आम आदमी पक्षाने महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे ४८ जागा लढविण्याचा निर्णय घेतला असून काही मतदारसंघांत चित्रपट, नाटय़ क्षेत्रातील दिग्गज व नामवंत कलाकारांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू आहे. त्यादृष्टीने ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर, नंदू माधव, सोनाली कुलकर्णी आदी कलावंतांशी आपच्या नेत्यांनी संपर्क साधला आहे. अमरापूरकर व माधव यांची निवडणूक लढविण्याची तयारी आहे, तर सोनाली प्रचारात उतरणार असल्याचे सांगण्यात येते.
निवडणुकीच्या रिंगणात विविध क्षेत्रांतील नामवंत व चांगली मंडळी उतरविण्यावर आपचा भर आहे. पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी नुकतीच मुंबईत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पहिलीच मोठी जाहीर सभाही झाली. सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून आपमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
योगेंद्र यादव यांच्या मुंबई भेटीच्या दरम्यान राज्यातील ४८ मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांच्या नावांचा आढावा घेण्यात आला. त्या वेळी चित्रपट-नाटय़ सृष्टीतील कलाकारांची नावे पुढे आली. नर्मदा बचाव आंदोलन असो की इतर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न असो, सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सक्रिय असणारे ज्येष्ठ नेते सदाशिव अमरापूरकर यांनी अहमदनगरमधून निवडणूक लढवावी, अशी आपच्या नेत्यांनी त्यांना गळ घातली असल्याचे कळते. तर हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या विद्रोही नाटकामुळे प्रसिद्धिीच्या झोतात आलेले नंदू माधव यांना बीडमधून भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात उतरविण्याचा आपचा विचार आहे. सोनाली कुलकर्णी यांची मात्र निवडणूक लढविण्याची इच्छा नाही. परंतु निवडणूक प्रचारात उतरण्याचे त्यांनी मान्य केले आहे, असे समजते. सोनाली महाराष्ट्रातील स्टार प्रचारक असेल असे सांगितले जाते.  
नाना नाना, ना रे
सिनेसृष्टीतील बेधडक-बिनधास्त अभिनेता म्हणजे नाना पाटेकर. आपच्या नेत्यांच्या बैठकीत नानांनाही त्यांना इच्छा असेल तिथून निवडणूक लढविण्यास विचारणा करावी, अशी चर्चा झाली. परंतु नानाचा बेधडक-बिनधास्तपणा आपल्याही अंगावर येईल, अशी भीती किंवा शंका काही नेत्यांनी व्यक्त केली. मग सर्वानीच ‘नाना नाना, ना रे’ असा सूर आळवायला सुरुवात केली. तूर्त नाना स्वत:हून काही आपबद्दल, नव्या राजकारणाबद्दल किंवा निवडणूक लढविण्याबद्दल बोलतात का, त्याकडे लक्ष ठेवायचे एवढेच ठरले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा