सुजाता राणे
‘द झिरो कॉस्ट मिशन आणि एक स्पाय स्टोरी’, ‘मिशन नेपाळ आणि द वॉक इन’ व ‘टेरर इन इस्लामाबाद’ अशा तीन पुस्तकांचा संच रोहन प्रकाशनाने मूळ इंग्रजीतून मराठीत आणला आहे. यात अमर भूषण लिखित गुप्तहेर कथांचा मराठीतील अनुवाद प्रणव सखदेव यांनी केला आहे. तीन पुस्तकांत पाच सत्य घटनांवर आधारित हेरकथा आहेत. अमर भूषण भारताच्या ‘रॉ’मधून २००५ साली निवृत्त झाले. सुरक्षेच्या दृष्टीने, प्रत्यक्षातील सोर्सेस उघड होणार नाही, त्यांचा विश्वासघात केला जाणार नाही या हेतूने या प्रत्येक ऑपरेशनचे कथानक तथ्यांच्या खूपच जवळ जाणारे आहे असे लेखकाने मनोगतातच नमूद केले आहे.
हेरगिरीच्या क्षेत्रात ज्या देशात आपल्याला काम करायचं आहे तिथल्या राजकीय, सामाजिक वातावरणाची उत्तम जाण असणे आवश्यक आहे. परराष्ट्रांत घडणाऱ्या घडामोडींचे भान, शेजारी देश- तिथल्या राजकीय- सामाजिक घटना, त्यांचे आंतरराष्ट्रीय राजकारणावर उमटणारे पडसाद या पार्श्वभूमीवर शत्रूच्या गोटातून माहिती मिळवण्यासाठी माणसांची निवड करणे, त्यांना भेटणे, त्यांना मोबदला म्हणून दिल्या जाणाऱ्या रकमेची व्यवस्था करणे, विशिष्ट प्रसंगी आपल्या वरिष्ठांकडून असहकार असल्यास त्या कोंडीलाही हाताळणे ही विशेष कौशल्ये आवश्यक आहेत.
या मोहिमा यशस्वीपणे पार पाडण्याकरता आपल्या प्लॅनची गुप्तता पाळण्यासाठी सर्वतोपरी काळजी घ्यावी लागते. स्थानिक पोलीस वॉचर्स किंवा इंटेलिजन्स ब्युरोच्या नजरेत कोणी यायला नको, मिशनची व्याप्ती तिच्या उद्दिष्टांपुरतीच मर्यादित ठेवणे अनेकदा गरजेचे ठरते. अचानक काही अडचणी आल्या तरी कमीत कमी वेळात त्या कोणी आणि कशा सोडवायच्या याचेही पूर्वनियोजन करावे लागते. एखाद्या अॅसेटला अधिक कुतूहल वाटले तरी फार प्रश्न न विचारता मिळणाऱ्या मोबदल्यावरच त्यांनी लक्ष केंद्रित करावे ही समजही योग्य रीतीने देणे कधी कधी आवश्यक ठरते. आपल्या सोबत असणाऱ्यांपैकी कोणाला धमकी देऊन ऑपरेशनपासून तोडण्याचा प्रयत्न शत्रू करतोय का याचा अंदाज घेणे, वेगाने माणसांना भेटणे, ब्रीफ करून आपापली कामे सोर्सेसना सुपूर्त करणे. तपशीलवार व नेमकेपणाने माहितीचे संकलन करून अतिशय तत्परतेने या माहितीचा खुबीने वापर करणे. प्रत्यक्षात काय घडत आहे, त्यातले किती व काय दाखवायचे, काय दडवून ठेवायचे याचे सतत तारतम्य बाळगत राहावे लागते, इ. या पाचही हेरकथांमध्ये जाणवणारी आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुप्तहेरांच्या कार्यपद्धतीची काही वैशिष्टय़े म्हणता येतील.
