पंकज भोसले

pankaj.bhosale@expressindian.com

pune traffic jam issue
वाहतुकीचे तीनतेरा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…
chaturang article
स्थलांतरातून बहरलेली खाद्यसंस्कृती
pune municipal corporation will take action against banners
पिंपरी : फलकांद्वारे शहर विद्रूप केल्यास आता दंडात्मक कारवाई, महापालिका आयुक्तांचा आदेश; प्रभागनिहाय नागरिकांची समिती
cotton price farmers are still facing problems
कापूस उत्‍पादकांची परवड ‘सीसीआय’नेही घटवले दर…
MIDC plot for old age home for artists thane news
‘एमआयडीसी’चा भूखंड कलावंतांच्या वृद्धाश्रमासाठी;उद्याोगमंत्र्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Loksatta kutuhal Historic buildings Hard to find without stones
कुतूहल: पाषाणांशी जडले नाते…

आपल्या देशी कथासाहित्याच्या प्रांगणात गावाकडच्या गोष्टींची समृद्ध परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर या दोन्ही काळात बहुसंख्य समाज खेडय़ात एकवटलेला असल्याने साहित्यातून ग्रामजीवनाचे मुबलक दर्शन होत राहिले. बंगालमध्ये उपेन्द्रकिशोर रॉयचौधरी, वाराणशीत प्रेमचंद आणि मद्रासमध्ये आर. के. नारायण यांनी घालून दिलेल्या बैठकीनुरूप साठोत्तरी-सत्तरोत्तरी आणि नव्वदोत्तरीतील देशी ग्रामकथासाहित्याचा वटवृक्ष बहरला. त्याला प्रादेशिक वैशिष्टय़तेच्या आणि जाती-धर्माच्या फांद्याही बहरल्या. आत्मकथा आणि अनात्मकथांमधून ग्रामीण जीवनाच्या विविध कंगोऱ्यांचा धांडोळा मराठी ग्रामीण साहित्यातून या काळात घेतला गेला. माडगुळकरांची माणदेशी माणसे, मिरासदारांची भोकरवाडीतील चावडी, खानोलकरांचा तळकोकणातला समुद्र आणि दीड-दोन डझनांहून अधिक नावे घेता येतील इतक्या ताकदीच्या लेखकांनी आपला ग्रामभवताल साहित्यातून अलगद दूरवर पोहोचवला.

उदारीकरणाच्या दशकानंतर ग्रामजगण्यात शिरलेल्या शहरी घटकांच्या, वस्तू-साधनांच्या माऱ्यातून जी सरमिसळ संस्कृती विकसित होत आहे, त्याचे प्रतिबिंब समकालीन ग्रामीण कथेत प्रकर्षांने येऊ लागले आहे. आसाराम लोमटे, किरण गुरव, कृष्णात खोत, राजन गवस, रमेश इंगळे उत्रादकर, प्रवीण दशरथ बांदेकर, बालाजी सुतार यांच्या कथा-कादंबऱ्यांना किंवा शहरगावांतून लिहीत असलेल्या ताज्या दमाच्या लेखकांच्या साहित्याला तसेही आता ग्रामीण साहित्याच्या चौकटीत बसविणे चुकीचे आहे.

गावांची शहरगावे झाल्यानंतर तिथल्या जगण्यात जी काही घुसळण झाली आहे, त्यासंबंधी शहरी कुतूहलाचे शमन सध्या वायुवेगाने छोटय़ा पडद्यावरच्या ढीगभर मालिका आणि मोठय़ा पडद्यावरचे विनोदी चित्रपट करीत आहेत. अन् या परिस्थितीत सुरू असलेल्या गावआकलनाच्या प्रस्थापित साहित्यिकांच्या पंगतीत एक आशादायी तरुण लेखक फलटण आणि परिसराला कथांमधून गोंदवत दाखल झाला आहे. वसीमबर्ाी मणेर या तरुण लेखकाचा ‘झुम्कुळा’ हा कथासंग्रह समकालीन ग्रामगोष्टींची पोतडी बाहेर काढतो. या गोष्टींमध्ये पूर्वसूरींनी घालून दिलेली ग्रामकथा परंपरेची बैठक असली, तरी तिला नागर अनुभवांतून आलेल्या विलक्षण निरीक्षण शक्तींची जोड मिळाली आहे.

वसीम मणेर हा सिनेमॅटोग्राफर, चित्रकार आणि डॉ. मॅक्सिन बर्नसन या शिक्षणकर्तीने गावांतून घडविलेल्या प्रयोगांतून उभा झालेला कलासक्त तरुण आहे. मुंबईतील सिनेक्षेत्रात काही वर्षे अनुभव घेतल्यानंतरही त्याने फलटण या आपल्या मायभूमीत स्थिरावण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवरील माहितीपटांच्या चित्रीकरणासाठी सातत्याने देशभर फिरणारा हा लेखक आपल्या गावचा भवताल कथांमधून यशस्वीरीत्या पकडत आहे. गेल्या काही वर्षांत दिवाळी अंक आणि नामवंत मासिकांमधून आलेल्या त्याच्या कथांचा पहिला संग्रह ‘झुम्कुळा’ सध्या कथाप्रेमी वाचकांमध्ये चर्चेत आहे. या कथा वाचनीय तर आहेच, पण त्यासोबत त्यातील शब्दकळा, घाट आणि घटनांची वळणे ही अद्भुत आहेत.

