महाराष्ट्राची सत्ता आता फक्त दोन बोटे उरली आहे, अशा स्वप्नात दंग असलेल्या भाजप-शिवसेनेमध्ये सध्या मुख्यमंत्रीपदावरुन सुप्त वाद सुरु आहे. मात्र महायुतीचे नेतृत्व भाजप करील, असे स्पष्ट करीत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदावर भाजपची दावेदारी असल्याचे संकेत दिले. त्यामुळे आता महायुतीतील भाजप व शिवसेना या प्रमुख पक्षांमधील सत्तासंघर्ष एका वेगळ्या वळणावर येण्याची चिन्हे आहेत.
राज्यात जरी एक हाती सत्ता आली नाही, तरी मुख्यमंत्रीपद भाजपकडे खेचून घेण्याची पक्षाची रणनीती आहे. त्यासाठीच जागा वाटपाचे पूर्वीचे सूत्र मोडून अधिकच्या जागांची भाजपकडून मागणी करण्यात येत आहे. शिवसेनने अद्याप अजून त्यांचे पत्ते खुले केले नसले तरी, भाजपच्या या डावपेचावर त्या पक्षातही नाराजी आहे.
केंद्रीय नेतृत्वाकडूनच राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार आणण्याचे संकेत दिले आहेत. त्यावरुन महायुतीत मुख्यमंत्रीपद भाजपकडे राहील, असे मानले जाते. त्यादृष्टीने राज्यातील नेतेही तशी वातावरण निर्मिती करीत आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे नेतृत्व भाजप करील, असे सांगून त्यांनी भाजपचा मुख्यमंत्रीपदावर दावा असल्याचे संकेत दिले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी हरियाना विधानसभा निवडणुकीत भाजपला एकला चलोरे चे दिलेले आदेश आणि महाराष्ट्रात महायुतीचे भाजपने नेतृत्व करावे, अशी व्यक्त केलेली इच्छा, याचा आधार घेत, भाजपची महाराष्ट्रातील रणनीती काय असेल हे फडणवीस यांनी सूचित केले.
अर्थात महायुतीत त्याबाबत चर्चा होईल आणि राज्य भाजपने काय भूमिका घ्यायची, याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि पक्षाचे केंद्रीय संसदीय मंडल करेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
धनगर आरक्षणाचे भाजपकडून समर्थन
राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस लरकार आरक्षणाच्या मुद्यावर जाती-जातीत भांडणे लावत आहे, अशी टीका करतानाच, धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करुन आरक्षण मिळावे, या मागणीचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले. त्यामुळे आदिवासी समाजात त्याविरोधात प्रतिक्रिया उमटण्याची चिन्हे आहेत. महायुतीतील एक घटक पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी षन्मुखानंद सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन फडणवीस यांनी केले. सोमवारी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने जानकर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो कार्यकर्ते मेळाव्याला आले होते, त्यात तरुणांचा भरणा जास्त होता.