शिवसेनेचे राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी मागे घेतल्याने विधान परिषदेची द्वैवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडल्याने राजकीय घोडेबाजार टळल्याची चर्चा सुरू आहे. नऊ जागांसाठी दहा उमेदवार असल्याने, मतांच्या फोडाफोडीला उधाण येऊन कोणालाही पराभवाला सामोरे जावे लागले असते. सेनेच्या उमेदवाराने नाटय़मय माघार घेतल्याने पराभवाचे सावट निवडणुकीवरूनच दूर झाले, आणि विधानभवनाबाहेर फटाक्यांची आतषबाजी झाली.
काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी तीन, भाजपचे दोन तर शिवसेनेचा एक उमेदवार निवडून आला. पक्षाच्या संख्याबळाच्या आधारे राष्ट्रवादीला तिसरा उमेदवार निवडून आणण्याकरिता २५ अतिरिक्त मतांची आवश्यकता होती. १२ अपक्षांचा पाठिंबा असला तरी आणखी १३ मते मिळविण्याचे आव्हान होते. युतीचे तीन सदस्य निवडून येणे शक्य असले तरी भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी दोन उमेदवार उभे केल्याने चुरस वाढली होती. अपक्ष वा छोटय़ा पक्षांबरोबरच राजकीय पक्षाच्या आमदारांना उमेदवारांनी गळाला लावले होते. भाजपने मनसेकडे मदतीचा हात पुढे करून आपले दोन्ही उमेदवार निवडून येतील, अशी व्यवस्था केली होती. शिवसेनेनेही दोन्ही जागा लढविण्याचा निर्धार केला होता.
सन २०१० मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर घोडेबाजार झाल्याची चर्चा होती. याच सदस्यसंख्येच्या आधारे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे चार उमेदवार निवडून आणले होते. आता घोडेबाजार टाळण्याकरिता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेतला. वास्तविक २०१२ मध्ये दहा जागांसाठी निवडणूक असताना काँग्रेसचे चार जण निवडून येणे शक्य होते. पण मुख्यमंत्री चव्हाण यांनी घोडेबाजार टाळण्याकरिता एका जागेचा त्याग केल्याने तेव्हा शिवसेनेचा फायदा झाला होता. यंदाही मुख्यमंत्र्यांची तीच भूमिका होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिनविरोध निवड झालेले
काँग्रेस – शिवाजीराव देशमुख, चंद्रकांत रघुवंशी, हरिभाऊ राठोड
राष्ट्रवादी – हेमंत टकले, किरण पावसकर, आनंद ठाकूर
भाजप – विनोद तावडे, पांडुरंग फुंडकर
शिवसेना – नीलम गोऱ्हे

लाल दिवा कायम
विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख आणि विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांची फेरनिवड झाल्याने दोघांचाही लाल दिवा कायम राहिल अशीच चिन्हे आहेत. सभापतीपदावरून वाद नको म्हणूनच काँग्रेसने देशमुख यांनाच प्रकृती साथ देत नसतानाही उमेदवारी दिली होती.

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 9 elected unopposed to legislative council of maharashtra
Show comments