‘आपरेशन’ ही गेल्या दशकभरातील सर्वोत्तम मराठी कथांमध्ये समाविष्ट करता येऊ शकेल, इतकी प्रभावी कथा या संग्रहात आहे. पशूवैद्यकीयची परीक्षा नुकतीच पास झालेल्या तुकाराम गायकवाड नावाच्या डॉक्टरसमोर पहिलेच आव्हान येते ते बैलाच्या अंडकोशावर शस्त्रक्रिया करण्याचे. तालुक्यातील निष्णात डॉक्टरांनी हात टेकलेले असतानाही हा तरुण आपल्या कारकीर्दीच्या आरंभीच प्रचंड मोठी जोखीम घेतो. हलाखीत शिकत पुढे जाणारा हा तरुण ऑपरेशनसाठी लागणाऱ्या साहित्याच्या जुळवाजुळवीपासून ते वाढत जाणाऱ्या अडचणींचा डोंगर कसा उलथवू शकेल, याचे क्षणोक्षणी अंगावर काटा आणणारे वर्णन ही कथा आपल्या मनात चिरंतन राहू शकेल, इतक्या ताकदीने उतरली आहे.

‘झुम्कुळा’ या शब्दाचा वास्तव-अर्थ पाळण्यातील बाळाला एकाग्रचित्त करू शकणाऱ्या फिरत्या खेळण्याशी संबंधित. मात्र फलटण आणि परिसरात त्या शब्दाचे प्राकृत-अर्थ नागमिलनक्रीडेच्या परमोच्च क्षणापासून ते पुरुषार्थ प्रगटीकरणापर्यंत पोहोचतात. या शीर्षककथेत स्मार्टफोन वापरण्यात अडचण असणारा पैलवान गडी दूर गावातील आपल्या होणाऱ्या बायकोला मित्राच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅपवर मर्यादेतील प्रेमसंदेश धाडताना उडणाऱ्या भाषिक गमती प्रचंड रंजक आहेत. या संदेशवहन काळात नर धामण सापांच्या झुंजीमुळे गावात बघ्यांच्या वेटोळ्यातून तयार होणारी शब्दकळा सूक्ष्मविनोदाचा उत्तम नमुना आहे.

एकूण बारा कथा असलेल्या या संग्रहामधील व्यक्तिरेखा विविधरंगी आणि बहुजीवनस्पर्शी आहेत. यातील बहुतांश कथा गावातील मुस्लीम समाजाचे वर्णन करणाऱ्या असल्या, तरी त्या फक्त या एकटय़ा समाजाच्याच प्रतिनिधित्व करणाऱ्या नाहीत. हमीद दलवाई, डॉ. यू. म. पठाणांपासून राजन खान यांच्या कथांतील रूढ वाटांपलीकडे जाण्याचा त्या प्रयत्न करीत असल्याने वेगळ्या ठरतात. किल्ला, बैदा, खारी, घरभरवनी, सुगंधी शुटर या कथांचा विशेष उल्लेख करता येईल. गावातील पौगंडावस्थेतील पोराचा किल्ला कसा बनतो, हे पाहण्यासाठी जाणाऱ्या पिंकू नावाचे नकळत्या वयातील लहान मूल लैंगिक जाणिवांपर्यंत कसे पोहचते, याचे वर्णन अत्यंत सहजरीत्या ‘किल्ला’ कथेमधून आले आहे.

यांतील अनेक कथा दहा ते पंधरा पानांच्या पसाऱ्यामध्ये अत्यंत मोठा आशय घेऊन येतात. ग्रामीण जगणे खूप दु:खाचे, खूप हलाखीचे, प्रचंड अन्याय आणि संकटांनी भरलेले असल्याचा एकांगी दाखला यातील कुठल्याही कथेमधून काढता येत नाही, हे या कथांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणावे लागेल. अगदी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या व्यक्तींचे जगणे असले, तरी ते पूर्णपणे हताश, हतबल होताना दिसत नाहीत.

‘मल्हारी’ आणि ‘फळकूट’ या दोन वैशिष्टय़पूर्ण कथांमध्ये असलेल्या ग्रामीण तरुणांचे जगणे चटका लावणारे असले, तरीही त्यांच्या विलक्षण मांडणीने आवडून जातात. ‘खारी’ आणि ‘सत्कार’ या कथा चमकदार आणि प्रभावी शेवटांनी लक्षवेधी ठरतात. ‘मैमूनाचा मालक’ ही गोष्ट गावात स्वाभिमानाने एकटय़ा जगणाऱ्या मुस्लीम महिलेच्या मर्तिकानिमित्ताने चिरंतन स्त्री दु:खाची गोष्ट फार वेगळ्या शैलीत मांडते.

बंद पडत गेलेल्या मासिकांच्या व्यासपीठांअभावी दर्जेदार मराठी कथा निवडक दिवाळी अंकांमधूनच सध्या वाचायला मिळत आहे. कथा व्यवहाराला वाचकाश्रय फार नसल्याने चांगल्या कथेची चर्चा व्हायला हवी तितकी होत नसल्याच्या दृष्टचक्रात सध्या हा साहित्यप्रकार अडकला आहे. वसीमबार्री मणेर याच्या कथा ही पार्श्वभूमी असतानाही वाचकांमध्ये चांगली घुसळण करू शकतील, अशी अपेक्षा करायला लावणाऱ्या आहेत.

‘झुम्कुळा ’- वसीमबार्री मणेर

प्रकाशन : दवात ए दक्कन

पृष्ठे : १४२, मूल्य : २५०

Story img Loader