‘आदर्श’ घोटाळ्यात अडकल्यापासून पक्षाच्या बैठकांमध्ये जाणिवपूर्वक दूर ठेवण्यात येणाऱ्या अशोक चव्हाण यांना बुधवारी औरंगाबादमधील मेळाव्यात राहुल गांधी यांच्या व्यासपीठावर स्थान देण्याबरोबरच सत्कार करण्याची संधी देण्यात आल्याने अशोकरावांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाल्याचा अर्थ पक्षात काढण्यात येत आहे.
‘आदर्श’ घोटाळ्यात नाव आल्यावर पदावरून दूर करण्यात आलेल्या अशोक चव्हाण यांना पक्षात फारसे महत्त्व देण्यात येत नव्हते. पण अलीकडेच दिल्लीतील पक्षाच्या नेत्यांकडून अशोक चव्हाण यांचे महत्त्व वाढेल या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. यातूनच ‘आदर्श’ चौकशी अहवाल फेटाळण्याचे फर्मान दिल्लीतून मुख्यमंत्र्यांना सोडण्यात आले होते. हा अहवाल फेटाळून अप्रत्यक्षपणे अशोकरावांना दिलासाच देण्यात आला होता. पण राहुल गांधी यांनी डोळे वटारताच हा अहवाल स्वीकारण्यात आला, पण त्याचा कार्यअहवाल तयार करताना अशोकराव अडचणीत येणार नाहीत, अशी खबरदारी घेण्यात आली.
नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. याबरोबरच पक्षाच्या प्रचार समितीचे प्रमुखपद त्यांच्याकडे सोपविण्याचा प्रस्ताव आहे. औरंगाबादमधील राहुल गांधी यांच्या सभेत मराठवाडय़ाचे नेते म्हणून अशोकरावांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले. तसेच राहुल गांधी यांचा सत्कारही त्यांनी केला. या सभेत राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर गुजरात सरकारला लक्ष्य केले. अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव चर्चेला आला असता पक्षाला त्यांची उमेदवारी त्रासदायक ठरू शकते, असा मुद्दा चर्चेत आला होता. यामुळेच नांदेडच्या उमेदवारीचा प्रस्ताव सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय समितीवर सोपविण्यात आला. राहुल गांधी यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची संधी मिळाल्याने अशोकरावांना उमेदवारी अथवा अन्य महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते, असाच सूचक संदेश देण्यात आला.
‘आदर्श’ मुख्यमंत्री
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमवेत महाराष्ट्र दौऱ्यात व्यासपीठावर उपस्थिती लावणारे माजी ‘आदर्श’ मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यामुळे दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची चांगलीच गोची झाली. काँग्रेस प्रवक्ते संजय झा यांना यासंबंधी पत्रकार परिषदेत छेडले असता स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांनी कशीबशी वेळ मारून नेली.
अवघ्या दोनेक महिन्यांपूर्वी राहुल गांधी यांनी आदर्श गैरव्यवहार प्रकरणातील चौकशी अहवालावर राज्य सरकारला फेरविचार करण्याचा ‘सल्ला’ दिला होता. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणदेखील उपस्थित होते. त्यानंतर राहुल गांधी भ्रष्टाचार खपवून घेणार नाहीत, असा प्रचार पक्षाच्या नेत्यांनी सुरू झाला होता. आज अशोक चव्हाण राहुल गांधी यांच्यासमवेत व्यासपीठावर अवतरल्याने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना झा यांची दमछाक झाली. ते म्हणाले की, अद्याप अशोक चव्हाण यांना न्यायालयाने दोषी ठरविलेले नाही. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना कुणासही दोषी ठरविता येणार नाही. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासमवेत अशोक चव्हाणांनी व्यासपीठावर बसणे गैर नाही. नरेंद्र मोदी यांनादेखील हाच नियम लागू होत नाही का, असा प्रतिप्रश्न पत्रकार महिलेने विचारल्यावर झा म्हणाले की, मोदींवरील आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये जातीयवाद पसरवणाऱ्या पक्षाचे सरकार असल्याची टीका झा यांनी समाजवादी पक्षाचे नाव न घेता केली. उत्तर प्रदेशची सारी सूत्रे नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांच्याकडे दिली आहेत. त्यावर झा म्हणाले की, अमित शाह यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. अमित शाह यांची प्रतिमा जातीयवादी असल्याने त्यांच्यामार्फत मोदींना तोच अजेंडा राबवायचा आहे.
अशोक चव्हाण यांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा
‘आदर्श’ घोटाळ्यात अडकल्यापासून पक्षाच्या बैठकांमध्ये जाणिवपूर्वक दूर ठेवण्यात येणाऱ्या अशोक चव्हाण यांना बुधवारी औरंगाबादमधील मेळाव्यात राहुल गांधी यांच्या व्यासपीठावर स्थान देण्याबरोबरच

First published on: 06-03-2014 at 04:34 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok chavans rehabilitation in congress