काँग्रेस, भाजपमध्येच सामना
देवेंद्र गावंडे, चंद्रपूर

पराभव टाळण्यासाठी काँग्रेसने या वेळी उमेदवार बदलला असला तरी गडचिरोली-चिमूरमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांना बरीच मेहनत करावी लागणार आहे. या मतदारसंघात प्रभावशाली असलेले काँग्रेस व भाजपचे मित्रपक्ष नेमकी कोणती भूमिका घेतात, यावरही या मतदारसंघातील जय-पराजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. नक्षलवादाचा सर्वाधिक प्रभाव असलेला राज्यातील हा एकमेव मतदारसंघ असून या वेळी ते कोणती भूमिका घेतात, याकडेही साऱ्यांचे लक्ष आहे. 

गेल्या वेळी भाजपच्या विजयी जागांच्या यादीत अगदी अग्रक्रमावर असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचे मारोतराव कोवासेंनी निवडून येऊन साऱ्यांना धक्का दिला. चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मेहनतीमुळे हे घडले. आता त्याच वडेट्टीवारांवर या वेळी उमेदवार बदलवून मागण्याची पाळी आली. निष्क्रियतेमुळे कोवासेंना घरी बसवून आमदार नामदेव उसेंडींना या वेळी संधी देण्यात आली. सध्याचे वातावरण बघता उसेंडी व भाजपचे अशोक नेते यांच्यात या वेळी थेट सामना होणार आहे. या मतदारसंघातील सहापैकी तीन आमदार काँग्रेसचे आहेत. अहेरीचे अपक्ष आमदार दीपक आत्रामही काँग्रेससोबत आहेत. भाजपजवळ केवळ अतुल देशकर हे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे कागदावर काँग्रेसचे पारडे जड दिसत असले तरी प्रत्यक्षात तशी स्थिती नाही. सावकार गटाचे म्हणून ओळखले जाणारे आरमोरीचे आमदार आनंदराव गेडाम या वेळी उसेंडींना मदत करतीलच, याची शाश्वती नाही. त्यामुळे पक्षाला विजयाची हमी देणाऱ्या वडेट्टीवारांसोबत या वेळी आमगावचे रामरतन राऊत तेवढे आहेत.
काँग्रेससमोर अहेरी मतदारसंघात कुणाची मदत घ्यायची, असा पेच आहे. सध्याचे अपक्ष आमदार दीपक आत्राम यांना वडेट्टीवारांनी निवडून आणले होते. त्यांनी राष्ट्रवादीचे धर्मराव आत्राम यांचा पराभव केला. आता या दोघांपैकी कुणाचीही मदत घेतली तरी काँग्रेससमोर अडचण आहे. संपूर्ण मतदारसंघात राष्ट्रवादीची मदत घ्यायची असेल तर धर्मराव आत्राम यांना सोबत ठेवणे भाग आहे, याची जाणीव काँग्रेसला आहे. धर्मरावबाबा आगामी विधानसभेची हमी घेतल्याशिवाय उसेंडींना मदत करायला तयार नाहीत. अशीच स्थिती ब्रह्मपुरीतही आहे.
येथे राष्ट्रवादीचे संदीप गड्डमवार व बंडखोर काँग्रेस नेते अशोक भया यांचे वडेट्टीवारांशी वैर आहे. या साऱ्यांना एका नावेत बसवण्याची अवघड कामगिरी उसेंडींना पार पाडावी लागणार आहे. चिमूर, गडचिरोली व आमगाव या तीन विधानसभा मतदारसंघाच्या बळावर चांगली लढत देता येईल. भाजपमध्येही सारे काही आलबेल नाही. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद क्षीण असली तरी काही भागांत प्रभाव असलेली युवाशक्ती संघटना नेमके काय करते, यावर बरेच काही अवलंबून आहे.

आघाडीत विस्कळीतणा!
सोमनाथ सावळे, बुलढाणा
शिवसेना-भाजप युतीचा १९९६ पासून बालेकिल्ला असलेला बुलढाणा लोकसभा मतदारसंघ २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेल्या जुजबी व अल्पशा नकारार्थी लाटेमुळे परिवर्तनाच्या लक्ष्मणरेषेवर असताना पर्याय म्हणून संपर्कक्षम व सक्षम उमेदवार राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने न दिल्याने परिवर्तनाची लाट काहीशी माघारी फिरत जुन्याच दिशेने मार्गक्रमण करीत असल्याने महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना ही निवडणूक दिलासा देणारी ठरू लागली आहे.
२००९ मध्ये डॉ. राजेंद्र शिंगणे व प्रतापराव जाधव या मराठा समाजातील नातेवाईकांमध्ये ही झुंज झाली. १९९८ चा तेरा महिने अल्पावधीचा मुकुल वासनिकांचा कालावधी वगळता शिवसेना उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांची डाळ शिजू दिली नाही. राखीव असलेला मतदार संघ सर्वसाधारण झाल्यानंतर शिवसेना युतीचे प्रतापराव जाधव यांनी हीच परंपरा कायम ठेवत डाँ. शिंगणेसारख्या नेत्याला आस्मान दाखवले होते.
२००९चा हा चमत्कार घडल्यानंतर प्रतापराव जाधव यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या. मात्र, त्या ते पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे या निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्याबद्दल सुप्त प्रमाणात नाराजीची लाट होती. राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने पुन्हा डॉ. शिंगणे यांना किंवा रेखाताई खेडेकर यांना उमेदवारी दिली असती तर फायदा झाला असता. मात्र, असे न होता राष्ट्रवादीने दहा वर्षांपासून राजकीय अडगळीत असलेले, दोनदा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात पराभूत झालेले, भाजप ते राष्ट्रवादी, असे चार वेळा पक्ष बदलणारे कृष्णराव इंगळे यांना उमेदवारी दिली.
इंगळे यांचा तडजोडीचा स्वभाव असला तरी जळगाव जामोद परिसर वगळता लोकसभा मतदारसंघात त्यांचा फारसा प्रभाव किंवा जनसंपर्क नाही. त्यातल्या त्यात काँग्रेस-राष्ट्रवादी वरवर सख्य दाखवत असले तरी त्यात अजिबात एकजिनसीपणा नाही. मतदारसंघात राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसचा जनाधार आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेतृत्व काँग्रेस कधीही वाढू देत नाही. त्यामुळे कृष्णरावांपुढे मोठे आव्हान आहे. त्या तुलनेत प्रतापराव जाधव यांनी पूर्वीपासून तयारी केली आहे. या मतदारसंघात युती व आघाडी अशी सरळ लढत असली तरी अण्णा हजारे समर्थित उमेदवार बाळासाहेब दराडे, आपचे सुधीर सुर्वे, अपक्ष उमेदवार कमांडर अशोक राऊत हे किती मते घेतात, हेही महत्त्वाचे आहे.

Story img Loader