तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आणि बिजू जनता दलाचे अध्यक्ष आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक या दोघांविरोधात भाजपने शनिवारी पुन्हा जोरदार हल्ला चढविला. मोदींवर बेलगाम टीका करीत ममता या लक्ष्मणरेषा ओलांडत आहेत, अशी ट्विपण्णी ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी केली तर शारदा चिटफंड घोटाळ्याच्या सूत्रधारांना संरक्षण देत असल्यावरून पटनाईक यांचीही सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते बिजय मोहपात्रा यांनी केली आहे.
ममता दिदींनी ‘परिवर्तना’चा नारा देत पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर घडविले खरे पण आता त्यांचे परिवर्तन हे कुप्रशासन, मतदान केंद्रांवरील दंडेली आणि घुसखोरीचे ठरले आहे, अशी टीका अरुण जेटली यांनी ट्विटरवर केली.
पटनाईक यांची चौकशी करा
शारदा घोटाळ्यातील आरोपींना नवीन पटनाईक संरक्षण देत आहेत, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते बिज्योय मोहपात्रा यांनी केला. पटनाईक हे ओदिशाचे गृहमंत्रीपदही सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांचे हे कृत्य अत्यंत गंभीर आहे, असे मोहपात्रा यांनी म्हटले आहे.

Story img Loader