एखाद्याचा हातगुण चांगला असतो. त्याने भूमिपूजन केले की इमारत उभी राहते आणि आमच्यासारख्यांचा हात असा आहे, की भूमिपूजन केले की ती इमारतच उभी राहत नाही, असे  पनवेलमध्ये गुरुवारी डॉ. आंबेडकर भवनाच्या उद्घाटनावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आणि काही तासांतच त्याची प्रचीती आली.
पनवेलमध्ये अजितदादांचा हा पहिलाच कार्यक्रम होता. त्यांचे भाषणही जोरदार झाले. मात्र काही मिनिटांतच राष्ट्रवादीचे पनवेल शहर अध्यक्ष सुनील घरत यांनी जिल्हाध्यक्षांना राजीनामा फॅक्स केला. कार्यक्रमावेळी घरतही पवारांसोबत व्यासपीठावर होते. काही मिनिटांत असे काय घडले. पवार यांची स्वत:बद्दलची स्पष्टोक्ती खरी ठरल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही संभ्रमात पडले आहेत. अजित पवार आणि तटकरे यांनी स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे घरत यांनी आपला राजीनामा दिला आहे. जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नवीन पनवेलमध्ये शहराध्यक्षांना न कळवता जिल्हाध्यक्षांनी कसा आयोजित केला आणि या कार्यक्रमाला मंत्रिमहोदय कसे गेले, असा त्यांचा आक्षेप आहे. सुनील घरत हे नवीन पनवेलमध्ये राष्ट्रवादीची ताकद म्हणून ओळखले जातात. सुरुवातीला गणेश नाईक आणि आता सुनील तटकरे यांचे ते निकटवर्तीय आहेत. घरत यांच्या एकाएकी राजीनामा देण्याची चर्चा तर होणारच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: And panvel city ncp president send resignation to ajit pawar