‘कर्तारसिंग थत्ते’ आठवतात?.. मी निवडणुकीच्या राजकारणात ‘पडलो’, असे ते सांगायचे. हे कर्तारसिंग थत्ते म्हणजे, गणेश लक्ष्मण थत्ते. कट्टर हिंदुत्ववादी थत्ते यांनी शस्त्र बाळगता यावे म्हणून शीख धर्म स्वीकारला, आणि निवडणुकीच्या राजकारणात पं. नेहरूंपासून अनेकांना आव्हाने देत राहिले. राष्ट्रपतीपदाच्या अनेक निवडणुका त्यांनी लढविल्या आणि प्रत्येक वेळी, साहजिकच, ते ‘पडले’..
राजकारणातील ती ‘सर्किट’ परंपरा अजूनही सुरू आहे.
आजकाल भ्रष्टाचाराच्या मुद्यावर निवडणुकांचे रान उठले आहे आणि स्वच्छ चारित्र्याच्या राजकारणाचा बोलबाला सुरू आहे, तरीही अशाच एका आवलियाने नवा पक्ष काढून धमाल उडवून दिली आहे. हा पक्ष गांभीर्याने निवडणुका लढवणार नाही, पण राजकारणात ‘पडण्याची; इच्छा असलेल्यांना या पक्षाचा आधार मिळू शकतो.
ही कहाणी आहे, नरेशसिंह बुधौरिया नावाच्या एका आवलियाची.. वकीली पेशा असलेला नरेशसिंह याआधीही चर्चेत आला होता. त्या वेळी त्याच्या पक्षाचे नाव होते, ‘पोल खोल पार्टी’.. या पक्षाच्या झेंडय़ाखाली या नरेशसिंहांनी लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकाही लढविल्या होत्या. भाजपचे राजनाथ सिंह, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, विनय कटियार, नवज्योत सिद्धू अशा दिग्गजांच्या विरोधात त्याने दंड थोपटले होते.
राजकारणात ‘पडण्याच्या’ या अनुभवाची शिदोरी सोबत असल्याने या वेळी नरेशसिंहांनी नवा पक्ष स्थापन केला आहे. सध्या ‘आम आदमी पार्टी’ची चर्चा असल्याने नरेशसिंहांनी ‘खास आदमी पार्टी’ स्थापन केली आहे. स्वत नरेशसिंह यांनी आम आदमीचे कुमार विश्वास आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या विरोधात अमेठीच्या निवडणूक रिंगणात ‘पडण्याचे’ ठरविले आहे.  
यापूर्वी नरेशसिंहांच्या प्रचारात पाळीव प्राणी-पक्ष्यांचा ताफा असायचा. या वेळी प्रचारनीती थोडी बदलली आहे.
‘केवळ भ्रष्ट, फ्रॉडस्टार लोकांनाच पक्षात प्रवेश’ असा फलकच नरेशसिंहांनी आपल्या पक्षाच्या पहिल्या पदयात्रेत शहरभर फिरविल्याने, त्याची चर्चा सुरू झाली आहे. केजरीवालांचे ‘आप’, तर आपले ‘खाप’.. त्यामुळे केजरीवालांच्या पक्षाला आपण घाबरत नाही, असेही नरेशसिंह म्हणतात.
‘खाप’ला दोघांचीच भीती वाटते. एक म्हणजे, माजी राष्ट्रपती डॉ. कलाम, आणि दुसरे, अण्णा हजारे.
कारण, निवडणुकीच्या रिंगणात भ्रष्टाचाराचा मुद्दा महत्वाचा झाला पाहिजे, असाच या पक्षाचा उद्देश आहे. निवडणुकीचे निकाल काय लागणार, त्याच्याशी आपल्याला देणेघेणे नाही. कारण आपण विजयी होण्यासाठी निवडणूक लढवतच नाही. देशापुढील ज्वलंत मुद्दे निवडणुकीच्या निमित्ताने जगासमोर आणण्यासाठीच आपले हे उद्योग सुरू आहेत, त्यामुळे आपली निवडणूक फारशी गांभीर्याने घेतली गेली नाही, तरी कुठे तरी आपला आवाज उमटेलच, असा नरेशसिंहांचा विश्वास आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा