राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना नवी दिल्लीत जाणे कधीच सोयीस्कर वाटत नाही. मुंबईतील सत्तेची ऊब उपभोगल्यावर तर दिल्ली नकोशी वाटते. मुंबईतील अथांग समुद्राच्या किनारी शासकीय निवासस्थान, गाडय़ा, नोकरचाकर हे सारे वैभव सोडून केवळ पक्षाचे महत्त्व वाढावे म्हणून दिल्लीत जाणे म्हणजे एकप्रकारे काळ्या पाण्याची शिक्षाच, असा काही नेतेमंडळींचा समज झालेला दिसतो. जवळपास १५ वर्षे राज्याची सत्ता उपभोगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या काही मंत्र्यांना लोकसभेसाठी रिंगणात उतरविले जाईल, असे जाहीर केले आणि मंत्र्यांच्या पोटात गोळाच आला. कोणाला दिल्लीत जावे लागणार याची मग हळुवार चर्चा सुरू झाली. चर्चेत पहिले नाव सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचे आले. आपण मुंबईतच बरे, असे टुणटुणे भुजबळांनी सुरू केले. पुतणे समीर दिल्लीत रमले वगैरे भुजबळांचे पालुपद सुरू झाले. इकडे खासदारांचे संख्याबळ वाढले पाहिजे, असे फर्मान पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सोडल्याने विरोधात बोलण्याची कोणाची टाप नव्हती. भुजबळ, जयंत पाटील, राजेश टोपे, सुनील तटकरे, जयदत्त क्षीरसागर या मंत्र्यांची संभाव्य उमेदवार म्हणून नावे येऊ लागली. नाव येणाऱ्या प्रत्येक मंत्र्याने आपली राज्यातच कशी गरज आहे, हे सांगण्यास सुरुवात केली. भुजबळ काका की पुतणे ही चर्चा सुरू झाली असतानाच राष्ट्रवादीने छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर करून टाकली.
बीडमध्ये राज्यमंत्री सुरेश धस यांना उमेदवारी देण्यात आली. म्हणजेच ज्येष्ठ मंत्र्यांपैकी आपल्यालाच बळीचा बकरा बनविण्यात आल्याची भावना भुजबळांच्या मनात घर करू लागली. आता रायगडची जागा राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आल्याने जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना लोकसभा लढावी लागण्याची चिन्हे आहेत. भुजबळांप्रमाणेच तटकरे यांना मुंबईचे वेध. सिंचनाचे क्षेत्र किती वाढले यापेक्षा आपल्याकडे ‘पाणी’ कसे मुरेल याची तटकरेंना म्हणे जास्त चिंता. मुलीला निवडून आणतो, असा शब्दही त्यांनी टाकून बघितला. तटकरे हे तसे अजितदादांचे आवडते. यामुळेच उमेदवारी जाहीर होईपर्यंत काही जमू शकते का, हा तटकरे यांचा प्रयत्न राहणार आहे. मधल्या काळात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप झाले. यात भुजबळ आणि तटकरेच आघाडीवर होते. आता दोघांनाही दिल्लीला नेण्यामागे या भानगडी कारणीभूत नाहीत ना, अशी चर्चा सुरू झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाची प्रतिमा स्वच्छ ठेवण्याकरिताच भानगडबाजांना दिल्लीची हवा खाण्यासाठी नेले तर नाही ना.. ही कुजबूज राष्ट्रवादीच्या मुख्यालयात सध्या सुरू आहे.
बडे नेते दिल्लीत?
राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना नवी दिल्लीत जाणे कधीच सोयीस्कर वाटत नाही. मुंबईतील सत्तेची ऊब उपभोगल्यावर तर दिल्ली नकोशी वाटते.
First published on: 10-03-2014 at 03:13 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big politicians in delhi