काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात भ्रष्टाचार आणि गैरप्रकार टाळण्यासाठी बांधिल असल्याची ग्वाही देण्यात आली असतानाच ‘आदर्श’ घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले कृपाशंकर सिंग यांना राज्यात प्रचारासाठी स्टार प्रचारक म्हणून स्थान देण्यात आले आहे.  
विविध घोटाळे आणि भ्रष्टाचार यामुळे देशात काँग्रेसच्या विरोधात वातावरण तयार झाले. निवडणुकीत हाच मुद्दा काँग्रेसला त्रासदायक ठरत आहे. भ्रष्ट नेत्यांना पाठीशी घालणारा वटहुकूम असो वा लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी पुढाकार घेऊन राहुल गांधी यांनी पक्षाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला. पण राज्यात स्टार प्रचारकांची यादी तयार करताना वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांनाच पक्षाने महत्त्व दिले आहे.
अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यास पक्षात विरोध होता. मराठवाडय़ात पक्षाची ताकद वाढण्याच्या उद्देशानेच त्यांना उमेदवारी देण्यात आली. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांचा अर्धा वेळ कायदेशीर पळवाटा काढण्यातच जातो. अशोक चव्हाण आणि कृपाशंकर सिंग यांना स्टार प्रचारक म्हणून नियुक्त करून काँग्रेसने कोणता संदेश दिला, असा सवाल पक्षाचे नेतेच करीत आहेत. अशोक चव्हाण यांचा मराठवाडय़ासाठी तर कृपाशंकर सिंग यांचा उत्तर भारतीयांच्या मतांसाठी उपयोग करून घेतला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत प्रफुल्ल पटेल यांची पत्नी वर्षां, मुलगा प्रजय आणि मुलगी पूर्णा यांना स्थान देण्यात आले होते.खर्चाचा समावेश होत नाही
प्रत्येक मान्यताप्राप्त पक्षाला प्रचारासाठी स्टार प्रचारक म्हणून ४० जणांची यादी सादर करता येते. या यादीत समाविष्ट असलेल्या नेत्यांच्या दौऱ्याचा खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट होत नाही. यातूनच स्टार प्रचारकांना जास्त मागणी असते.