अंक एक..
१९८४-८५ ला पुण्याच्या अभियान एकांकिका लेखन स्पध्रेत मी ‘युगधर्म’ नावाची एकांकिका पाठवली होती. तिला पारितोषिक देताना परीक्षक वि. भा. देशपांडे म्हणाले होते की, ‘हा मोठय़ा नाटकाचा विषय आहे.’ नंतर lok01८७ साली एनएसडीत असताना सहज म्हणून ‘युगधर्म’ चाळायचो तेव्हा ‘देहभान’चा विस्तीर्ण पट डोळ्यासमोर उभा राहायचा. खरं तर राममनोहर लोहियांच्या ‘आपल्या समाजातल्या नतिकतेची संकल्पना स्त्रीच्या एका अवयवाभोवती केंद्रित झाली आहे,’ अशा आशयाच्या कुठेतरी वाचलेल्या वाक्यात मला या विषयाचं बीज सापडलं होतं. लहानपणी अजंठा-वेरुळच्या सहलीत बघितलेली कैलास लेण्यावरची मथुनशिल्पं ही याबाबत प्रेरक ठरली होती. पण एनएसडीच्या भरगच्च वेळापत्रकात म्हणावा तसा निवांतपणा मिळत नव्हता. त्यामुळे मूळ विषयावर नीट विचार, चिंतन करून लिहिण्याऐवजी प्रसंग घडवण्यातच नाटक लिहितोय असा भ्रम निर्माण होत होता. पहिला आराखडा लिहून झालाही. पण दोन तास घटना घडताहेत, पात्रं बोलताहेत, त्या ऐकणाऱ्याला थोडं खिळवूनही ठेवताहेत, क्वचित् प्रसंगी चकितही करताहेत असं दिसत होतं. पण शेवटच्या पानानंतर हाती काहीही लागत नसल्याचंच जाणवत होतं. मग नाटक कपाटात ठेवून दिलं आणि विसरायचं ठरवून टाकलं.
एनएसडीचं शिक्षण संपवून मुंबईत आलो. ‘हसतखेळत’, ‘पाहुणा’, ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ अशी इतर नाटकं लिहिली. पण ‘देहभान’ विसरायला जमत नव्हतं.
दरम्यान, हेमंत भालेकरनं ते वाचलं. एका राज्य नाटय़स्पध्रेत ते केलंही. शशांक सावंत, शिल्पा तुळसकर यांनी त्यात समरसून भूमिका केल्या. हेमंतने अपार मेहनतीनं ते बसवलं होतं. पण मुळात संहितेतच दम नव्हता, तर त्या मेहनतीचं चीज कसं होणार? नाटक दिग्दर्शक व कलावंतांनी सुसह्य़ केलं होतं, इतकंच. तेव्हा त्याचं नाव ‘जन्म’ होतं. आणि ते एकाच काळात घडत होतं. खूप शब्दबंबाळही होतं.
अधूनमधून लिहायला बसायचो, पण मनासारखं लिखाण होत नव्हतं. महत्त्वाचा मुद्दा यायचा, की हे सगळं आपण आज का म्हणतोय? याचा रेलेव्हन्स काय? पण वसुधा मला कालची, जुनी, कालबाह्य़ वाटतच नव्हती. वाटायचं, ती आजही आहे. मग त्या वसुधाची गोष्ट आजच्या वसुधाशेजारी ठेवली तर..? असा विचार मनात यायचा. पण अजून नाटकाचा फॉर्म जन्माला आला नव्हता. त्यामुळे परत नाटक कपाटात जायचं. याचदरम्यान कोपऱ्यात गुलामासारखं बसवून ठेवण्यासाठी आणलेल्या टीव्हीनं माणसाच्या मनाचा कोपरा न् कोपरा काबीज केला आणि गोंधळच झाला. स्त्री-पुरुष संबंध हा कानात पुटपुटला जाणारा विषय दिवाणखान्यात आजी-आजोबा नातवंडांसह बघू लागले. कंडोम्स, सॅनिटरी नॅपकिन्स हे विषय सर्रास कानावर आदळू लागले. आणि त्यामुळे आता स्त्री-पुरुष संबंधांतला चोरटेपणा संपून जाणार, र. धों. कव्र्याच्या मनातलं स्वप्न पूर्ण होणार, आणि हा विषय पूर्णपणे कालबाह्य़ होणार असं वाटू लागलं.
दुर्दैवानं तसं झालं नाही. कारण मुळात सेक्स हा विषय चघळला जाणं वेगळं आणि त्यावर बोलणं, संवाद होणं वेगळं. टीव्हीवर स्त्री-पुरुष संबंधांचा भडिमार सुरू असला तरी त्यात ढोबळपणा आणि उथळ सवंगताच अधिक होती. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे वसुधा ज्या शरीरसंबंधांबद्दल बोलतेय ते फक्त शरीराशीच निगडित आहेत का, हा प्रश्न भेडसावायचाच. एकूण नाटक त्रास देत होतं आणि हे कोडं सुटतही नव्हतं. पण ते सोडून देऊन बाजूला होणंही जमत नव्हतं.
एक मात्र जाणवत होतं, की आज हा विषय अधिकाधिक रेलेव्हंट होत चाललाय. सगळं हाताबाहेर जाण्याआधीच बोलणं महत्त्वाचं होतं. वसुधा, मास्तर आणि साधना (हो. दरम्यान नाटकात साधनाही अलगद येऊन मिसळली होती.) यांचा आवाज या गदारोळात ऐकू गेला पाहिजे. मग सरळ ठरवलं- वसुधा, मावशी, दादासाहेब या एकाच कालखंडातल्या तिघांशी आजच्या काळातल्या संवेदना व संभ्रम घेऊन तुलनात्मक होत भिडायचं. त्यातून ‘नाटकातलं नाटक’ हा फॉर्म सुचला.
अर्थात ‘नाटकातलं नाटक’ हा काही नवा शोध नाही. शेक्सपीअरसकट सगळ्यांनी तो हाताळलाय. पण साधनाच्या मार्फत नाटकातलं नाटक घडवताना वसुधा, मावशी, दादासाहेब आणि त्यावर सूत्रधार पद्धतीचं भाष्य असा काहीतरी फॉर्म तयार होऊ लागला. मग स्वत:सकट आजूबाजूच्या समाजातलं शरीरसंबंधांकडे बघणं अधिक डोळस होऊ लागलं. त्यातूनच पद्मनाभ, दमयंती आले. दमयंतीची बिचारीची गोची ठळक झाली. मनिष, शिल्पा, किरण वेगवेगळ्या संभ्रमांचा आणि गोचीचा पट घेऊन आले. आता काहीतरी हाती लागायची एक मोठी शक्यता दिसू लागली आणि नाटक शरीरसंबंधांबद्दल थेटपणे बोलणार आणि तिथेच न थांबता त्याहीपुढे जाणार, हे निश्चित होऊ लागलं. एक ओघ आला.
तरीही नवीन आराखडा वाचताना साधना व वसुधा, मावशी आणि दमयंती यांचा परस्परांशी संबंध न वाटता ते एकाच रंगावकाशातले तुकडे आहेत असं वाटत होतं. अजूनही नेमका फोकस सापडत नव्हता.
दरम्यान, मी अ‍ॅथॉल फ्यूगार्डच्या ‘आयलँड’ नामक दीर्घाकात अभिनय करत होतो. मराठी अनुवादही मीच केला होता. त्यात दोन कैदी ‘अँटिगनी’ करताहेत आणि नाटकातली अँटिगनी त्यांना सजग करतेय असा फॉर्म होता. ‘देहभान’वर त्याचा परिणाम होऊ लागला. म्हणजे अँटिगनीची धिटाई मला याच काळातली वाटू लागली होती. मग वाटू लागलं, वर्तमान-भूत-भविष्य असे आपण काळांचे तुकडे करतो; पण याच काळांची सरमिसळ केली तर..? मग नाटकातलं नाटक हा फॉर्म व्यापक होत गेला आणि नाटक एकाच वेळी दोन नव्हे, तीन काळांत घडू लागलं. काळांची ही सरमिसळ केवळ एक क्लृप्ती न राहता ती नाटकाला एक वेगळाच अर्थ देऊ लागली. आता दमयंतीच्या आरशात मावशी आणि साधनेच्या आरशात वसुधा दिसू लागली.
शरीरसंबंध या एका मुद्दय़ावर सुरू झालेलं नाटक आता केवळ तिथेच न थांबता नतिकता आणि नीती-अनीतीच्या संकल्पनांनाच धारेवर धरू लागलं. आपण पुढे गेलो आहोत की मागे जात आहोत, हा प्रश्न विचारू लागलं. मग नाटक फक्त एकोणीसशे पन्नासच्या वसुधेचंच न राहता तिच्याइतकंच आजच्या दमयंतीचंही होऊन बसलं. मग गेल्या काही दशकांतल्या घडामोडींमुळे बदलाचा महापूर आला तरी मानसिकता अधिकाधिक जडत्वाकडेच झुकत राहिलीये, ही शिल्पाची गोची स्पष्ट होत गेली. वसुधानं काढलेलं उत्तर, पत्करलेला मार्ग हे अंतिम आदर्श उत्तर नसेल; पण तिच्यापुरता का असेना, एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
या सगळ्या संभ्रमाची तात्कालिक समाधान देणारी दिशा शोधता शोधता किरण आणि शिल्पा माणूसपण शोधू लागतात. आणि तिथेच मास्तरचं कार्य झिरपत झिरपत आजच्या काळाला येऊन पोहोचतं. आणि आशयाच्या पातळीवर काळाचं द्वैत नष्ट होतं. मग ‘देहभान’मधली काळांची सरमिसळ केवळ क्लृप्ती न उरता आशयाच्या मांडणीचा घाट बनून जातेय असं मला दिसू लागलं आणि हुरूप आला. समाजाच्या पृष्ठस्तरावर अथवा अंत:स्तरावर चíचल्या जाणाऱ्या एखाद्या (या अशा प्रकारच्या)  सामाजिक समस्येला आणि त्याच्याशी निगडित विविध उपप्रश्नांना नाटय़वस्तूत उपस्थित करताना ते नाटक आहे, त्या विषयावरचा प्रबंध नाही, लेख नाही याचं भान सुटू न देणं महत्त्वाचं होतं. म्हणूनच समाजातील प्रातिनिधिक प्रश्न म्हणून ते महत्त्वाचे असतानाच ते नाटय़ांतर्गत व्यक्तिरेखेचेही आहेत, याचा विसर पडू न देणं मला गरजेचं वाटत होतं. त्यासाठी त्या व्यक्तिरेखा अधिक वास्तव, मानवी वाटाव्यात व जीवनानुभवाचे संदर्भ घेऊनच उभ्या राहाव्यात असा प्रयत्न अधिक होता. आता नाटक मनासारखा आकार घेत पूर्ण झालं.
त्यातच कोल्हापूरला ‘प्रत्यय’ संस्थेत नाटकाचं वाचन झालं आणि त्यांनी नाटक करायची इच्छा दर्शवली. माझा उत्साह वाढलाच. पण दोनएक वषर्ं संस्थेच्या काही अडचणींमुळं नाटक होऊ शकलं नाही. डॉ. भूताडियांनी ते ‘दुसरं कुणी करत असेल तर दे,’ अशी अनुमती दिली. (आपल्याकडे नाटक प्रायोगिक आहे की नाही, हे त्यातल्या आशय किंवा फॉर्मवर नव्हे, तर ते कुठे सादर होतं, यावर ठरतं! त्यामुळे या नाटकावर ‘प्रायोगिक नाटक’ असा शिक्का बसता बसता हुकला! असो!)
पण मुंबईत कुणीच नाटक स्वीकारेना. अनेक वाचनं झाली. अनेक निर्माते-दिग्दर्शकांनी नाटक नाकारलं. ‘हे नाटक फारच प्रायोगिक आहे बाई!’ असं म्हणत एका अभिनेत्रीने ‘हे करूच नकोस’ असा सल्ला दिला. मीही ‘देहभान’ विसरून जायचं ठरवलं. म्हटलं, मनाच्या रंगभूमीवर नाटककार नाटक पाहत राहतोच. आपण तसं ते मनातल्या मनात पाहिलंय, आनंद घेतलाय. मग न का पाहिना हे नाटक रंगमंच! आपल्याला लिहायचा आनंद तर मिळालाय ना? खूप झालं! नाटक परत कपाटात जाऊन पडलं.
मग वर्षभरानं अचानक कुसोंनी म्हणजे कुमार सोहोनींनी नाटक वाचायचं आमंत्रण दिलं. त्यांना ते आवडलं. ‘प्रेमात पडलो’ वगरेही म्हणाले. ‘मी करतो’ अशी गर्जनाही केली. दरम्यान, मी खूप नकार पचवल्यामुळे मनातल्या मनात म्हटलं की, ‘घ्या एक नवी चप्पल आणि ती फाटेपर्यंत फिरा नाटक घेऊन नाटय़संस्थांकडे.’ कुसो फिरू लागले. अनेकांनी तोंडभरून कौतुक करून नकार दिले. कुसो मात्र ‘विक्रमादित्याने हट्ट सोडला नाही’च्या चालीवर ‘देहभान’ खांद्यावर टाकून फिरतच राहिले. मग एक दिवस दत्ता घोसाळकरने वाचन ठेवलं. दत्ताचं आधीचं ‘यदा कदाचित’ नामक भन्नाट नाटक धो-धो चाललं होतं. हा गंभीर नाटक करेल का, असे वाटले आणि मी ‘नकार एक्स्पर्ट’ मुलीच्या अलिप्ततेनं वाचनाला गेलो. पण नाटक ऐकून दत्तानं ताबडतोब करणार, असं जाहीर केलं. मी दचकलोच. मग कुसोंनी कास्ट ठरवली. नीना कुळकर्णीला वाचूून दाखवायचं मुक्रर केलं. नीनाला आवडलं. मग गिरीश ओकला कुसोंनी गाठलं. त्यानंही तुलनेने भूमिका कमी असतानाही विषयाचं महत्त्व म्हणून नाटक घेतलं. मग शशांक सावंत, ययाति राजवाडे, मुक्ता बर्वे, श्याम तेंडोलकर अशी फौज गोळा झाली. सुनील देवळेकरनं नेपथ्याचं आव्हान घेतलं. संगीत विवेक मेस्त्रीनं दिलं. वसुधा, साधना या भूमिकांसाठी स्मिता सरवदेसारखी प्रचंड क्षमतेची अभिनेत्री मिळाली.. आणि नाटक उभं राहिलं. रंगीत तालमीच्या वेळी स्वत: दिलीप कुळकर्णी हजर होते. ते प्रचंड तणावाखाली असलेल्या टीमला एनर्जी देत होते.
नाटक तीन काळांत घडतं. त्यामुळे तीन सेट्स, तीन प्रकारचे कॉश्च्युम्स. आणि सेट व कपडे बदलायला अवघं दीड मिनिट. बरं, २००५ चा सीन बदलून १९५० चा येणार. केशभूषेपासून सगळं बदलायचं म्हणजे किती धावपळ होत असेल! आम्ही विनोदाने म्हणायचो, ‘बाहेरून बघताना विनोदी आहे आणि पडद्यामागे जी धावपळ चालते ती पाहून हसू येतं.’ पण बॅकस्टेजच्या कलावंतांना मी सलामच केला. कारण ही सगळी धावपळ, हा पसारा एकही चूक न करता ते सांभाळत होते. मराठी रंगभूमीचं हे एक वैशिष्टय़ आहे. गावोगावी नाटकाचे प्रयोग होत असल्याने कलादिग्दर्शकावर मर्यादा येतात. आपलं नाटक ‘बशीतलं नाटक’ असतं. म्हणजे बसमधून प्रवास करता यावा असं. त्यामुळे कलादिग्दर्शकाला खूप मर्यादेत काम करावं लागतं. पण बॅकस्टेजवाली मंडळी अक्षरश: काही सेकंदांत सेट बदलतात. एका ब्लॅकआऊटमध्ये १९५० चं २००५ करतात. आणि हे पाहून प्रेक्षकांना कमाल वाटते. ‘देहभान’ला मिळणाऱ्या टाळ्या या सेट आणि बॅकस्टेजवाल्यांनाही असतात.
नाटकाचा पहिला प्रयोग दणक्यात झाला. दणक्यात अशासाठी, की तिकीट बारीवरसुद्धा पहिल्याच शोला हाऊसफुलचा बोर्ड लागला. यात नीना-गिरीशच्या नावाचा वाटा होताच. त्या दोघांनी भूमिकाही विलक्षण ताकदीनं केल्या. लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. नाटकाला पुरस्कारही खूप मिळाले. दिल्लीच्या ‘भारंगम’मध्येही ते सादर झालं. नाटकाचा फॉर्म सोपा नव्हता. दिग्दर्शकाचं कसब पणाला लागलं होतं. हे नाटक केवळ लेखकाचं असूच शकत नव्हतं. तीन काळांची सरमिसळ करण्याची कसरत, त्यातून आशयाचं प्रकटीकरण, रंगभूषेचा, सेट्सचा, वेशभूषेचा पसारा सांभाळणं आणि कलावंतांकडून तिन्ही काळातल्या व्यक्तिरेखा अभिनित करून घेणं, ही सगळी कलात्मक आव्हानं कुसोंनी लीलया पेलली. संहितेचं कौतुक झालं, मात्र, कुसो उपेक्षित राहिले. व्यावसायिक नाटय़स्पर्धा वगळता इतकं वेगळं नाटक करणाऱ्या कुमार सोहोनींना आजवर या नाटकासाठी दिग्दर्शनाचा एकही पुरस्कार मिळालेला नाही!!!!!!!!!!
पण एकही रिप्लेसमेंट न होता नाटकाचे भरपूर प्रयोग झाले. नाटकावर परिसंवादही झाले. ‘देहाबरोबरच नात्याचं भान देणारं नाटक’ असं नाटकाचं वर्णन सुरू झालं.
मग कर्नाटकातले ज्येष्ठ समीक्षक व लेखक सरजू काटकर यांनी ते कन्नडमध्ये भाषांतरित करून प्रसिद्ध केलं. कपाटातलं नाटक सोळा वर्षांच्या झगडय़ानंतर अशा छान वळणावर येऊन ठेपलं होतं!     
अंक दोन..
‘‘मला ‘देहभान’ करायचंय! परत!’’ बारा वर्षांनी २०१४ ला ‘परत ‘‘देहभान’ करू या,’’ असा प्रस्ताव ‘आरवि थिएटर्स’च्या विजय मनोहर यांच्याकडून आला. मी म्हटलं, ‘‘आज हे नाटक जुनं नाही वाटणार?’’ कुसो सरसावले- ‘‘नाही वाटणार. मी संहितेतला एकही शब्द न बदलता हे नाटक करून दाखवतो.’’ आणि इला भाटेंना कुसोंनी विचारलं. त्यांच्यासारख्या विलक्षण इन्टेंसिटी असलेल्या अभिनेत्रीकडून होकार आला आणि ‘देहभान’ परत उभं राहू लागलं. राजन भिसेसारखा विचारी अभिनेताही सामील झाला. मग रेश्मा रामचंद्र, अतुल आगलावे, दीपक कदम असे नवे शिलेदार आणि प्रदीप पटवर्धनांसारखे अनुभवी अशी टीम गोळा झाली. संगीत अशोक पत्कींनी दिलं.
हे सगळं होतं छान; पण मला आज ते रेलेव्हंट वाटेल का, ही बाब छळत होती आणि पहिल्या प्रयोगाची उत्सुकता लागली होती. प्रयोग झाला. कलाकारांनी तिन्ही काळांतल्या भूमिकांचे सूर अचूक पकडले होते. नाटक संपल्यावर आणि नाटक सुरू असतानाही टाळ्या येणं नित्याचंच झालं. नाटक परत धावू लागलं. आज पन्नासाव्या प्रयोगाकडे त्याची वाटचाल सुरू आहे. कुसो परत एकदा जिंकले. परत एकदा नाटकातून बाहेर येत मी त्याच्या रेलेव्हन्सचा विचार करू लागलोय.  नाटक सेक्स एज्युकेशनचं नाही, केवळ स्त्री-पुरुष संबंधांवरचंही नाही; तर ‘देहाबरोबरच नात्याचं भान देणारं’ आहे असं नाटकाबाबतचं मत पुण्यातल्या २००३ साली झालेल्या परिसंवादात व्यक्त झालं होतं तिकडे मी येतो. देहासोबतच त्यात वसलेल्या मनाचा आदर महत्त्वाचा मानणारं हे नाटक आजही ऐरणीवर आलेल्या प्रश्नांवरच बोलतंय की! मग ‘पतीकडून जबरदस्ती केली गेली तर तो बलात्कार मानायचा का?’ या सध्या चच्रेत आलेल्या प्रश्नाला ‘देहभान’ हेच उत्तर आहे. बिघडत चाललेल्या नातेसंबंधांपासून आयुष्यातल्या लैंगिक गरजांचा अवकाश किती असतो, यावर ‘देहभान’ बोलतंच की! लैंगिकता, त्यासंबंधातले प्रश्न या सगळ्यामागच्या उत्तरांत माणूसपण महत्त्वाचं आहे. नाटकातले मास्तर ज्या माणूसपणाबद्दल बोलतात, ते महत्त्वाचं होत चाललंय. आजही एकाही वाक्याचा बदल न करता नाटक सादर होतं आणि तरुण मुलंमुली ते पाहतात, रिअ‍ॅक्ट होतात. मला वाटतं, ‘रेलेव्हन्स’ तो हाच!
बेळगावच्या संध्या देशपांडे या दिग्दर्शिकेनं ‘देहभान’ वेगळ्याच पद्धतीनं सादर केलं. शारदोत्सव महिला सोसायटी या संस्थेतर्फे फक्त स्त्रियांनीच हे नाटक सादर केलं. पुरुषांच्याही भूमिका स्त्रियांनीच केल्या. तिथल्या सर्व वर्तमानपत्रांतून या प्रयोगावर भरभरून लिहून आलं. आता त्या हे नाटक कन्नड भाषेत करायच्या तयारीत आहेत. हे नाटक वेगवेगळ्या गावांमधल्या स्पर्धात वेगवेगळ्या संस्था सादर करत असतात. त्यावर अनेक प्रतिक्रियाही येत राहतात. या सगळ्याचा- कुठल्याही नाटकानं माणसाला प्रतिक्रिया द्यायला भाग पाडावं आणि स्वत:कडे पाहायला मजबूर करावं, इतकाच साधा-सोपा अर्थ मी लावतो. नाटक लिहिताना इतकं जरी झालं, तरी मी ते नाटक यशस्वी झाल्याचं मानतो. इतक्या मर्यादित अर्थाने का होईना, मी ‘देहभान’ला यशस्वी नाटक समजतो.
हा फॉर्म मला सापडला याचं मला नाटककार म्हणून बरं वाटतं. कारण नाटकातलं नाटक यापलीकडे काळाची सरमिसळ करण्याचा विचार मनात आला, तिथेच नाटक उभं राहिलं असं मी मानतो. आज सगळीकडेच काळांची सरमिसळ झालीये. एकाच वेळी समाजात प्रगत, विचारी माणसं दिसतात आणि त्याचवेळी बारा-चौदाव्या शतकातली मानसिकता अभिमानानं बाळगून जगणारेही आढळतात. मावशीही दिसतात, दमयंतीही दिसते. म्हणूनच देहाचा आणि त्यात वसणाऱ्या मनाचा आदर करा, असं सांगणारे मास्तर खूप आवश्यक झालेत.. कधी नव्हे इतके ते आज गरजेचे झालेत.
मग आज तटस्थपणे पाहताना वाटतं, हे नाटक देहाचं आहेच, मनाचंसुद्धा आहे. तसंच माणूसपणाचं भान देणारंसुद्धा आहे. एकूणच या नाटकाच्या सगळ्या प्रक्रियेनं मला बेभान केलं, हे निश्चित. सृजनाची ही िझगच काय ती खरी.. बाकी सगळं इरीलेव्हंटच नाही का?
अभिराम भडकमकर – abhiram.db@gmail.com

People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Story img Loader