ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नवी दिल्लीतील उपोषणानंतर देशात भ्रष्टाचाराच्या विरोधात वातावरण तयार झाले. साऱ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली. अर्थात या नेत्यांचे दाखविण्याचे दात वेगळे होते हे तर स्पष्टच होते. अण्णांच्या आंदोलनामुळे एक मात्र झाले व ते म्हणजे वाढलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जनजागृती झाली. यातून पुढे अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीची चूल मांडली आणि पहिल्याच फटक्यात दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा पटकावून काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्रीपदही मिळविले. जनतेत भ्रष्टाचाराच्या विरोधात तिडीक असल्याचा संदेश गेला. आपचा  दबदबा दोन महिन्यात कमी झाला. दिल्लीतील ‘आप’च्या यशाने चार दशके रखडलेले लोकपाल विधेयक संसदेत मंजूर झाले. लोकसभा निवडणुकीतही भ्रष्टाचार हा महत्त्वाचा मुद्दा ठरेल, अशी चिन्हे होती. काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपने रणशिंग फुंकले. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणाऱ्या भाजपने मात्र भ्रष्टाचार किंवा गैरमार्गाचा अवलंब केल्याबद्दल तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या येडियुरप्पा या कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्याला उमेदवारी दिली. भाजपचा आदर्श घेत काँग्रेसने ‘आदर्श’वादी अशोक चव्हाण यांना रिंगणात उतरविले. गेल्या आठवडय़ात अशोकरावांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नांदेडमध्ये मोदी यांची भली मोठी जाहीर सभा झाली. त्यात मोदी यांनी अशोक चव्हाण यांना सोडणार नाही, असे जाहीर करून टाकले. कर्नाटकातील बेल्लारीत बोलताना राहुल गांधी यांनी भाजपवर याच मुद्दय़ावर तोफ डागली. देशभर भ्रष्टाचाराच्या विरोधात बोंब मारता पण कर्नाटकात भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरच तुरुंगाची हवा खाऊन आलेले माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या मांडीला मांडी लावून बसता, असा टोला राहुूल यांनी मोदी यांना उद्देशून हाणला. ‘आपला तो बाळ्या, दुसऱ्याचे ते कार्टे’ ही मराठीतील म्हण काँग्रेस आणि भाजप या दोघांनाही तंतोतंग लागू होते. कारण मोदी यांना येडियुरप्पा चालतात, तर राहुल यांना अशोक चव्हाण..
चर्चा तर होणारच!