प्रामाणिकपणाच्या भांडवलावर निवडणुकीला सामोरे जाऊ इच्छिणाऱ्या आम आदमी पक्षाने आता भ्रष्टाचारमुक्त निवडणूक अभियानास नागरिकांना मदत करण्याचे साकडे घातले आहे. निवडणूक प्रचाराचा खर्च भागविण्यासाठी रोख रक्कम वा वस्तू स्वरूपात मदत करावी तसेच निवडणुकीसाठी पक्षाला चांगल्या स्थितीत असणारी चारचाकी वाहने वापरावयास द्यावी, असे आवाहन आपचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विजय पांढरे यांनी केले आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी आपने पत्रकार परिषद घेत प्रचाराला वेग देण्यासाठी हालचाल सुरू केली. या मतदारसंघात विद्यमान खा. समीर भुजबळ यांचे तिकीट पक्षाने कापले आणि छगन भुजबळ यांना रिंगणात उतरविले आहे. याचा काय परिणाम होईल यावर बोलताना पांढरे यांनी त्यांच्या उमेदवारीने आपचा मार्ग अधिक सोपा झाल्याचे सांगितले. छगन भुजबळांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आहेत. तेलगी मुद्रांक घोटाळा, दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरण, टोलवसुली मोहीम, एमईटी प्रकरण, बेनामी संपत्ती व अवैध मालमत्ता, गिरणा साखर कारखाना खरेदी प्रकरण आदींमध्ये त्यांचे नाव प्रामुख्याने पुढे आले. लोकलेखा समितीने महाराष्ट्र सदनातील प्रकरणात भुजबळांवर ठपका ठेवला असल्याचे पांढरे यांनी सांगितले. निवडणुकीत या सर्व बाबी त्यांना अडचणीत आणणार आहेत. चितळे समितीचा अहवाल नुकताच शासनास सादर करण्यात आला. या अहवालात मोठे पुढारी सहीसलामत सुटतील आणि काही सनदी अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला असावा, असा आपचा निष्कर्ष असल्याचे ते म्हणाले. आगामी निवडणुकीत पक्षाला जनसामान्यांच्या
मदतीची गरज आहे. प्रचारासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी पक्षाला निधीची गरज आहे. सर्वसामान्य नागरिकाचा पक्ष म्हणविणाऱ्या आपला निवडणुकीसाठी चारचाकी वाहनेही लागणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी सुस्थितीतील वाहनेही वापरण्यासाठी द्यावीत, असे पांढरे यांनी सांगितले. प्रचारादरम्यान आपच्या सहा नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap appeals for four wheelers for election campaigning to people
Show comments