कोणी काहीही म्हणत असले तरी जमनताचे वारे आमच्या बाजूने आहे. रिपब्लिकन पार्टीची युतीला साथ आणि ‘आप’मुळे मनसेची हवा आता चालणार नाही. केंद्रात आणि राज्यात महायुतीचीच सत्ता येणार. त्यामुळे त्यांनी आमचाही मान राखावा. नाहीतर सत्तेत वाटा मिळेल तोवरच आम्ही महायुतीसोबत राहू, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट)चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सेना- भाजपला दिला आहे.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात बोलताना आठवले यांनी हा इशारा दिला. गेली पंचवीस वर्षे अन्य पक्षांना मोठा करणारा रिपाइं पक्ष मात्र छोटाच राहिला त्याला आम्हीच जबाबदार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपाइं आम्ही निर्माण करू शकलो नाही. अन्य धर्माचे लोक या पक्षापासून दूर राहिले हे आमचेच अपयश असल्याचे प्रारंभीच स्पष्ट करून आठवले म्हणाले, आजवर काँग्रेससोबत राहिलो, त्याचा काँग्रेसला फायदा झाला. मात्र आता अन्य जाती धर्मातील लोक रिपाइंत येऊ लागले असून रिपाइंला व्यापक करणार आहे.

 

Story img Loader