‘निवडणुकीचा वाढलेला टक्का पाहता तरुणाईने मोठय़ा प्रमाणात मतदान केले असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या तरुणाईला बदल हवा असून लोकसभा निवडणुकींच्या निकालानंतर सत्ता परिवर्तन होण्याची चिन्हे दिसत आहेत,’ असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
मेहता पब्लिशिंग हाउसतर्फे आयोजित कार्यक्रमात पत्रकार धनंजय बिजले यांनी लिहिलेल्या ‘लढा लोकपालचा- उद्रेक आम आदमीचा’ या पुस्तकाचे सोमवारी अण्णांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. खासदार राजू शेट्टी, कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, प्रकाशक सुनील मेहता या वेळी उपस्थित होते.
अण्णा म्हणाले, ‘‘सरकारवर जनशक्तीचा दबाव निर्माण करणे ही काळाची गरज आहे. स्वातंत्र्याला स्वैराचार मानणाऱ्या सरकारवर तर तो असायलाच हवा. देशाची जडणघडण करणाऱ्या संसदेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती चारित्र्यवान असणे आवश्यक आहे.’’
स्वातंत्र्योत्तर काळात देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आधी ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. या कारणामुळे आज अनेक प्रश्न देशासमोर उभे ठाकले आहेत, असेही अण्णांनी सांगितले.
‘मी लढवलेल्या प्रत्येक निवडणुकीत मला अण्णांचा पाठिंबा होता. त्यांचा पाठिंबा मिळवणे सोपे असले तरी तो टिकवणे अवघड आहे,’ असे राजू शेट्टी यांनी सांगितले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा