डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठय़ा कष्टाने उभा करुन दिलेला पक्ष महाराष्ट्रातील नेत्यांनी स्वार्थासाठी प्रस्थापित पक्षांच्या दावणीला बांधला, हे नेते बाबासाहेबांचा नव्हे तर, दुसऱ्यांचे पक्ष चालवित आहेत, अशी घणाघाती टीका बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी केली.
मायावती रविवारी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी एक दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या होत्या. बसपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांची पहिली सभा औरंगबादला झाली व दुसरी सभा मुंबईत चुनाभट्टी येथे सौमय्या मैदानावर झाली. या सभेच्या निमित्ताने बसपने मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. दोन वाजताची सभेची वेळ ठरली होती. त्या आधीपासूनच उन्हाचे चटके अंगावर घेत मोठय़ा प्रमाणावर कार्यकर्ते मैदानावर जमले होते. त्यात महिलांचाही मोठा सहभाग होता. मायावती यांचे तब्बल पावणे चार तास उशिरा म्हणजे पावणे सहा वाजता सभास्थानी आगमन झाले. त्यांच्यासोबत पक्षाचे राष्ट्रीय महासचिव सतीश मिश्रा, राज्याचे प्रभारी खासदार वीरसिंह, प्रदेशाध्यक्ष विलास गरुड, तसेच मुंबईसह महाराष्ट्रातील व गुजरातमधीलही काही उमेदवार उपस्थित होते.
मायावती यांनी आपल्या सुमारे एक तासाच्या भाषणात काँग्रेस, भाजप आणि रिपाइं नेतृत्वावर जोरदार टीका केली. बाबासाहेब आंबेडकरांची महाराष्ट्र ही जन्मभूमी आणि कर्मभूमी. याच भूमीतून बाबासाहेबांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन कांशीराम यांनी उत्तर प्रददेशात त्यांचे विचार पोचविण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिपाक म्हणून बसपने उत्तर प्रदेशची चारवेळी सत्ता हाती घेतली. परंतु महाराष्ट्रातील रिपाइं नेत्यांनी स्वार्थासाठी बाबासाहेबांचा पक्ष इतर प्रस्थापित पक्षांच्या दावणीला बांधला. त्यांची राजकीय चळवळ संपुष्टात आणली. नाव बाबासाहेबांचे घेतात परंतु, दुसऱ्यांचे पक्ष चालवितात, असा हल्ला त्यांनी चढविला.
मोदी पंतप्रधान झाले तर दंगली होतील
मायावती यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केला. गुजरातमध्ये मोदींचे सरकार असताना गोध्रा दंगल झाली. त्यांनाच भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार केले आहे. अशी व्यक्ती पंतप्रधानपदी आली तर, देशात सांप्रदायिक दंगे होतील, असा इशारा त्यांनी दिला.