सुरुवातीला राज्य सरकारच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, मग स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, नंतर ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर..
वेगवेगळ्या क्षेत्रांतील या तीन दिग्गजांना आम आदमी पक्षाने लोकसभेच्या नगर मतदारसंघासाठी गळ टाकला, मात्र यातील एकही त्यांच्या गळाला लागला नाही. त्यामुळे ‘बात कुछ बनी नहीं!’ या तिघांमधला एक धागा समान आहे, तो म्हणजे तिघेही अराजकीय आहेत, त्यांच्या कामांमुळे वलयांकित आहेत, शिवाय तिघेही पक्के नगरकर आहेत.
पवार यांनी सुरुवातीलाच या गोष्टीला नम्रपणे नकार देत राजकारण आणि निवडणुका हे आपले काम नाही हे स्पष्ट करून ‘झाडू’ नाकारला. त्यांना राजकारणात आणण्याचा हा काही पहिला प्रयत्न नाही. त्यांची शरद पवार यांच्याशी जशी जवळीक आहे तशीच प्रमोद महाजनांशीही होती. महाजन असताना रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये त्यांचा नियमित वावरही होता. मात्र पोपटराव यांनी ग्रामविकासाची कास काही सोडली नाही.
‘आप’ने मग डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्यासाठी गळ टाकला, मात्र त्यातही यश आले नाही. केजरीवाल यांनी राजकारणात येताना ‘झाडू’ हातात घेतला, मात्र कुलकर्णी यांनी वीस-पंचवीस वर्षांपूर्वी स्नेहालयची स्थापना करतानाच हातात झाडू घेतला होता. ‘आप’ला नगरसाठी मग ‘रामा शेट्टी’ची आठवण झाली, मात्र सदाशिव अमरापूरकर यांनीही ‘आप’च्या प्रस्तावाला नकारच दिला. त्यांच्यासाठी ‘आप’ने चांगलीच मोर्चेबांधणी केली. विशेष म्हणजे अमरापूरकर पुन्हा नगरच्या वाटेवर आहेत. या तिघांसाठी ‘आप जैसा कोई मेरे जिंदगी में आये, तो बात बन जाए’ असाच ‘आप’चा प्रयत्न होता. मात्र एकही मासा गळाला न लागल्याने ‘बात कुछ बनी नहीं..’ मात्र उमेदवारीसाठी चर्चा जोरदार झाली.
चर्चा तर होणारच!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा