सामाजिक चळवळीत हिरिरीने सहभाग घेणारा अभिनेता आमिर खान राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांबद्दल काही विचारणा झाली, तर नेहमीच सावध उत्तरे देतो. मी कोणत्याच पक्षाच्या बाजूने नाही. त्यामुळे मी कोणाचा प्रचारही करणार नाही, हे स्पष्ट करणाऱ्या आमिरने तरुणांना मात्र ‘मतदानाच्या दिवशी बाहेर पडा आणि विचारपूर्वक तुमचे मत द्या’, असे आवाहन केले आहे.
लोकपाल विधेयकावरून आंदोलन करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना आमिरने पाठिंबा दिला होता, पण ती लोकांची चळवळ होती. राजकीय आंदोलन नव्हते, असे आमिरने स्पष्ट केले. आमिरने त्याच्या ४९ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधला. या वर्षी त्याचा राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘पी. के.’ हा एकमेव चित्रपट प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे हे पूर्ण वर्ष आपण ‘सत्यमेव जयते’साठी दिले असल्याचे आमिरने सांगितले. ‘सत्यमेव जयते’च्या निमित्ताने समाजातील ज्वलंत अशा समस्यांवर आपण आवाज उठवू शकतो. त्यासाठी आपल्याला राजकारणात जायची गरज नसल्याचे आमिरने सांगितले.
अण्णा हजारेंना जसा पाठिंबा दिला होता तसाच ‘आप’लाही पाठिंबा देणार का? या प्रश्नावरही त्याने अगदी सावधपणे उत्तर दिले. ‘आप हा एकदम नवीन पक्ष आहे. ते काय काम करणार हे पाहूयात, पण मी कुठल्याच राजकीय पक्षाला पाठिंबा देणार नाही, असे आधीच सांगितले आहे. तसाच काही सामाजिक मुद्दा असेल, तर आपण सगळेच एकत्र येऊ,’ असे तो म्हणाला. मात्र, ज्याला मतदानाचा अधिकार
आहे अशा प्रत्येकानेच घराबाहेर पडून मतदान केले पाहिजे. विशेषत: तरुणांनी अतिशय विचारपूर्वक मतदान करायला हवे, असे आपले मत त्याने व्यक्त
केले.