चार-पाच वर्षांपूर्वी माझ्या सर्व कविता-संग्रहांतून निवडून काढलेल्या काही कवितांचं एक पुस्तक काढायची संकल्पना मनात घोळत होती. त्या काव्यसंग्रहाचं नाव मी योजलं होतं, ..‘तुझ्या कविता..’ ती कल्पना अमूर्तच राहिली आणि राहणार असं दिसतंय.. गंमत म्हणजे कवितेचं वेड जडल्यावरच्या आरंभीच्या वेडय़ा वयात मी मला आवडणाऱ्या अनेक कविता (केशवसुतांपासून ते आरती प्रभू- नारायण सुर्वेपर्यंत) एका वहीत स्व-हस्ताक्षरात उतरवून काढल्या होत्या आणि त्या वहीला नाव दिलं होतं, ‘माझ्या’ कविता.. म्हणजे त्या सगळय़ा ज्येष्ठ कविजनांच्या कवितांना मी ‘माझ्या’ म्हणून संबोधत होतो. आणि इथे मात्र दस्तुरखुद्द माझ्याच कविता असूनही त्या मात्र होत्या, ‘तुझ्या कविता’ याचं कारण अगदी साधंसरळ होतं. त्या सगळय़ा कविता कुणातरी ‘तू’ नामक व्यक्तीला उद्देशून लिहिल्या गेल्या होत्या.. आणि ते संबोधन बहुतेकवेळी ‘स्त्री’ वाचक होतं, हेही वेगळं सांगायला नको. साहजिकच त्या त्या काळात त्या कविता वाचताना किंवा ऐकताना ‘ही ‘तू’ कोण’? या अपरिहार्य प्रश्नाला तोंड द्यावं लागणं, हेही ओघानंच यायचं. याची जबाबदारी प्रामुख्यानं आपल्या ज्येष्ठ कवी-परंपरेकडेच जाते. कारण विशेषत: रविकिरण मंडळपुरस्कृत अनेक कवींच्या कवितांची शीर्षकं ही ‘..स’ किंवा ‘..ला’ अशी वाचकाची उत्सुकता उगीचच चाळवणारी असायची. (त्या कुणा ‘..ला’ किंवा ‘..स’ ला तरी ते ठाऊक असायचं की नाही, ते स्वत: कवीच जाणे)..
ही माझी कुठलीही कविता कुणाही विवक्षित व्यक्तीला उद्देशून नाही, हे पटवून देताना माझी मात्र दमछाक व्हायची. कुणाही कवी, कलावंतांचं दैनंदिन लौकिक आयुष्य आणि त्यांचं संपूर्ण व्यक्तिगत स्वरूपाचं मानसिक पातळीवरचं जगणं या दोन स्वतंत्र गोष्टी असू शकतात, नव्हे, असतातच.. त्या दोन्ही पातळय़ा अनेक अर्थानी परस्परांशी जोडलेल्या असतात आणि तरीही स्वतंत्रही असतात. जगण्यातील अनुभवातूनच कविता आपला जीवनरस घेतात, हे खरंच, पण कलाकृती बनताना त्या अनुभूती काही वेगळय़ाच होतात, जणू एक नवा जन्मच घेतात.. कधी कधी असंही वाटतं, कुणाही पुरुष कवी- कलावंत व्यक्तींच्या मनोविश्वात एक अमूर्त स्त्रीरूप अखंड तरळत असतं आणि तेच त्याच्या सर्व आविष्काराची मूलभूत प्रेरणाही होत राहतं. त्याच्या वैयक्तिक जीवनात जे अविस्मरणीय आणि अनमोल असे अनुबंध येतात हे त्या प्रतिमेचेच अंश असतात. पण तरीही ती मूळ धूसर रूपप्रतिमा जराही उणावत नाही.. आणि हे सगळं स्वत: कवीच्याही नकळत घडत असतं, हे कलात्मक वास्तव समजून घेतलं तर ‘कवितासखी’च्या या ‘तू’ कवितांचा प्रवास समजून घेणं सोपं होईल..
‘दिसलीस तू. फुलले ॠतू’ हा या जाणिवेचा पहिला प्रकट आविष्कार होता. ‘सखि, मंद झाल्या तारका. आता तरी येशील का’ हे आर्त आवाहनही त्या अनामिक ‘तू’ साठीच होतं.. ‘मन लोभले मनमोहने’ ही कबुलीही त्या ‘तू’लाच दिली होती.. ‘पक्ष्यांचे ठसे’मधील ‘एक सांगशील आपले रस्ते अवचित कुठे, कसे जुळले.’ ‘तुझ्या-माझ्या सहवासाचा योग..’ आणि ‘काय म्हणालीस, वेळ झाली आता तुला निघायला हवं..’ या तीन       संपूर्ण वेगळय़ा भावावस्था मांडणाऱ्या तीन कविता हे त्या ‘तू’ चे घेतलेले तीन अटळ निरोप होते..    ‘लय’ या कवितासंग्रहातील कविता या दृष्टीनं मला अधिक परिपक्व आणि त्यामुळेच जवळच्या वाटतात.

‘ना सांगताच तू
मला उमगते सारे
कळतात तुलाही
मौनातील इशारे
दोघांत कशाला मग शब्दांचे बांध
कळण्याचा चाले कळण्याशी संवाद’

‘मी तुझ्या घराशी
खरेच होतो आलो
थबकलो जरासा,
क्षणात मागे फिरलो
किती दूर पोचलो, सर्व तोडूनी धागे
क्षण वळून पाहिले. तुझा उंबरा मागे.

‘तू वेध घेतला
आणि साधला नेम
त्या क्षणापूर्वी तर
होते सारे क्षेम
झाले ते झाले एक कळेना फक्त
का तुझ्या काळजातुनी झिरपते रक्त?

कधी गौर बसंती
कधी सावळी छाया
कधी वेल कृशांगी
कधी पुष्कळा काया
दर वळणावरती अनोळखी झालीस
मी ओळखले तू.. होय, तूच आलीस.
कधी कधी जाणवतं की जगतानाचे रोजचे वाटणारे क्षण आपल्याला एक नवी जाग देऊन जातात.. कवीला एका क्षणी खोल आत जाणवलेली एक नवी जागृती कवितेचं घेऊन आली, तीही या ‘तू’ला उद्देशूनच. असंही जाणवेल की, ती त्याची स्वत:ची अनुभूती तर आहेच, पण कुणाही संवेदनाशील आणि प्रामाणिक पुरुष-मनाचं हे एकप्रकारे ‘कन्फेशन आहे.’
ॉनव्या प्रकाशे नाहतेस तू.. मीच बदललो नाही
क्षणोक्षणी होतेस नवी तू. मीच बदललो नाही
परंपरा-रुढींच्या बेडय़ा युगेयुगे तुजभवती
संस्कृतीचे नीतीचे दांभिक कुंपण तुझियासाठी
तोडलेस तू सर्व पाश परि मी न सोडिले काही..

किती भ्रमांचे लोभस जाळे तुजभंवती विणलेले
किती सापळे जागोजागी तुजसाठी रचलेले
ओलांडून ते तुला न्यायची नाव नवीन प्रवाही..
नव्या जगाच्या वाटेने तू सर्वदूर जाशील
मिळवशील तू तुझे हरवुनही बसशील
चुकण्याचा अन शिकण्याचा हा धर्मच ना तुझाही
अस्तित्वाचे मूल्य चिरंतन तुला-मला उमजेल
शरीराचे अन् पल्याडचेही माणूसपण उमगेल
माणूस म्हणुनी जगण्याचा अधिकार मला.. तुलाही..
पण एक अगदी नुकतीच, म्हणजे या महिनाभरात माझ्याकडे आलेली एक कविता एका वेगळय़ा कारणाने मला आज अपूर्वाईची वाटते आहे. तीही त्या ‘तू’ शीच बोलणारी आहे. पण तिच्या एकूण स्वरूपाने स्वत: कवीलाच थोडंसं गोंधळात टाकलंय. त्या कवितेच्या भावाकडे पाहताना वरकरणी असं वाटतं की ही खरं तर ‘दिसलीस तू.’ या अवस्थेच्या आधीची पायरी आहे, कारण तिची सुरुवातच अशी आहे..
‘मज सांग कधी दिसशील?
..तू कोण, कुठे असशील?’
पौगंडावस्था संपवून तारुण्यात प्रवेश करताना मनात सुरू होणारी ही अनामिक हूरहूर आज इतके पावसाळे पचवलेल्या निबर मनात का बरे उमटावी? ही निरागसता तर आपण कधीच विसरूनही गेलो होतो. अर्थात म्हणजे कवी अगदीच झाल्या-गेल्यात जमा झालाय असं अर्थातच नाही. आजही त्याचं वर्णन करायचं झालं तर कवी अनिलांच्या ओळी सांगाव्या लगतील.. ‘विचार आणि विकार भावनात पाझरे/मधू न त्यातला सरे, म्हणे न मीही त्या पुरे.’ पण तरीही हा अवेळीचा श्रावणातील उन-सावलीचा खेळ कां.? आणि एका क्षणी मनांत लख्ख प्रकाश पडला.. हे प्रश्न मनातील त्या सुप्त ‘तू’साठी नाहीतच.
३०-४० वर्षांपूर्वी एका साहित्यकृतीतील एका लोभस व्यक्तिरेखेनं मनावर जणू भूल टाकली होती. र्वष लोटली, पण ती व्यक्तिरेखा जराही पुसट झाली नाही. उलट तिनं नव्या आविष्काराची प्रेरणा दिली, जी वर्षांनुवर्ष मनात फुलत राहिली. आणि आता ती मूर्त रूप घेऊ पाहते आहे. एका चित्रकृतीच्या रूपांत. याचा अर्थ आजवर मनांत अमूर्त असलेला ती व्यक्तिरेखा आता पडद्यावर सदेह साकार करायला हवी. हे आव्हान दिग्दर्शक म्हणून स्वत:ला तर असेलच, पण तितकंच ते त्या व्यक्तिरेखेत प्रवेश करणाऱ्या कलावतीलाही स्वीकारावं लागेल. ती कोण असेल, कशी दिसेल, कुठे भेटेल? तात्पर्य, या कवितेचं मनोगत एका कवीचं नाही. तर एका वेगळय़ाच माध्यमाला हात घालू बघणाऱ्या एका कवी-हृदयाच्या कलाकाराचं असेल आणि त्यामुळे हे सारे हुरहुरते प्रश्न आहेत. ते वर्षांनुवर्षे मनांत रुंजी घालणाऱ्या त्या व्यक्तिरेखेलाच.. हे उमगलं आणि मनाला एक अपूर्व ताजगी लाभली आहे.. कलाकार म्हणून, माणूस म्हणून कवी म्हणूनही..
मज सांग.. कधी दिसशील?
..तू कोण. कुठे असशील?
स्वप्नांच्या क्षितिजावरती
तू धूसरशी आकृती
कधि समूर्त तू होशील?

प्रत्येक सुगंधी श्वास
जागवी तुझा आभास
कधि भास खरा करशील?

मी जाणून आहे अंती
तू इथेच अवती भवती
परि चाहूल ना देखील

हे ऐकून गाणे वेडे
माझ्या हृदयीचे कोडे

तू क्षणात उलगडशील. मग वेगळी न उरशील..

Story img Loader