१९९२-९३च्या सुमारास बांगलादेशातील मुस्लीम स्थलांतरित आसाम निवडणुकीचा निकाल बदलण्यात कळीची भूमिका बजावत होते. भारतात अतिरेकी पाठवायला बांगलादेशातील मदरशांचा वापर केला जात होता. पाकिस्तानातील आयएसआय भारत विरोधी ऑपरेशन्स बांगलादेशमार्गे राबवण्यासाठी धडपडत होते. सीमा प्रांतातील मिशनमध्ये वेगवेगळय़ा राजकीय आणि धार्मिक गटांचे संघर्ष दडलेले असल्याने सीमेजवळील हिंदू लोकांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता लक्षात घेऊन ऑपरेशन्स आखणे आवश्यक होते. या काळात सुजयसारखा अशक्य साध्य करण्याचे जणू वेडच असणारा, बिनधास्त, धाडसी अधिकारी करोडोंच्या संख्येने निधी उभा करणे अशक्य असतानाही कशाप्रकारे ते ऑपरेशन यशस्वी करतो हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘द झिरो कॉस्ट मिशन’या शीर्षकाची समर्पकता ही कथा वाचून पूर्ण झाल्यावर लक्षात येते. सरकारी यंत्रणेतील माणसं ही प्रत्यक्षात परस्परांशी हेवेदावे, सूड, संभवनीय संघर्ष या सगळय़ा आव्हानांतून कधी परस्परांना सहकार्य करत तर कधी एकमेकांच्या मर्यादा समजून घेत वा ओलांडून व्यक्तीपेक्षा देश महत्त्वाचा या न्यायाने ही मिशन्स कशी यशस्वी करतात ते लक्षणीय ठरते. सरकारी अधिकाऱ्यांमधील वरिष्ठ – कनिष्ठ श्रेणी त्यांच्यातील मानवी नातेसंबंधातील गुंतागुंत, लेखक अमर भूषण यांनी सूचक शब्दांमधून जिवंत केली आहे. ‘द झिरो कॉस्ट मिशन’ मधील सुजय, जीवनाथन, शरीफुल, क्रिसेंट इत्यादी पात्रे कधी तृतीय पुरुषी निवेदनातून, कधी कथेतील एका पात्राच्या संवादातून दुसऱ्या पत्राबद्दल माहिती देणे यांसारख्या पद्धतींतून साकारली आहेत.
जीवनाथनसारखे पात्र इतरही कथांमध्ये येत राहते, त्यामुळे या पाचही कथांना एकसूत्रताही लाभते. ‘द वाईली एजंट’ कथेचे ‘द वॉक इन’ कथेशी असणारे अंतर्गत संबंध इतके बेमालूमपणे गुंफले आहेत की या दोन्ही कथा आपण स्वतंत्रपणे वाचल्यास जसा हेरकथा वाचनाचा परिपूर्ण अनुभव देतात, तसाच सलग तीन पुस्तकांच्या संचात त्या वाचल्या तरी त्यांच्यातील अंतर्गत संबंध वाचकांना उलगडता आल्यामुळे वाचनानंद द्विगुणीत करतात.
‘द वायली एजंट’मध्ये सोर्स प्रत्यक्षात कशाप्रकारे परराष्ट्रमंत्र्यांच्या ऑफिसातून मिळालेली महत्त्वाची माहिती ड्रॉप बॉक्सेसमधून पोहोचवतात, अतिगोपनीय पत्रव्यवहार, संबंधित देशांच्या वकिलातीच्या प्रमुखांची चर्चा इत्यादी माहितीची देवाण-घेवाण कशी खुबीने केली जाते ते अनुभवता येते.
कल्पित कथेत जशी धक्का देणारे प्रसंग, घटना यांची मालिका असते तशी घटना- प्रसंगांची रेलचेल या कथांमध्ये आहे. अगदी एखाद्या चित्तथरारक, मनोरंजक चित्रपटात शोभावे तसे प्रसंगी अंतर्मनाच्या आवाजाला ऐकून केलेल्या कृतींमुळे संभाव्य संकटांपासून बचावलेले नायक या कथांमध्ये आहेत.
‘मिशन नेपाळ’ ही १९८९-९० मध्ये भारतासोबत ट्रेड अँड ट्रान्झिट ट्रीटीचे नूतनीकरण करण्याला आणि चीनकडून शस्त्रास्त्र खरेदी थांबवण्यास नेपाळच्या राजाने नकार दिल्याच्या पार्श्वभूमीवरील कथा आहे. यात पूर्व सीमा भागातील बंद पडणारा ब्युरो, जीवनाथन पुनरुज्जीवित करू शकतात का? हे मुळातून वाचण्यासारखे आहे. देशाच्या रक्षणासाठी प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून कधी अट्टल स्मगलरला, कधी कट्टर मार्क्सवादी नेत्याला सीमा पार करून भेटण्यामागे जीवनाथन यांची अत्यंत डिप्लोमॅटिक आणि तितकीच या मिशनबद्दलची पॅशनेट गुंतवणूक दिसून येते. ‘द वॉक इन’ कथा उत्कंठा वाढवत शेवटी धक्कातंत्र वापरून वाचकांना हेरगिरी करणाऱ्या या कथानायकांची मानवी बाजू हळुवारपणे उलगडून दाखवते.
‘टेरर इन इस्लामाबाद’मध्ये भारतीय दूतावासात सांस्कृतिक अधिकारी म्हणून अंडर कव्हर एजंट वीर सिंग याची पाकिस्तानमधील कारकीर्द संपत आली असतानाच झालेल्या अपहरणाचे नाटय़ रंगवण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. अपहरणाची संपूर्ण रात्र वेळ आणि स्थळाचे संदर्भ क्रमाने बदलून आयएसआयच्या चौकशी केंद्रावर अमानुषपणे केला जाणारा त्याचा शारीरिक, मानसिक छळ आणि पाकिस्तानातील भारतीय राजदूत सुरी यांचे त्याच्या सुटकेसाठीचे प्रयत्न अशी प्राधान्याने कथानकाची रचना आहे. खिळवून टाकणाऱ्या घटना- प्रसंगांनी भरलेली एखादी वेब सीरिज पाहत आहोत असा अनुभव ही हेरकथा वाचताना येतो. जुलै १९९४च्या सुमारास पाकिस्तानातील राजकीय आणि न्यायालयीन संस्था पूर्णत: मोडकळीला आली होती आणि आयएसआय व लष्कर त्यांच्यावर आपला अधिकार गाजवत असतानाच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिवाची बाजी लावणाऱ्या आपल्या इंटेलिजन्स एजन्सीच्या अधिकाऱ्याचे क्रूर छळापुढेही न झुकता आपली गुपितं उघड होऊ न देण्याचे प्रयत्न वाचकांना थक्क करतात!
गुप्तहेर संस्थेत काम करणारे हे अधिकारी, ऑपरेटर्स, सोर्स या सगळय़ांचे कौटुंबिक जीवनही सर्व कथांमध्ये डोकावते. उदाहरणार्थ, जीवनाथन आणि त्यांची पत्नी मानिनी यांचे संदर्भ, अमितचे त्याची पत्नी भामाबरोबरचे फोनवरील संवाद, ‘द वाईल एजंट’मधील सोर्स असणाऱ्या रेहमान ऊर्फ शिराजचे त्याची पत्नी रुबियाबरोबर असणारे संबंध. एजंट-अधिकाऱ्यांची मुलं, त्यांचं शिक्षण, आई वडिलांची जबाबदारी या सर्वसामान्य माणसांप्रमाणे असणाऱ्या कौटुंबिक बांधिलकीचे धागेही कथानकात गुंफले आहेत. असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील या नायकांना म्हणावी तेवढी प्रतिष्ठा आणि प्रकाशझोत देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वा सरकारी गलथानपणामुळे लाभला नाही. लेखक अमर भूषण यांनी या गुप्तचर कथांच्या माध्यमातून कष्टदायी ऑपरेशन पार पाडणाऱ्या या नायकांचा परिचय वाचकांना करून दिला आहे.
प्रत्येक कथेच्या शेवटी अगदी थोडक्यात ‘नंतरचे पडसाद..’ या भागात ही ऑपरेशन्स यशस्वी करणाऱ्या नायकांना सरकारी यंत्रणेकडून आलेल्या कडवट अनुभवांचे, प्रसंगी जीवनाथन, सुरी यांसारख्या गुणग्राही अधिकाऱ्यांनी या नायकांच्या पाठीशी उभे राहण्याचे किस्से येतात. मिशन संपल्यानंतरही ऑपरेशनशी संबंधित काही व्यक्तींचे पुढे काय झाले, याचे थोडक्यात तपशील दिले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील हेरकथांचा परिपूर्ण अनुभव वाचकांना घेता येतो.
प्रणव सखदेव यांनी मराठीत भाषांतर करताना कॉन्टॅक्ट, सोर्स, ऑपरेशन्स, एजंट, सब्जेक्ट, हॅण्डलर, ड्रॉप बॉक्स यांसारखे गुप्तहेर कथानकांशी संबंधित पारिभाषिक शब्द मूळ इंग्रजीतीलच ठेवल्यामुळे या ‘स्पाय स्टोरीज्’च्या अनुभवविश्वात प्रवेश करणे वाचकाला अधिक सोपे जाते. खोडा घालणे, खलबतं करणे, तावातावाने बोलणे यांसारख्या अस्सल मराठी वाक्प्रचारांचा समर्पक वापर ओघवत्या अनुवादाची ग्वाही देतात.
तिन्ही पुस्तकांच्या मुखपृष्ठावर आणि मलपृष्ठावर मानवी चेहऱ्याचा आकार विशिष्ट कोनातून रेखाटून योग्य रंगसंगती द्वारे बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तान या राष्ट्रांतील गुप्तचर मोहिमांचे सूचन प्रभावीपणे केले आहे.
‘द झिरो कॉस्ट मिशन आणि एक स्पाय स्टोरी’, ‘मिशन नेपाळ आणि एक स्पाय स्टोरी’, ‘टेरर इन इस्लामाबाद’,
मूळ लेखक- अमर भूषण, अनुवाद- प्रणव सखदेव, रोहन प्रकाशन, पाने- अनुक्रमे १६७, १५९, १३५, किंमत- अनुक्रमे २५० रुपये, २५० रुपये, २०० रुपये.
sujatarane31may@gmail.com