‘‘लष्करी जवानांच्या प्रश्नांवर यूपीए सरकार असंवेदनशील आहे. माजी सैनिकांसाठी यूपीए सरकारने ‘वन रँक, वन पेन्शन’ ही योजना सुरू केली. मात्र अद्याप या योजनेची अंमलबजावणी सरकारने केली नाही. या योजनेची अंमलबजावणी न करता सरकारने जवानांच्या भावनांशी खेळ केला आहे,’’ अशा शब्दांत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी रविवारी यूपीए सरकारवर हल्ला चढविला.
लुधियानामध्ये रविवारी भाजप आणि त्यांचा सहकारी पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दल यांची ‘फतेह’ सभा आयोजित केली होती. या वेळी त्यांनी यूपीए सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजप आणि शिरोमणी अकाली यांची युती ही हिंदू-शीख ऐक्याचे प्रतीक आहे. या युतीमुळे फुटीरतेचे धोरण अवलंबलेल्या काँग्रेसचा खेळ समाप्त होणार आहे, असे मोदी यांनी सांगितले.
तेलंगण विधेयकावरून गोंधळ घालत काँग्रेसच्या खासदाराने संसदेत मिरपूड फवारणी केली होती. त्याचा दाखल देत मोदी म्हणाले, काँग्रेसकडून यापूर्वी जनतेच्या डोळय़ात धूळफेक केली जायची. आता मात्र ते मिरपूड फेकत आहेत. गांधी कुटुंबीय आणि काँग्रेस अन्य पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, याचे आश्चर्य वाटते. भ्रष्टाचाराची ओळखच या पक्षामुळे झाली. राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते, त्या वेळी अन्य पक्ष नव्हे, तर केवळ काँग्रेसचीच सत्ता होती. त्या वेळी दिल्लीकडून पाठवलेल्या निधीतील केवळ १५ टक्के रक्कमच प्रत्येक गावाला मिळायची. हा पैसा जायचा कुठे, असा सवाल मोदी यांनी विचारला.
‘‘मी जर पंतप्रधान झालो, तर चौकीदार म्हणून देशाचे रक्षण करेन. काँग्रेसची छायाही सरकारी तिजोरीवर पडू देणार नाही,’’ असे आश्वासन मोदी यांनी दिले. कच्छ भागातून शीख शेतकऱ्यांना हाकलून दिले जात आहे, या वृत्ताचे त्यांनी खंडन केले. ही एक अफवा असून, मी शीखविरोधी नसल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader