महायुतीला कोणताही तडा गेलेला नाही, पण फसगत होऊ नये, एवढीच आमची इच्छा आहे, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मातोश्रीवर नितीन गडकरी यांच्यावर पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे टीका केली.
महायुती म्हणून आम्ही लोकसभा निवडणूक एकदिलाने लढत आहोत.  राजनाथ सिंह, देवेंद्र फडणवीस, गोपीनाथ मुंडे आणि महायुतीतील अन्य नेत्यांमध्ये सुसंवाद आहे. परंतु मध्येच ‘स्पिडब्रेकर’ने डोके वर काढल्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. हे स्पिडब्रेकर काढून टाकण्याचे काम भाजपच्या नेत्यांनीच करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. युतीचे सरकार सत्तेवर येऊ नये असे वाटणाऱ्यांचाही बंदोबस्त भाजपने केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महायुतीमध्ये शिवसेनेच्यावतीने मी एकटाच बोलत आहे. आमचे अन्य नेते भाजपबद्दल काहीही बोलत नाहीत. भाजपच्या नेत्यांनीही ही शिस्त पाळली पाहिजे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बोलत असताना अन्य कोणी लुडबुड करू नये, असा इशाराही उद्धव यांनी दिला आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना चव्हाटय़ावर येऊन उत्तर देण्यास मी तयार आहे.  विधान परिषदेच्या रिंगणातील शिवसेनेचे उमेदवार राहूल नार्वेकर माघार घेणार का, असा सवाल पत्रकारांनी केला असता आज शेवटचा दिवस आहे. तुम्हाला लवकरच कळेल, असे उत्तर उद्धव यांनी दिले. मात्र त्यापूर्वीच राहूल नार्वेकर यांनी माघार घेतल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांवर ठेवलेला कम्युनिकेशन गॅपचा ठपका आज सेना नेत्यांच्या वर्तुळातही अनेकांना आठवला, आणि त्यांनी मौन धारण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा