राज्यातील भ्रष्टाचार, राजकीय गुन्हेगारी, जनतेच्या पैशांची लूट व महिलांवरील अत्याचार का वाढले याचा गांभीर्याने विचार करून हे चित्र बदलण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांनी जागरूकतेने मतदान करण्याचे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे.  विधानसभा, लोकसभा ही लोकशाहीची पवित्र मंदिरे आहेत. अशा पवित्र मंदिरात, पवित्र माणसेच गेली पाहिजे. कारण याच मंदिरातून देश व राज्याच्या सर्वागीण विकासाची जडणघडण होते, असे अण्णांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. त्यासाठी शुद्घ आचार, विचारांची, निष्कलंक जीवन जगणाऱ्या, सामाजिक, राष्ट्रीय दृष्टिकोन असणाऱ्यामाणसांनाच मतदारांनी आपले मत देऊन या मंदिरात पाठवले पाहिजे. मात्र मागील काळात मतदारांनी काही भ्रष्टाचारी, गुंड, जनतेच्या पैशांची लूट करणाऱ्या माणसांना मत दिल्याने राज्यात अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. सगळ्याच पक्षाच्या प्रमुखांनी भ्रष्ट, गुंड, लुटारू लोकांना उमेदवारी नाकारली पाहिजे. अशा लोकांना उमेदवारी दिलीच तर मतदारांनीच नाकारले पाहिजे. मतदारांनी जागरूकपणे मतदान केल्यास आगामी पाच वर्षांत राज्यात बदल दिसून येईल, असा विश्वास हजारे यांनी या निवेदनात व्यक्त केला आहे.