प्रचारासाठी विमानांचा वापर करण्याच्या मुद्दय़ावरून भाजप व काँग्रेसवर टीकेची झोड उठवणारे ‘आप’चे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी स्वत:च एका कार्यक्रमासाठी खासगी चार्टर्ड विमानाचा वापर केला. त्यामुळे त्यांना सार्वत्रिक टीकेला सामोरे जावे लागले. मात्र चार्टर्ड विमानाचा खर्च ‘इंडिया टुडे’ या वृत्तसमूहाने केल्याचा दावा केजरीवाल यांनी केला.
गेल्या तीन दिवसांपासून गुजरातमध्ये दौऱ्यासाठी असलेले केजरीवाल शुक्रवारी अहमदाबादेतून जयपूरला आले. एका हिंदी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी ते जयपूरला आले होते. तेथून दिल्लीला जाण्यासाठी मात्र त्यांनी खासगी चार्टर्ड विमानाचा वापर केला. भाजप व काँग्रेस यांना साधनशुचिता आणि नैतिकतेचा डोस पाजणाऱ्या केजरीवालांनी खासगी विमानाचा वापर केल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. खासगी विमानाच्या वापराचा धागा पकडून भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी केजरीवालांवर टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या, ‘केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन तीन आठवडे उलटले. मात्र, अजूनही त्यांनी सरकारी निवासस्थान सोडलेले नाही. याच केजरीवालांनी दिल्लीतील व्हीआयपी संस्कृती नष्ट करण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. मात्र आता तेच या संस्कृतीचे पाईक झाले आहेत.’
दरम्यान, आपल्यावरील टीकेला केजरीवाल यांनी सडेतोड उत्तर दिले. दिल्लीत ‘इंडिया टुडे’ या वृत्तसमूहाने एक कार्यक्रम आयोजित केला होता. तिथे आपल्याला भाषण करायचे होते. जयपूरला आपल्या वेळेत विमान उपलब्ध न झाल्यानेच वृत्तसमूहाने आपल्यासाठी चार्टर्ड विमानाची व्यवस्था करून दिल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. ‘इंडिया टुडे’ वृत्तसमूहानेही केजरीवालांच्या या दाव्याला दुजोरा देत विमानाचे भाडे आपण दिल्याचे स्पष्ट केले.
मोदींची भेट घेण्यात केजरीवाल अपयशी
गांधीनगर : रिलायन्स गॅसच्या मुद्दय़ावरून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करणारे ‘आप’चे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी येथे मोदींची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अटकाव करत आधी मोदी यांच्या भेटीसाठी पूर्वपरवानगी घेण्याचे आदेश दिले.
मोदींनी केलेल्या विकासाचे दावे तपासून पाहण्यासाठी त्यांनी हा दौरा केला. शुक्रवारी त्यांच्या दौऱ्याची अखेर झाली. मात्र, तत्पूर्वी त्यांनी मोदींची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, केजरीवाल यांच्या गाडय़ांचा ताफा अडवण्यात आला. मोदी यांची भेट घेण्यासाठी पूर्वपरवानगी घेतली आहे किंवा कसे याची तपासणी करण्यात आली. परंतु केजरीवाल यांनी परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले. अखेरीस केजरीवाल यांचे सहकारी मनीष सिसोदिया यांनी मोदी यांच्या मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन त्यांच्या स्वीय सहायकांची भेट घेतली. मोदी यांच्या भेटीची लेखी परवानगी मागितली. त्याविषयी दोन-तीन दिवसांनी कळवण्यात येईल असे त्यांना सांगण्यात आले.
‘भाजप कार्यालयासमोरील निदर्शने ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया’
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे नेते (आप) अरविंद केजरीवाल यांना गुजरातमध्ये ताब्यात घेण्यात आल्याने दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयासमोर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आणि ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, असे स्पष्टीकरण ‘आप’ने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या नोटिशीला उत्तर देताना दिले आहे. भाजपच्या मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी केलेली निदर्शने पूर्वनियोजित नव्हती, आम्ही आचारसंहितेचा आदर करतो. केजरीवाल यांना ताब्यात घेण्यात आल्याच्या विरोधातील ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. पक्षाचे सरचिटणीस पंकज गुप्ता यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी अमेय अभ्यंकर यांच्याकडे नोटिशीचे उत्तर सादर केले.आपच्या स्पष्टीकरणाची तपासणी केली जात असल्याचे अभ्यंकर यांनी सांगितले.