थोडय़ाच अवधीत मोदी सरकारबाबत जनतेचा भ्रमनिरास झाला असला आणि काँग्रेस हाच लोकांना योग्य पर्याय वाटत असला तरी आगामी विधानसभा निवडणुका आम्हाला सहज जिंकता येणार नाहीत. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आणि केंद्र सरकारचे अपयश प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी केले.
मी विधानसभा निवडणूक लढणार नाही. कारण, प्रदेशाध्यक्ष असल्याने राज्याची जबाबदारी माझ्यावर आहे. शिवाय, मी विधान परिषदेचा सदस्य आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरात ठाकरे यांनी सांगितले.
 सेना-भाजप युतीच्या सरकारचा अतिशय वाईट अनुभव जनतेने यापूर्वी घेतला आहे. केंद्रातील मोदी सरकारचाही ‘अच्छे दिन’च्या आश्वासनाचे बुरे दिनमध्ये रूपांतर झालेले जनता पाहत आहे. त्यामुळे काँग्रेस हाच एकमेव पर्याय असलेला पक्ष असल्याची खात्री सामान्य जनतेला झाली आहे.
आघाडीतील जागा वाटपाबाबत विचारले असता ठाकरे म्हणाले, आम्ही १७१ जागांवर लढणार आहोत. प्रसंगी ‘एकला चलो रे’चीदेखील आमची तयारी आहे. विद्यमान आमदारांनाच पुन्हा उमेदवारी देणार आहोत. थोडासा कमी जास्त बदल होऊ शकतो आणि मतदारसंघ बदलण्याच्या बाबतीतही चच्रेअंती निर्णय होईल, पण विशेष बदल अपेक्षित नाही. ही निवडणूक लढण्यास उत्सुक असलेल्या उमेदवारांकडून ११ ऑगस्टपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. साधारण उमेदवार शुल्क ५००० रुपये आणि अनुसूचित जाती-जमाती व महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी अडीच हजार रुपये शुल्क ठेवले आहे.
थेट प्रदेश कार्यालयातच अर्ज बोलवण्यात आले आहेत. पुणे, औरंगाबाद येथील विभागीय मेळावे आटोपले असून ४ ऑगस्टला अमरावती व नागपूर विभागाचा एकत्र मेळावा नागपुरात देशपांडे सभागृहात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धनगर समाजाच्या प्रश्नाचा चेंडू केंद्र सरकारकडे?
धनगर समाजाला अनुसूचित जमाती अर्थात, एस. टी. प्रवर्गात समाविष्ट करण्याबाबतचा विषय आता राज्य सरकारकडे नसून तो केंद्र सरकारकडे प्रलंबित असल्याची माहिती आमदार हरिभाऊ राठोड यांनी दिल्याचे जेव्हा माणिकराव ठाकरे यांच्या वार्ताहरांनी लक्षात आणून दिले तेव्हा ते म्हणाले, आमदार राठोड यांच्याशी चर्चा करून व सर्व बाबी तपासून प्रतिक्रिया देता येईल.

Story img Loader