गुरुवारी महाराष्ट्रातील आम आदमी पक्षाच्या आघाडीच्या नेत्या अंजली दमानिया यांचे राजीनामा नाटय़ चांगलेच गाजले. दमानिया यांनी सकळी सकाळी पक्षाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. मात्र रात्री उशीरा त्यांनी हा राजीनामा मागे घेतला. त्यांनी राजीनामा का दिला आणि तो परत का घेतला याची कारणे अद्याप गुलदस्त्यातच आहेत.
सामाजिक कार्यकर्त्यां असलेल्या दमानिया यांनी आपच्या माध्यमातून राजकारणात उडी घेतली. थोडय़ाच कालावधीत आपच्या आघाडीच्या व आक्रमक नेत्या म्हणून त्यांनी आपली प्रतिमा तयार केली. भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांना आव्हान देत नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढविली. अंजली दमानिया आपच्या राज्य शाखेच्या निमंत्रक होत्या. त्यांनी पदाचा व पक्षाच्या सदस्यत्वाचा गुरुवारी सकळी राजीनामा दिला. त्याबद्दल त्यांनी काहीही कारणे सांगितली नाहीत. मात्र मी माझ्या तत्वाशी तडजोड करणार नाही, एवढेच म्हटले आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे आपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मात्र अस्वस्थता निर्माण झाली होती. दमानिया यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचारासाठी अपार मेहनत घेतली. त्या स्वत उमेदवार असताना त्यांनी २१ मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केल्याचे एका नेत्याने सांगितले. दरम्यान रात्री उशीरा त्यांनी राजीनामा मागे घेतल्याचे मान्य केले.