तृणमूल काँग्रेसच्या सर्वोच्च ममता बॅनर्जी यांनी रामलीला मैदानावर आयेजित केलेल्या सभेला जाण्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टाळल्याने दिल्लीत राजकीय चर्चाना उधाण आले आहे.  अण्णांच्या  ‘दांडी’मागे प्रकृती ठीक नसल्याचे कारण पुढे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात रामलीला मैदानावर गर्दी न जमल्याने त्यांनी रामलीलावर जाण्याचे टाळल्याचे बोलले जात आहे. अण्णा हजारे यांनी ऐनवेळी नकार कळविल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘ही सभा मी आयोजित केली नव्हतीच. अण्णांच्या सांगण्यावरून मी महत्त्वाची कामे सोडून दिल्लीत आले’, अशा स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. गर्दी न जमण्यामागे अनेक कारणे सांगण्यात येत असली तरी अण्णांचे ‘जंतरमंतर’ दिल्लीकरांच्या डोक्यावरून उतरले, अशी चर्चा दिल्लीत सुरू झाली आहे.    
तृणमूलच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याची घोषणा अण्णा व ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत केली होती. जनलोकपालच्या आंदोलनानंतर पहिल्यांदाच अण्णा हजारे रामलीलावर सभा घेणार होते. या सभेचे व्यवस्थापन तृणमूल काँग्रेस पक्षाकडे होते. पूर्वनियोजित असलेल्या या सभेत अण्णा व ममता बॅनर्जी यांची भाषणे होणार होती.  सभेसाठी मंगळवारी रात्रीच अण्णा दिल्लीत दाखल झाले. बुधवारी दुपारी बारा वाजता ही सभा होणार होती. ममता बॅनर्जी सभास्थानी अण्णांची वाट पाहात होत्या. परंतु अण्णा आलेच नाहीत. अखेरीस अण्णांची विचारपूस करण्यासाठी ममतादीदींचे दूत मुकुल रॉय नवीन महाराष्ट्र सदनात दाखल झाले.  वाढलेल्या उन्हाचा त्रास होत असल्याने मी रामलीलावर येऊ शकणार नाही, असे अण्णांनी रॉय यांच्याकरवी ममतादीदींना कळविले. प्रत्यक्षात अण्णांनी आपल्या कार्यकर्त्यांना पाहणी करण्यासाठी रामलीलावर धाडले होते. तेथे अत्यंत कमी (हजारेक) जण उपस्थित असल्याने अण्णा नाराज झाले व त्यांनी सभास्थानी न जाण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त पसरले.
अण्णांची तब्येत आमच्यासाठी महत्त्वाची आहे. उन्हाचा त्रास होत असल्याने त्यांनी सभास्थानी न जाण्याचा निर्णय घेतला. त्याचा विपरीत अर्थ कुणीही काढू नये, असे अण्णांच्या सहकारी सुनीता गोडारा म्हणाल्या.
* अण्णांच्या सहकारी सुनीता गोडारा म्हणाल्या की, रविवारी अथवा सुट्टीच्या दिवशी दिल्लीत लोक जमतात. त्यातही सभा शक्यतो संध्याकाळी असावी. लोकांना दिवसभर कष्ट करावे लागतात. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीच सभा घ्यायला हवी होती.
* अण्णांची तब्येत ठीक नसल्याचे समजताच माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह नवीन महाराष्ट्र सदनात दाखल झाले. व्ही. के.  अण्णांशी भेट झाल्याचा दावा करीत सिंह म्हणाले की, ही राजकीय भेट नव्हती. जेव्हा अण्णा दिल्लीत येतात तेव्हा ख्यालीखुशाली विचारण्यासाठी मी त्यांना भेटत असतो, त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा