मंजुळ, भरदार खर्जातला, तार स्वरातला, किनरा, शुष्क कोरडा, भावविहीन, सानुनासिक, संमोहन घालणारा, कोता, स्नेहमयी, घोगरा, कुजबुजता, कर्कश, भरड खरखरीत, स्निग्ध आवाजाच्या अशा किती किती तऱ्हा असतात आणि एखादी व्यक्ती बोलताना शब्दांच्या उच्चारीत रूपानुसार तसेच बोलणाऱ्याच्या लकबींसह स्वरांच्या अनुरूप चढ-उतारातून सिद्ध होणाऱ्या शब्दोच्चारांतून- त्यामधल्या तिच्या भावना व्यक्त होत असतात आणि समोरच्या श्रोत्याच्या ग्रहणशक्तीनुसार त्या त्या प्रमाणात पोहोचतही असतात. माणूस सर्वसाधारणपणे बोलत असताना तीन ते चार सुरांच्या रेंजमध्ये बोलत असतो. उत्तेजित झाल्यास अगर आवश्यकता पडल्यास तार सप्तकातल्या स्वरांचाही प्रयोग करतो किंवा चोरटय़ा आवाजात बोलताना खर्जातल्या कुजबुजत्या स्वरांचा वापर करतो.
माझ्या एका मित्राची आई स्वभावानं अतिशय प्रेमळ, ममताळू. केवळ स्वत:चे कुटुंबीयच नव्हे तर आम्हा सर्व मित्रमंडळींचं त्यांना फार कौतुक. त्यांच्या प्रेमळ, लाघवी बोलण्या-वागण्यातून ते सर्वाना सतत जाणवे. दुर्दैवानं त्यांना घशाचा कर्करोग झाला आणि त्यांचं स्वरयंत्र काढावं लागलं. त्यांना बोलता यावं म्हणून एक यंत्र बसवलं गेलं. त्याद्वारे त्या सरावानं बोलू लागल्या. फक्त त्या यंत्राच्या मदतीनं होणारं त्यांचं बोलणं हे रोबोच्या यांत्रिक एकसुरी बोलण्यासारखं होतं. त्यात आवाजाचे आणि त्यातले स्वरांचे चढउतार नव्हते. त्यामुळे भावनांचा ओलावा नव्हता. त्याची उणीव ती माऊली आपल्या मायाळू स्पर्शातून, डोळ्यातून भरून काढत होती.
सुरुवातीचे काही क्षण मला गलबलायला झालं, पण पुढे ते सहजपणे वजा होऊन आमचा संवाद पूर्वीसारखाच स्नेहपूर्ण होत राहिला, पण कधीतरी वाटून गेलं की, देवानं दिलेल्या वाचा या ज्ञानेंद्रियाचं मोल माणसाला ते असेपर्यंत जाणवत नाही. ते गमावल्यावर त्याची खरी किंमत कळते.
हे झालं रोजच्या जगण्यातल्या वाचिक व्यवहारांविषयी. कलेच्या क्षेत्रात गद्य अगर पद्य, म्हणजे गद्यसंवाद म्हणताना अगर गाणं गाताना या वैविध्यपूर्ण आवाजनामक शक्तीचा करिष्मा हा खरोखरीच अद्भुत आहे.
आमच्या मराठी रंगभूमीवर नटश्रेष्ठ गणपतराव बोडस, नानासाहेब फाटक, केशवराव दाते, मास्टर दत्ताराम यांच्यापासून ते डॉ. श्रीराम लागू, सतीश दुभाषी, नाना पाटेकपर्यंत अनेकानेक जबरदस्त अभिनेत्यांनी नाटकातली व्यक्तिरेखा साकारताना कायिक अभिनयाला आपल्या विलक्षण आवाजाच्या जोरावर प्रभावी वाचिक अभिनयाची जोड देत प्रेक्षकांना अविस्मरणीय नाटय़ानुभव दिला. हिंदी चित्रपटांमध्ये तर दिलीपकुमार, अमिताभ बच्चन, बलराज सहानी, संजीवकुमार, मोतीलाल, अमरिश पुरी, नासिरुद्दीन शाहसारख्या अभिनेत्यांनी कायिक अभिनयाला त्यांच्या आवाजाच्या वैशिष्टय़ांचा प्रभावी प्रयोग करत वाचिक अभिनयाची जोड देऊन साकारलेल्या व्यक्तिरेखा अजरामर केल्यात. अमरिश पुरी या मूळच्या रंगभूमीवरून आलेल्या अभिनेत्याच्या आवाजातला अद्भुत खर्ज किंवा अमिताभ बच्चनच्या आवाजातली जादू गेली ४०हून अधिक र्वष आपण सर्व अनुभवतोय. नव्हे त्यानं मंत्रमुग्ध झालोय.
कंठसंगीताच्या क्षेत्रात अभिजन संगीतापासून म्हणजे अभिजात शास्त्रीय संगीतापासून ते जानपद संगीतापर्यंत म्हणजे लोकसंगीतापर्यंत आवाजाच्या पोत आणि जातींबरोबरच आवाजाच्या लगावांमध्येही प्रचंड वैविध्य आढळून येतं. भारतातल्या विविध भाषावार / प्रांतवार संस्कृतीतून आलेल्या कलाकारांच्या गायनातील वेगवेगळे रंग, विविध शैली या तर मनभावन आहेतच, पण एरवी शास्त्रीय संगीतसाधकांनाही अवघड वाटणाऱ्या श्रुतीचा-त्यांच्या लोकसंगीत गायनात सहजभावानं होणारा प्रयोगही विस्मयकारक आहे.
आपल्याकडे महाराष्ट्रात शाहीर अमरशेख, पिराजीराव सरनाईक, तुकडोजी महाराज, शाहीर साबळे, शाहीर विठ्ठल उमप यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकताना याचा प्रत्यय येतो. ‘गं साजणी..’ हे पिंजरा चित्रपटातलं गाणं गाणारा वाघमारे किंवा ‘नदीच्या पल्याड.. आईचा डोंगर..’ हे जोगवा चित्रपटातलं गाणं गाणारा आजचा लोकप्रिय गायक / संगीतकार अजय यांच्या आवाजातलं इट्ट हे कुठल्याही प्रशिक्षणातून आलं नसून मराठी मातीतल्या लोकस्वराचा तो प्राणातून उमगलेला नैसर्गिक आविष्कार आहे. लावण्यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकायला गेलात तर सुलोचना चव्हाण आणि रोशन सातारकर यांच्या आवाजातलं तेच इट्ट- त्याच गावरान मराठी मातीचा सुगंध तुम्हाला भूलविल. आवाजातला खुलेपणा, नखरा, सुरेलता, उत्कट गायनातून श्रोत्यांच्या हृदयाला भिडणारा भावाविष्कार यामुळे या लोकस्वरांनी रसिकांच्या मनात आपली अशी खास जागा निर्माण केली.
अभिजात शास्त्रीय कंठसंगीतातील पतियाळा आग्रा, ग्वाल्हेर, जयपूर आणि किराणा या प्रमुख घराण्यांच्या गायन शैलीमध्ये स्वरांचा लगाव करण्याच्या आपापल्या पद्धती आहेत.
बडे गुलामअली खाँसाहेबांचा मधुर आणि पाऱ्यासारखा अर्निबधपणे फिरणारा मुलायम स्वर, अमिर खाँसाहेबांचा अद्भुत खर्जयुक्त स्वर, डी. व्ही. पलुस्करांचा गंगाजलासारखा पवित्र स्वर, पंडित भीमसेन जोशी यांचा भरदार, कसदार आणि मंत्रमुग्ध करणारा स्वर, हिराबाई बडोदेकरांचा शालीन स्वर, कुमारगंधर्वाच्या मधुर गळ्यातला काळजाचा ठाव घेणारा भाववाही स्वर, गंगूबाई हनगल यांचा बुलंद स्वर, किती किती श्रेष्ठींची नावे घ्यावी.. उल्लेख करायला सबंध लेखही पुरणार नाही.
आवाजाच्या पोतांच्या आणि जातींच्या संदर्भात मला एक प्रकर्षांनं जाणवलेली गोष्ट म्हणजे आवाजातली सानुनासिकता- ज्याला गाण्यातले जाणकार नक्की (म्हणजे नाकात गाणं) असं म्हणतात. ती आवाजाचं खास वैशिष्टय़ मानलं जातं. आपण जरा विचार केलात तर लक्षात येईल की, ही नक्की ज्या ज्या गायक / गायिकांना लाभली त्यांचं गाणं सदैव रसिकप्रिय झालं. यादीच पाहा ना- स्व. कुंदनलाल सैगल, मुकेश, हेमंतकुमार, शमशाद बेगम, नूरजहान, सुरैया, बेगम अख्तर, माणिक वर्मा, कविता कृष्णमूर्ती, पाकिस्तानी गायिका-अभिनेत्री सलमा आगा किंवा बांगलादेशी गायिका रुना लैला. त्यांच्या इतर गायन वैशिष्टय़ांबरोबर ही ‘नक्की’ त्यांच्या गायनाला चार चांद लावून गेली. जास्तीची गुणवत्ता ठरली.
शास्त्रीय संगीतात डी. व्ही. पलुस्कर, मल्लिकार्जुन मन्सूर, वसंतराव देशपांडे तर मराठी भावसंगीतात गजाननराव वाटवे, माणिक वर्मा, आर. एन. पराडकर, कुंदा बोकील एवढंच काय पण मुंबई आकाशवाणी केंद्राच्या निवेदिका करुणा देव (नीलम प्रभू), ‘बिनाका गीतमाला’चे विख्यात अमीन सयानी आणि दूरदर्शनवर गाजलेल्या तबस्सूम या गेल्या जमान्यातल्या लोकप्रिय निवेदकांसह अगदी आता कुठल्याशा रेडिओ चॅनेलची अत्यंत लोकप्रिय असलेली रेडिओ जॉकी शोनाली. या साऱ्यांच्या आवाजातली खासियत म्हणजे ‘नक्की’ या सानुनासिकतेनं आवाजाला एकप्रकारची स्निग्धता येते, ओलावा येतो आणि रसिक श्रोत्यांच्या हृदयाला तो आपला वाटतो. माझा एक मित्र गमतीनं म्हणतोच की, मुकेशजींचं गाणं सर्वाना का आवडतं तर थोडं नाकात गायलं की कुणालाही आपण हुबेहूब मुकेशजींसारखे गातोय असं वाटू लागतं आणि तो खूश होतो. अर्थात गमतीचा भाग सोडा, पण मुकेशजींच्या स्वरातलं भिजलेपण, सच्चेपण आणि सादगी हे या हृदयीचं त्या हृदयी पोहोचवणारं आहे.
भारतीय चित्रपटगीतांचा चाहता माझा एक विदेशी मित्र त्याच्या देशातील माझ्या वास्तव्यात चर्चा करताना म्हणाला, ‘‘तुम्ही भारतीय तेच तेच गायक, गायिका वर्षांनुवर्षे कसे काय ऐकू शकता? आणि त्यांचा तुम्हाला कंटाळा कसा येत नाही? आमच्याकडे फार तर चार-पाच वर्षे आम्हाला एखादा गायक, गायिका आवडू शकते. त्यानंतर आम्ही नव्याकडे वळतो.’’ त्यावर मी त्याला म्हणालो, ‘‘आम्हा भारतीयांच्या थोर भाग्याने आम्हाला कुंदनलाल सहगल, लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम, सुमन कल्याणपूर, मोहम्मद रफी, किशोरकुमार, मन्ना डे, मुकेश, तलत मेहमूद यांसारखी स्वररत्ने लाभली आणि त्यांच्या अमृतस्वरांचे नवनवे उन्मेष प्रतिभावंत संगीतकारांच्या पिढय़ांमागून पिढय़ांनी दशकामागून दशके सादर करून रसिकांच्या मनावर अनभिषिक्त राज्य केले.’’
खरोखरीच अध्र्या शतकाच्या काळात एवढय़ा प्रतिभावंत कलाकारांची मांदियाळी जमणं आणि त्यांचा उत्तुंग कलाविष्कार आपल्या सर्वाच्या वाटय़ाला येणं मला परमभाग्याची गोष्ट वाटते. खरं तर भोवतालच्या सर्वस्वी भ्रष्टतेनं, विकृतीनं, सर्व तऱ्हेच्या प्रदूषणानं, पिळवणुकीनं, महागाईनं गांजलेल्या तुम्हा-आम्हा सर्वाना जगण्याचं प्रयोजन आणि बळ देतात ते या भूगंधर्व / किन्नरींचे अमृतस्वरच. नावं पुसली जातील, चेहरे बदलतील, पण हे स्वर्गीय स्वर चिरकाल अविनाशी राहतील. येणाऱ्या रसिकांच्या पिढय़ांमागून पिढय़ांना जगण्यासाठी संजीवन देत राहतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा