राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अत्यंत सुरक्षित आणि विजयाची खात्री देणारा राज्यातील एकमेव मतदारसंघ लोकसभेसाठी कोणता असेल तर तो ‘बारामती लोकसभा मतदारसंघ’ होय.
१९६७ पासून शरद पवार आणि आता सुप्रिया सुळे यांचा हा मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ‘बालेकिल्ला’ म्हणून ओळखला जातो. स्वत: शरद पवार किंवा त्यांनी पाठिंबा दिलेला उमेदवार या मतदारसंघामधून विजयी झाला असून, हा इतिहास बदलण्यासाठी महायुतीच्या वतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे आपले नशीब आजमावत आहेत.
जानकर हे महायुतीचे उमेदवार असून, धनगर समाजाचे नेतृत्व करीत आहेत. या मतदारसंघात धनगर समाजाची सुमारे साडेतीन लाख मते असल्यामुळे यंदा मी विजयी होईन, असा विश्वास जानकर व्यक्त करीत आहेत.
आम आदमीच्या वतीने निवृत्त पोलीस अधिकारी सुरेश खोपडे बारामती लोकसभा मतदारसंघातून उभे राहत आहेत. ते मूळचे मोरगाव (ता. बारामती) येथील आहेत. तसा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खोपडे यांचा संपर्क अत्यल्प आहे. तरी आम आदमी पार्टीमधून ते आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत.
बहुजन समाज पार्टीच्या वतीने काळूराम चौधरी यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी मिळाली आहे. मतदारसंघामध्ये बारामती शहर आणि नगरपालिका वॉर्डमध्ये काळूराम चौधरी यांचा असलेला संपर्कवगळता त्यांची ओळख कमीच आहे. या मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडे विकासाचा मुद्दा असला, तरी बारामती शहर परिसरामधील चारचाकी वाहनांच्या दुहेरी टोलवसुलीचा प्रश्न, बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, दुष्काळी परिस्थिती, गारपिटीद्वारे आलेले नैसर्गिक संकट, असे अनेक प्रश्न आहेत. यंदा सुप्रिया सुळे या मागील निवडणुकीपेक्षा किती मताधिक्क्य अधिक घेतील, याकडेच सर्वाचे लक्ष आहे. नेहमीप्रमाणे प्रचाराची शेवटची सभा शरद पवार स्वत: बारामतीत घेणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा