निवडणुका आटोपल्या, ‘संघप्रचारक’ नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. या निवडणुकीमध्ये मतदारांनी अधिकाधिक सहभागी व्हावे यासाठी आपण भरपूर परिश्रम घेतले. मात्र आता आपल्या नित्यकामाकडे अर्थात शाखेकडे वळा, असा संदेश संघशाखांवरून स्वयंसेवकांपर्यंत पोहोचवला जात आहे. संघशाखा हेच आपले नित्यकर्म आहे, निवडणुकांच्या निमित्ताने आलेले काम हा ‘आपद्धर्म’ होता, असा आशय या संदेशातून स्वयंसेवकांवर बिंबवला जात आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये संघस्वयंसेवकांनी अतिशय मेहनत घेतली. मात्र सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी गेल्या विजयादशमी उत्सवात संघ कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात, अधिकाधिक मतदान होईल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार वेगवेगळ्या संस्था-संघटनांच्या माध्यमातून संघस्वयंसेवक देशभर घरोघरी जाऊन मतदारांनी मतदान करावे यासाठी आवाहन करीत होते. या योजनेला यश आले आणि पूर्ण बहुमत मिळवून मोदी पंतप्रधान झाले. आता संघ स्वयंसेवकांनी राष्ट्र उभारणीच्या कामाला लागावे, असे आवाहन संघाने केले असले तरी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा मतदार जागृतीसाठी संघाने पुढाकार घेतला आहे.
दरवर्षी मे महिन्यात संघाचे ‘संघशिक्षा वर्ग’ होतात. प्रथम वर्ष प्रांत स्तरावर, द्वितीय वर्ष २-३ प्रांतांचे एकत्र (क्षेत्रस्तरावर) तर तृतीय वर्ष संपूर्ण देशाचा एकत्र वर्ग नागपूरला असे हे वर्ग होतात. यंदा १६ मे ला निकालाच्या दिवशी देशभर संघशिक्षा वर्ग सुरू होते. परंतु भाजपचा दणदणीत विजय होऊनही या वर्गामध्ये कुठेही जल्लोष साजरा करण्यात आला नाही. सर्वत्र दिवसभराचे कार्यक्रम पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच झाले. या पाठोपाठ आता संघाच्या रचनेनुसार तालुका वा शहर स्तरावर ‘मोदीविजयानंतर..’ या आशयाच्या ‘बौद्धिक वर्गा’चे आयोजन करण्यात आल़े संपर्क-संवाद-संस्कार-संघटन या चतु:सुत्रीवर आधारित संघकाम हे सतत करायचे काम आहे. तेव्हा पुन्हा या कामाला लागा, असा संदेश या बौद्धिक वर्गांमधून दिला जात आहे. महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत या चतुसूत्रीचा पुन्हा भाजपला फायदा व्हावा, असे संकेत दिले गेल्याचे कळते.