कल्पना धुडकावून लावली. ते त्याला म्हणाले, ‘‘अरे, मी खलनायक म्हणून प्रसिद्ध आहे. मला जर चांगल्या माणसाची भूमिका दिलीस तर चित्रपट पडेल.’’ पण मनोजला स्वत:विषयी आणि प्राणजींच्या क्षमतेविषयी खात्री होती. ‘सर्वच माणसं शहरात आली तर देशाची भूक कोण भागवेल?’ असा प्रश्न त्याने या चित्रपटातून विचारला होता. प्राणजींनी ‘उपकार’मधल्या भूमिकेचं सोनं केलं आणि इतिहास घडला. मनोजची आता ‘भारतकुमार’ अशीच ओळख बनली.

मनोज आमच्या पंजाब असोसिएशनच्या बसाखीच्या कार्यक्रमांना हटकून येत असे. त्या कार्यक्रमांत तो छानसं भाषण करत असे. त्याच्या चित्रपटांतली गाणी गात असे किंवा नवी शायरी ऐकवत असे. त्याने अमाप यश मिळवलं, पण ते यश त्याच्या डोक्यात गेलं नाही. मनोज देखणा होता. पोरी त्याच्या अवतीभवती पिंगा घालत असत. तो त्या पोरींना फारशी धूप घालत नसे. त्याच्या नायिका सुंदर असत. त्यांना तो पावसात भिजवतही असे, पण त्या भिजवण्यामागे ओंगळ हवस नसे. मला तो म्हणायचा, ‘‘स्त्रीच्या सौंदर्याचा बाजार मांडून पसे कशाला कमवायचे. शृंगारिक दृश्य करताना स्त्री-पुरुष शरीरस्पर्श कशाला दाखवायचा? दोघांनी परस्परांकडे पाहात असतानाही सौंदर्यनिर्मिती होतेच ना. प्रत्यक्ष दाखवण्यापेक्षा सूचकतेतलं सौंदर्य अधिक सुंदर असतं.’’ मनोजची प्रेमदृश्ये किंवा नायिकेच्या सोबतची समीपदृश्ये आठवा, म्हणजे माझ्या बोलण्याचा प्रत्यय येईल.

मनोजने निर्माण केलेले सर्व चित्रपट हे त्याच्यामधल्या लेखकाची ओळख देतात. मला त्याने लिहिलेली ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटाची पटकथा खूप आवडते. साईबाबांवर त्याची अतीव श्रद्धा आहे. तो शिर्डीला नियमितपणे जात असे. पण आता प्रकृति अस्वास्थ्यामुळे तो घराबाहेर फारसा पडत नाही. त्याचे फारसे मित्र नाहीत. सुरुवातीपासून जे होते तेच आजही आहेत. त्यापकी मी एक आहे, याचा मला आनंद वाटतो. त्याचा मुलगा कुणाल मनोजचा निरोप घेऊन येतो, ‘‘डॅडी तुमची आठवण काढत आहेत.’’ मनोजचा फोन येतो, ‘‘घरी येऊन जा.’’ आता हा लेख प्रसिद्ध झाला की तो घेऊन मी मनोजकुमारकडे जाणार आहे. त्याच्याबरोबर भरपूर गप्पा मारणार आहे. आणि न विसरता कोकची एक बाटलीसुद्धा सोबत घेऊन जाणार आहे!

ksk@pritamhotels.com

Story img Loader