रिपब्लिकन पक्षातील गटबाजीमुळे दलित समाजाच्या मतांमधील फूट टाळण्यासाठी किमान काही मतदारसंघात तरी विविध गटांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, यासाठी आंबेडकरी तरुणांनी पुढाकार घेतला आहे. त्याला अकोला व अमरावती मतदारसंघात मर्यादित यश मिळाले आहे. आणखी काही मतदारसंघात एक गट-एक उमेदवार अशी मोहीम सुरु करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत रिपब्लिकन राजकारणाचा झालेला खेळखंडोबा पाहून दलित समाजातील सुशिक्षित तरुण वर्ग अस्वस्थ झाला आहे. नेते एकत्र येत नाहीत आणि आले तर फारकाळ एकत्र रहात नाहीत, याचीही त्यांना खंत आहे. त्यामुळेच गेल्या वर्षभरापासून लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांनी व बहुजन समाज पक्षाने युती करावी, यासाठी काही तरुणांनी पुढाकार घेऊन फेसबुक आंबेडकरी मुव्हमेंट, अशी चळवळ सुरु केली. त्यानुसार या तरुणांनी विविध गटांच्या नेत्यांशी संपर्क साधून दलित मतांमधील फूट टाळण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन केले आहे.  
रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांच्या गटाने आधीपासूनच शिवसेना-भाजपशी युती केली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारिप-बहुजन महासंघाने महाराष्ट्र लोकशाही आघाडी स्थापन केली आहे. डॉ. राजेंद्र गवई यांचा पक्ष काही मोजक्या जागा स्वबळावर लढवत आहे. प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने व इतर काही गटांनी काँग्रेसला तर, काहींनी राष्ट्रवादी काँग्रेसला समर्थन दिले आहे.
बहुजन समाज पक्ष नेहमीप्रमाणे स्वबळावर निवडणुका लढवित आहे. त्यामुळे दलित मतांमध्ये उभी-आडवी फूट पडणार आहे. मात्र फेसबुक आंबेडकर मुव्हमेंटच्या कार्यकर्त्यांनी आशा सोडली नाही. त्यांनी राजेंद्र गवई यांची भेट घेऊन त्यांना अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्याची विनंती केली. त्यानुसार गवई यांनी आंबेडकरांना पाठिंबा दिला व आंबेडकर यांनी अमरावतीत गवई यांना पाठिंबा दिला.
आता दोन्ही ठिकाणी बसपने व इतर गटांनी आंबेडकर व गवई यांना पठिंबा द्यावा, असे आमचे प्रयत्न आहेत, अशी माहिती या चळवळीतील एक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांनी दिली. अशाच प्रकारे आणखी काही मतदारसंघात दलित मतांमधील फूट टाळण्यासाठी एक गट-एक उमेदवार, अशी मोहीम राबविण्यात येत आहे, त्याला यश येईल, अशी त्यांची अपेक्षा आहे.