निवडणुकीच्या धामधुमीत दारूच्या पाटर्य़ाना चांगलाच ऊत येतो. मात्र या दारूचा मतदान तसेच निवडणूक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी मतदानाच्या दोन दिवस आधीपासूनच दारूबंदी करा, असे निर्देश निवडणूक आयोगाने बुधवारी सर्व राज्यांना दिले आहेत. नऊ टप्प्यांत पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सात एप्रिलपासून मतदान होणार आहे. लोकसभेसाठी लागू असणारा हा निर्णय अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, ओदिशा आणि सिक्कीम या चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीही लागू होणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. १६ मे रोजी जेव्हा मतमोजणी होईल, तेव्हाही दारू विक्री करणे, हॉटेलमध्ये दारू देण्यास मज्जाव करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
या प्रकरणी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र धाडण्यात आले आहे. दारूबंदीच्या काळात दारूच्या साठा करण्यासही निवडणूक आयोगाने मनाई केली.
वाराणसीत केजरीवालांना पाठिंबा नाही
नवी दिल्ली : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सक्षम उमेदवार देण्याचा काँग्रेसचा निश्चय आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि वाराणसीत आम्ही स्वबळावरच मोदींना लढत देऊ, असे सांगत काँग्रेसने आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्याचा छुपा अजेंडा असल्याच्या वावडय़ांना पूर्णविराम दिला. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे पुत्र अनिल शास्त्री यांनी समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाला आवाहन करताना त्यांनी मोदींविरोधात स्वतंत्र उमेदवार उभे न करता काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे.
आंध्र प्रदेशातून २१ किलो सोने जप्त
हैदराबाद : येत्या लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर आंध्र प्रदेशातून मंगळवापर्यंत राज्यभरातून ३८ कोटींची रोकड, २१ किलो सोने, १२१ किलो चांदी आणि सहा हजार दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत़ ३० एप्रिल आणि ७ मे या दोन टप्प्यांमध्ये होणाऱ्या मतदानाच्या वेळी या वस्तू आणि रोकड मतदारांमध्ये वाटण्यात येणार होती़
वाँटेड माओवाद्याची पत्नी राजकारणात
भुबनेश्वर : वाँटेड माओवादी सब्यसाची पंडा याची पत्नी सुभश्री पंडा हिने आपल्या १०० महिला समर्थकांसह ‘अमा ओदिशा’ पक्षात प्रवेश केला आहे. २०१२ मध्ये सुभश्री हिची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून उतरण्याची आपली इच्छा असल्याचे तिने नमूद केले. या पक्षाचे मुख्य नेते हे आसामच्या राज्यपालांचे जावई आहेत.
पर्रिकरविरोधी तक्रारीची दखल
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार आल्याने गोवा निवडणूक आयोगाने राज्य सरकारकडून त्याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. गुंतवणूकवजा औद्योगिक धोरणाद्वारे ५० हजार जणांना या महिनाअखेपर्यंत रोजगार उपलब्ध करून देण्याची राज्य सरकारची योजना आहे, असे पर्रिकर यांनी ट्विट केले होते. याबाबत मुख्य सचिवांकडून स्पष्टीकरण मागविण्यात आल्याचे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी केशवचंद्र म्हणाले.
‘हमी’च्या जागांसाठी काँग्रेसमध्ये चुरस
चेन्नई : आगामी निवडणुकीत एकापेक्षा एक ज्येष्ठ काँग्रेस नेते थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा मार्ग टाळताना दिसत असतानाही जेथून जिंकण्याची हमी आहे, अशा मतदारसंघातून तिकीट मिळावे यासाठी तीव्र स्पर्धा असल्याचे चित्र आहे. येथील चिदम्बरम् मतदारसंघातही उमेदवारीसाठी तीव्र चुरस आहे. केंद्रीय मंत्री जी.के. वासन यांचे खंदे समर्थक मानले जाणारे मणिरत्नम् आणि केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम् यांच्या गोटातील मानले जाणारे वल्लालपेरुमल यांच्यापैकी कोणास उमेदवारी मिळते, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. येथील कन्याकुमारी मतदारसंघातही अशीच चुरस तामिळनाडू काँग्रेस समितीच्या दोघा माजी अध्यक्षांच्या भावांमध्ये आहे.