देशात सर्वाधिक ७० लाख ६१ हजार ३६८ मतदार ठाणे जिल्ह्य़ात असून मतदार यादींमध्ये छायाचित्रांचे प्रमाण ७५.४८ टक्के इतके आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतरही जवळपास २५ टक्के म्हणजे तब्बल १९ लाख ९ हजार ३१७ मतदारांची अद्याप यादीत छायाचित्रे नाहीत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार आता मतदानासाठी यादीत नावापुढे छायाचित्र असणे अनिवार्य असल्याने उर्वरित मतदारांसाठी जिल्हा शासनाच्या वतीने विशेष छायाचित्र नोंदणी मोहीम राबविण्यात येत असून त्याद्वारे १५ मार्चपर्यंत नागरिकांना आपली छायाचित्रे मतदार यादीत समाविष्ट करता येणार आहेत.
ठाणे जिल्ह्य़ातील ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर या चार लोकसभा मतदार संघात सहाव्या टप्प्यात ७ हजार ६४५ मतदान केंद्रांवर २४ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
यापाश्र्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांनी छायाचित्र मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पी. वेळारासू यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले. मतदार यादीतील छायाचित्र गोळा करण्यासाठी जिल्ह्य़ातील सर्व महानगरपालिका तसेच नगरपालिका क्षेत्रात विशेष समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. येत्या रविवारी ९ मार्च रोजी जिल्ह्य़ातील सर्व मतदार केंद्रांमध्ये त्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

एसएमएसद्वारे कळणार मतदान केंद्र
नागरिकांना आपल्याकडचा मतदान ओळखपत्र क्रमांक मोबाइलद्वारे पाठवून मतदान केंद्राविषयी माहिती मिळणार आहे. त्यासाठी मोबाइलवर ‘ईपीआयसीआयडी’ टाईप केल्यानंतर स्पेस देऊन मतदान ओळखपत्रावरील क्रमांक ९८६९८८९९६६ या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास मतदारांना मतदान केंद्राचा पत्ता एसएमएसद्वारे कळू शकणार आहे.

आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी
आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी ठाणे, नवी मुंबई पोलीस आयुक्त तसेच ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षकांच्या समन्वयाने महापालिका क्षेत्रात अतिक्रमण विभागाचे उपायुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका शाखा प्रकल्प अधिकारी, नायब तहसीलदार, जव्हार येथील अपर निवासी उप जिल्हाधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.