बलात्काराचा गुन्हा केलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा ठोठाविण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे सपाचे नेते मुलायमसिंग यांचा निषेध करण्यास माजी पंतप्रधान एच. डी. दैवैगौडा यांनी शुक्रवारी ठाम नकार दिला.
मुलायमसिंग यांना त्यांचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, प्रत्येक राजकीय पक्षाची भूमिका आहे, त्यामुळे आपण कोणाचाही निषेध का करावा, राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालय याबाबत निर्णय घेतील, असेही देवैगौडा म्हणाले. जद(एस)चा निवडणूक जाहीरनामा देवेगौडा यांनी जाहीर केला त्यावेळी ते बोलत होते.
तरुणांकडून चुका होत असतात, त्यामुळे बलात्काराचा गुन्हा केलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा देणे योग्य नाही, असे मत व्यक्त करून मुलायमसिंग यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. मुलायमसिंग यांच्या वक्तव्यावर विविध महिला संघटनांकडून जोरदार टीका केली जात आहे. फाशीच्या शिक्षेचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्याबाबत एखादी व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालय सर्व प्रकारची मते विचारात घेईल. बलात्कारासारख्या गुन्ह्य़ांमुळे देशाची मान शरमेने खाली जाते, गेल्या दोन वर्षांपासून काय चालले आहे, असा सवालही देवेगौडा यांनी केला.

Story img Loader