आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरंविद केजरीवाल यांच्या मुंबई दौऱ्याचे निमित्त साधून बुधवारी पक्षाचे महाराष्ट्रातील आणखी १७ उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यात पंधरा दिवसांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात उतरलेले माजी आयपीएस अधिकारी डॉ. संजय अपरांती आणि हिंदु-मुस्लिम ऐक्याचा प्रयोग करणारे सुरेश खोपडे यांचा समावेश आहे. अपरांती यांना रायगडमधून जलसंपदा मंत्री सुनील तटकरेंविरोधात तर खोपडे यांना बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवारी देण्यात आली आहे.
आपने देशभरातील ५६ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. रायगडमध्ये पोलीस अधिक्षक म्हणून काम केलेले आणि अगदी पंधरा दिवसांपूर्वी स्वेच्छा निवृत्ती घेऊन राजकारणात आलेले संजय अपरांती यांना रायगडमधूनच उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते व जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्याशी त्यांना सामना करावा लागणार आहे. दुसरे निवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांना बारामतीतून उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्याशी त्यांना लढत द्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे मुस्लमीबहूल मतदारसंघ असलेल्या भिवंडीतून ‘आप’ने जलालूद्दीन अन्सारी यांना उमेदवारी देवून काँग्रेस व भाजपची कोंडी केली आहे. अन्सारी यांच्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला फटका बसण्याची चिन्हे आहेत.
भिवंडीसह धुळ्यातून अन्सारी हारून यांच्या रूपाने मुस्लीम उमेदवाराला प्राधान्य देवून ‘आप’ने अल्पसंख्यांकांमध्ये सकारात्मक संदेश दिला आहे. शरद पवार यांचे कट्टर विरोधक असणारे स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याविरोधात ‘आप’ने अपेक्षेप्रमाणे शेतकरी संघटनेचे नेते रघूनाथदादा पाटील यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे राजू शेट्टी व पाटील हे एकेकाळचे शेतकरी संघटनेतील सहकारीच आता एकमेकांविरुद्ध लढणार आहेत.
‘आप’च्या पाचव्या यादीत समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांपैकी एकही नेत्याचे नाव नाही. धर्मनिरपेक्षतेचा टेंभा मिरवणाऱ्या काँग्रेसला महाराष्ट्रात एकही मुस्लीम उमेदवार मिळत नसताना ‘आप’ने पाचव्या यादीत दोघा मुस्लीम उमेदवारांना प्रतिनिधित्व दिले
आहे. पाचव्या यादीत गुजरातमधून दोन, आसाम व केरळमधून प्रत्येकी सहा, बिहारमधून आठ, मध्य प्रदेशमधून सात, हिमाचलमधून १ तर उत्तर प्रदेशमधून ९ उमेदवारांची नावे आहेत.
‘आप’चे महाराष्ट्रातील उमेदवार
संजय अपरांती (रायगड), रघुनाथदादा पाटील (हातकणंगले), सुरेश खोपडे (बारामती), जल्लालुद्दीन अन्सारी (भिवंडी), सुधीर सुर्वे (बुलढाणा), अन्सारी निहाल अहमद (धुळे), नरेश ठाकूर (कल्याण), सविता शिंदे (माढा), सतीश जैन (उत्तर मुंबई), नरेंद्रसिंग ग्रंथी (नांदेड), उस्मानाबाद विक्रम साळवे, सलमा कुलकर्णी (परभणी), प्रताप गोस्वामी (रामटेक), कर्नल गडकरी (रत्नागिरी-सिंधुदुर्ग), चोरगे (सातारा), नितीन उदमाले (शिर्डी), निकम (शिरूर)