काँग्रेसबरोबर आघाडी असतानाच नरेंद्र मोदी यांच्याबाबत प्रचाराच्या काळात मवाळ भूमिका घेणारे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आता मोदी यांच्याबाबत कोणती भूमिका घेतात हा राजकीय वर्तुळात उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवार यांनी आता विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. या दृष्टीने त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. नरेंद्र मोदी यांच्याबाबत प्रचाराच्या काळात राष्ट्रवादीने घेतलेली भूमिका हा चर्चेचा विषय ठरला होता. प्रचाराच्या सुरुवातीला मोदी यांच्याबाबत न्यायालयाच्या निकालाचा आदर केला जावा, अशी भूमिका पक्षाने मांडली होती. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मोदी यांच्या विरोधात महिलेवर पाळत ठेवण्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्याची घाई काँग्रेसच्या मंत्र्यांना झाली होती. तेव्हा हा निर्णय नव्या सरकारवर सोपवावा, अशी भूमिका राष्ट्रवादीने मांडली होती. राष्ट्रवादीच्या या दोन्ही भूमिकांची काँग्रेसमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती.
लोकसभा निकालाच्या पाश्र्वभूमीवर पक्षाचे काही नेते भाजप वा शिवसेनेत प्रवेश करू शकतात. या पाश्र्वभूमीवर पक्षात फाटाफूट होऊ नये म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष ठेवावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे उमेदवार जास्त निवडून आले. विधानसभेतही हाच कल राहावा, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न असेल. मोदी यांना अंगावर घेण्याचे राष्ट्रवादीकडून टाळले जाईल, अशी शक्यता आहे. विरोधाला विरोध अशीच राष्ट्रवादीची भूमिका राहील.
केंद्रात भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्याने छोटय़ा पक्षांना सत्ता स्थापनेत काहीच महत्त्व प्राप्त झाले नाही. राष्ट्रवादीला आता विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे. राष्ट्रवादीच्या दृष्टीने विधानसभेच्या निवडणुका या महत्त्वाच्या आहेत. सत्तेविना राष्ट्रवादीचे नेते राहू शकत नाहीत.