लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा वारसा सांगणारे नरेंद्र मोदी यांच्याही डोळ्यात आज अश्रू आले. भारतीय जनता पक्षाच्या पहिल्यावहिल्या विजयाचा जणू आंनदसोहळाच सेंट्रल हॉलमध्ये आज रंगला होता. त्यात विजयाचा आनंद होता पण जबाबदारीची जाणीवदेखील होती. नरेंद्र मोदींच्या भावनिक शब्दांनी सेंट्रल हॉलमधील वातावरण अजूनच गहिरे झाले होते.
मोदींचे कौतुक करताना लालकृष्ण अडवाणी म्हणाले की, मोदींनी भाजप व आमच्यावर कृपा केली आहे. त्याचा संदर्भ देताना मोदी काहीसे हळवे झाले. डोळ्यातील अश्रू रोखण्याचा कसाबसा प्रयत्न ते करीत होते. भाजपविषयी असलेल्या मातृत्व भावनेमुळे मोदींच्या डोळ्यात अश्रू दाटले. अश्रू रोखण्यासाठी मोदी घोटभर पाणी प्यायले. कसेबसे अश्रू रोखून आवंढा गिळून मोदींनी अत्यंत हृदयस्पर्शी शब्दात भावनांना वाट करून दिली. ते म्हणाले, ‘‘मी पक्षावर कृपा केलेली नाही. आईची सेवा करण्याला कृपा म्हणता येत नाही. भारतमातेप्रमाणे भारतीय जनता पक्षदेखील माझी आईच आहे.’’ त्यांच्या या वाक्यानंतर उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले.
विजयोत्सवाचे भाषण करताना मोदींनी जबाबदारीची जाणीवदेखील सर्वाना करून दिली. जनतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मोदींनी दिली. ते म्हणाले की, ‘‘तुम्ही सर्वानी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी स्वीकारली आहे.
२०१९ मध्ये आपण जेव्हा भेटू तेव्हा मी माझे प्रगतिपुस्तक ठेवीन. ते पाहून तुम्हाला नक्कीच खाली मान झुकवावी लागणार नाही. सरकार गरिबांसाठी काम करते. हीच माझी सरकारची व्याख्या आहे. त्याचबरोबर सरकार विद्यार्थी, महिला व युवकांचे असते. आतापर्यंत सत्तेत असलेल्यांनी सर्व वाईटच कामे केलीत असे नाही. त्यांनी त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम केले. जे-जे चांगले ते ते पुढे न्यायचे आहे. भारतीय राज्यघटनेविषयी नितांत आदर करून मोदी म्हणाले की, केवळ भारतीय राज्यघटनेमुळेच माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचता आले.
तुम्ही फक्त एक पाऊल पुढे सरका..
‘‘देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटी आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकाने जर एक पाऊल पुढे टाकलं तर आपला देश एका वेळी तब्बल सव्वाशे कोटी पावलं पुढे जाईल हे विसरू नका,’’ असे आशादायी विधान नरेंद्र मोदी यांनी भाषणादरम्यान केले. ‘‘२०१९ मध्ये आपण सर्व खासदारांपुढे आपले प्रगतिपत्रक सादर करू. या देशात आता निराशेला थारा नाही,’’ अशा शब्दांत मोदींनी देशबांधवांना आश्वस्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा