केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवेला १६० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सदर विभागाने दिलेल्या योगदानाची स्तुती केली आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी या विभागाने अधिकाधिक गतिमान व्हावे, असे मुखर्जी यांनी म्हटले आहे.
सदर विभागाने स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अधिक गतिमान आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून स्वत:ला तयार करावे आणि जगात आपण सर्वोत्तम असल्याचे दाखवून द्यावे, असे आवाहनही राष्ट्रपतींनी केले आहे. विभागाच्या १६० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
बांधकाम क्षेत्र हे सध्या संकल्पना, तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता या निकषांवर अधिक गतिमान होण्याची गरज आहे. सध्या जो विकास होत आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सध्या जी आव्हाने समोर आहेत, ती पेलण्यासाठी सक्षम होण्याची गरज आहे. जुन्या संघटना कालबाह्य़ प्रथेमुळे बोजा ठरत आहेत, ही समजता येणारी बाब आहे. त्यामुळे पायाभूत क्षेत्रातील आधुनिकीकरणाकजडे अधिक लक्ष दिले पाहिजे, असेही राष्ट्रपती म्हणाले.
आपल्या मालमत्तेचे परिरक्षण करण्यासाठी नव्या पद्धतींचा अवलंब केला पाहिजे आणि पर्यावरणात होणाऱ्या बदलांना सामोरे गेले पाहिजे. ग्रामीण रस्ते, आरोग्य आणि शैक्षणिक पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि सांडपाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे याकडे विभागाने लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा