विविध खात्यांमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकार या २३ हजार कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करील, अशी ग्वाही कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी दिली. रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यास सरकार उत्सुक आहे, मात्र काही खात्यांकडून अशा कर्मचाऱ्यांची यादी अद्याप प्राप्त न झाल्याने त्याला विलंब होत आहे, असेही सिद्धरामय्या यांनी विधानसभेत सांगितले. ज्या खात्यांकडून यादी प्राप्त झालेली नाही त्या खात्यांकडून ती मिळाल्यानंतर अर्थ खात्याची मंजुरी घेऊन ती मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते जगदीश शेट्टर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. तीन वर्षे उलटूनही रोजंदारी कर्मचाऱ्यांना अद्याप नियमित करण्यात आलेले नाही, असे शेट्टर म्हणाले.
भाजपमध्ये प्रवेश करण्याचा पुन्हा प्रयत्न करणार – मुतालिक
पणजी : भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले श्री राम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी, आपण भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कर्नाटकमधील भाजपच्या काही नेत्यांनी आपल्याविरुद्ध गैरसमज पसरविले आहेत, असे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत. आपला मोदींवर विश्वास आहे, ते उत्तम नेते आहेत, भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आपण प्रयत्न करणार, असे मुतालिक म्हणाले. मार्च महिन्यांत भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर काही तासांतच पक्षातून आपली हकालपट्टी होण्यामागे भाजपतील नेत्यांचा एक गट आहे, पक्षश्रेष्ठींना चुकीची माहिती पुरविण्यात आली. आपल्याला पक्षात प्रवेश मिळाल्यास पक्षातील काही नेत्यांना त्यांच्या भवितव्याची धास्ती वाटू लागली होती. मात्र पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांना आपल्याबद्दल काहीच माहिती नाही, त्यांनी चुकीच्या माहितीवर आधारित निर्णय घेतला असेही मुतालिक म्हणाले.
मुतालिक यांना गोवाबंदी नाही
पणजी : वादग्रस्त श्रीराम सेनेवर गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर सरकार बंदी घालण्याची शक्यता भाजपने शुक्रवारी फेटाळून लावली. देशात कोठेही कायदेशीर कृती करण्यापासून भारतीय घटना कोणालाही थांबवू शकत नाही, असे भाजपने म्हटले आहे. राज्यात श्रीराम सेनेवर प्रवेशबंदी घालण्यात येणार नाही, जोपर्यंत ही संघटना कायदाविरोधी कृती करीत असल्याचे निष्पन्न होत नाही तोपर्यंत आम्ही बंदी घालू शकत नाही, असे गोवा भाजपचे प्रवक्ते विल्फ्रेड मेस्क्विटा यांनी स्पष्ट केले आहे.
मध्य प्रदेशातील विरोधी पक्षनेते निदर्शनाच्या वेळी जखमी
भोपाळ : मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ (एमपीपीबीई) घोटाळ्याच्या निषेधार्थ येथील रोशनपुरा चौकात निदर्शने करताना मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते सत्यदेव कटारे जखमी झाले. या घोटाळ्याच्या निषेधार्थ राज्य युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न अवस्थेत निदर्शने केली आणि या घोटाळ्यात हात असल्याचा आरोप करून त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कटारे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला आणि पाण्याचे फवारे मारून त्यांना पांगविण्याचा प्रयत्न केला. या धामधुमीत कटारे यांच्या डोक्यावर पाठीमागून पाण्याच्या फवाऱ्याचा जोरदार तडाखा बसला आणि ते खाली पडले. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले आहे. कार्यकर्ते शांततेत निदर्शने करीत होते तरीही पोलिसांनी त्यांना पांगविण्यासाठी बळाचा वापर केला, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.
‘मध्य प्रदेशात नेतृत्वबदल नाही’
नवी दिल्ली : मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ (एमपीपीबीई) घोटाळ्यावरून मध्य प्रदेशात नेतृत्वबदल केला जाणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे, असेही ते म्हणाले. सदर घोटाळ्यात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सहभाग असल्याचा आरोप काँग्रेसने केला असून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान राज्यात या घोटाळ्याच्या निषेधार्थ राज्य युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न अवस्थेत निदर्शने केली व मुख्यमंत्री हटविण्यात यावेत, अशी मागणी केली. तर या प्रकरणी मुख्यमंत्री चौहान यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.